Friday, August 28, 2026

Dahi Handi : संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात होणार अभिजात समृद्ध मराठी भाषेचा गौरव, १० थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ११ लाखाचे पारितोषिक मिळणार

Dahi Handi : संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात होणार अभिजात समृद्ध मराठी भाषेचा गौरव, १० थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ११ लाखाचे पारितोषिक मिळणार

ठाणे : संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे शनिवार ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १० यावेळेत दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा आणि आनंद दिघे यांच्या संस्कारांचा वारसा जपत, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव यंदा साजरा होत आहे. मागील वर्षी कोकण नगर गोविंदा पथकाने १० थर लावून विश्वविक्रम रचला आणि पुन्हा एकदा संस्कृतीच्या दहीहंडीला विश्वविक्रमी दहीहंडीचा मान मिळाला. यंदाही विविध गोविंदा पथकांमध्ये संस्कृतीची दहीहंडी फोडण्यासाठी उत्साहपूर्ण आणि चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. उत्सवाच्या आयोजनात उच्च न्यायालयाने निर्धारित केलेल्या सर्व नियम व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार असून, प्रत्येक सहभागी गोविंदाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे.

यंदा १० थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ११ लाखाचे पारितोषिक व ट्रॉफी, ठाणे शहरातील ९ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ५ लाख व ट्रॉफी, ठाणे शहराबाहेरील ९ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास २ लाख व ट्रॉफी, ८ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास २५ हजार रुपये पारितोषिक व ट्रॉफी, ७ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास १५ हजार रुपये पारितोषिक व सन्मानचिन्ह, ६ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास १० हजार रुपये पारितोषिक व सन्मानचिन्ह, ५ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ५ हजार रुपये पारितोषिक व सन्मानचिन्ह असे बक्षीसे देण्यात येतील. तसेच महिला गोविंदा पथकाला विशेष पारितोषिक देण्यात येईल. तसेच यंदाच्या उत्सवामध्ये अभिजात समृद्ध मराठी भाषेचा गौरव करण्यात येणार आहे.

दहीहंडी खेळ हा आपल्या मातीतला आहे. हा खेळ आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहचावा यासाठी कबड्डी, खो - खो प्रमाणे इयत्ता ८ वी नंतर शालेय पिटीमध्ये गोविंदांचा सराव शाळेत शिकवला पाहिजे अशी मागणी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली. याबाबत शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले आहे, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. संस्कृती युवा प्रतिष्ठान तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य दहीहंडी उत्सवात जास्तीत जास्त गोविंदा पथकांनी भाग घ्यावा तसेच नागरिकांनी सालाबादप्रमाणे यंदाही आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व आपल्या सहभागाने गोविंदांचा उत्साह द्विगुणित करावा, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा