Sunday, August 9, 2026

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार; १३ ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार; १३ ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी आता पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल होत आहे. येत्या २४ तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून, १३ ऑगस्टपासून पावसाचा जोर प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण, मुंबई आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याला याचा सर्वाधिक प्रभाव जाणवू शकतो.

मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने जारी केलेल्या अंदाजानुसार, ९ ते १२ ऑगस्ट दरम्यान उत्तर व दक्षिण कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळतील. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस अपेक्षित असून, घाटमाथ्यावर पावसाची तीव्रता वाढणार आहे. तसेच, मराठवाडा आणि विदर्भात विखुरलेल्या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या 'इम्पॅक्ट-बेस्ड फोरकास्ट'नुसार मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचणे, स्थानिक पूरपरिस्थिती निर्माण होणे, तसेच झाडे आणि जुन्या इमारती कोसळण्याच्या घटना घडण्याची शक्यता आहे. विशेषतः घाट परिसरात भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा धोका असल्याने हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा २% जास्त पाऊस

राज्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला असून, आजपर्यंत ६३७.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे (सरासरी ६२२.७ मिमी), जो सरासरीच्या तुलनेत २ टक्के जास्त आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाने उघडीप दिल्याने विदर्भ व मराठवाड्यात सरासरीपेक्षा काहीसा कमी पाऊस झाला असून, हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >