Saturday, August 8, 2026

Nashik : सुरगाण्यात अत्याधुनिक भूकंप मापन केंद्र कार्यान्वित, भूकंपीय हालचालींवर आता रिअल-टाईम नजर

Nashik : सुरगाण्यात अत्याधुनिक भूकंप मापन केंद्र कार्यान्वित, भूकंपीय हालचालींवर आता रिअल-टाईम नजर

Nashik : नाशिक जिल्ह्यातील भूकंपीय हालचालींवर आता अधिक अचूक आणि प्रभावीपणे लक्ष ठेवता येणार आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (National Center for Seismology) कडून सुरगाणा येथे अत्याधुनिक ब्रॉडबँड सिस्मोग्राफ (State-of-the-art broadband seismograph) आधारित भूकंप मापन केंद्र (Earthquake measuring station) कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्रातून नोंद होणारी भूकंपाची माहिती रिअल-टाईममध्ये थेट नवी दिल्लीतील राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या केंद्रीय नियंत्रण कक्षाकडे पाठवली जाणार आहे.

भूकंप मापन केंद्रासाठी तीन ठिकाणांची निवड

नाशिक जिल्ह्यात भूकंप मापन केंद्रासाठी (Earthquake measuring station) सुरगाणा, बागलाण तालुक्यातील हरणबारी-वडे दिगर आणि मालेगाव या तीन ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. यापैकी सुरगाणा तहसील कार्यालयात भूकंप मापन यंत्रणा यशस्वीरित्या बसवण्यात आली आहे. या अत्याधुनिक यंत्रणेमुळे कमी तीव्रतेच्या भूकंपांचीही अचूक नोंद घेता येणार आहे. तसेच सूक्ष्म भूकंपीय हालचालींचा वेळेत शोध घेणे आणि भूकंपाचे केंद्रस्थान निश्चित करण्यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे.

मोहपाडा आश्रमशाळेत जनजागृती कार्यक्रम

दरम्यान, सुरगाणा तालुक्यातील मोहपाडा येथील आश्रमशाळेत भूकंपाबाबत जनजागृती कार्यक्रमही घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि ग्रामस्थांना भूकंपाच्या वेळी घ्यावयाची काळजी, सुरक्षिततेचे नियम आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य पद्धतीने कसा प्रतिसाद द्यावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी छोट्या नाटिकेच्या माध्यमातून भूकंपाची निर्मिती कशी होते, याचे प्रात्यक्षिकही सादर केले.

भूकंप मापन यंत्रणा जिल्ह्यासाठी उपयुक्त

भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींचा अचूक अंदाज वर्तविणे शक्य नसले, तरी वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नागरिकांमध्ये सातत्याने जनजागृती केल्यास त्याचे परिणाम मोठ्या प्रमाणात कमी करता येतात. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने नाशिक जिल्ह्यात उभारलेली अत्याधुनिक भूकंप मापन यंत्रणा जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन क्षमतेला बळकटी देणारी ठरणार आहे. विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये भूकंपाबाबत योग्य माहिती व सुरक्षिततेच्या सवयी रुजविणे ही काळाची गरज असून, प्रत्येक नागरिकाने आपत्तीच्या काळात घाबरून न जाता शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रतिसाद देण्यासाठी सज्ज राहावे. असे आवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >