Tuesday, August 11, 2026

Navi Mumbai Railway : ऐरोली ते बेलापूर रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट; प्रवाशांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

Navi Mumbai Railway : ऐरोली ते बेलापूर रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट; प्रवाशांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

नवी मुंबई : ऐरोली ते बेलापूरदरम्यानच्या सर्व रेल्वे स्थानकांचा लवकरच कायापालट होणार आहे. या स्थानकांमधील रखडलेली विकासकामे आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांच्या समस्यांची खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मांडणी केली. त्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला विकासकामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहेत.

मे २०२६ मध्ये झालेल्या करारानुसार सिडकोच्या ताब्यातील ऐरोली ते बेलापूरदरम्यानची स्थानके मध्य रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. त्यामुळे आता ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, सानपाडा, जुईनगर, नेरुळ, सीवूड्स-दरावे आणि बेलापूर या स्थानकांची देखभाल, दुरुस्ती तसेच मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मध्य रेल्वेची असणार आहे.

दरम्यान, या स्थानकांवर अनेक समस्या असल्याचे खासदार म्हस्के यांनी रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. ऐरोली आणि रबाळे स्थानकांवरील तिकीट खिडक्या बंद असून शौचालयांची दुरवस्था झाली आहे. पायऱ्या आणि फरश्या तुटलेल्या आहेत. घणसोली आणि कोपरखैरणे येथे मोठी प्रवासी वर्दळ असतानाही तिकीट काउंटर परिसरात अस्वच्छता असल्याची तक्रार आहे.

तुर्भे आणि सानपाडा स्थानकांवर शौचालयांमध्ये दुर्गंधी, पिण्याच्या पाण्याची कमतरता आणि अपुरी प्रकाशव्यवस्था आहे. जुईनगर आणि नेरुळ येथील पादचारी पुलांचीही दुरवस्था झाली असून, तिकीट खिडक्या अपुऱ्या असल्याने प्रवाशांना मोठ्या रांगेत उभे राहावे लागते. सीवूड्स-दरावे आणि बेलापूर स्थानकांवरही स्वच्छतेच्या समस्या असल्याचे म्हस्के यांनी सांगितले.

सर्व स्थानकांवरील पायऱ्या, पादचारी पूल आणि प्रवाशांच्या बसण्याच्या बाकांची दुरुस्ती, शौचालयांचे नूतनीकरण, २४ तास स्वच्छता आणि पाणीपुरवठा, सर्व तिकीट खिडक्यांचे नियमित संचालन, पुरेशी प्रकाशयोजना तसेच स्थानक परिसरात एलईडी दिवे बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जीआरपी आणि आरपीएफची गस्त वाढवण्याची मागणीही करण्यात आली.

या सर्व मागण्यांची दखल घेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला आवश्यक विकासकामे तातडीने करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे ऐरोली ते बेलापूरदरम्यानच्या रेल्वे प्रवाशांना लवकरच अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सुविधायुक्त स्थानकांचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा