Monday, August 3, 2026

Nashik : दिवंगत दीपाली बेळे यांच्या कुटुंबाला ५ लाखांच्या मदतीची घोषणा; मंत्री गिरीश महाजनांची बेळे कुटुंबियांना सांत्वनपर भेट

Nashik : दिवंगत दीपाली बेळे यांच्या कुटुंबाला ५ लाखांच्या मदतीची घोषणा; मंत्री गिरीश महाजनांची बेळे कुटुंबियांना सांत्वनपर भेट

Nashik : नाशिकमधील खड्ड्यांमुळे झालेल्या भीषण अपघातात ३९ दिवस मृत्यूशी झुंज देऊन प्राण गमावलेल्या दीपाली बेळे यांच्या कुटुंबाची मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी सांत्वनपर भेट घेतली. शासनाकडून ५ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा करताना शहरात सुरू असलेली रस्त्यांची कामे पुढील तीन-चार महिन्यांत पूर्ण होतील आणि त्यानंतर ३० ते ४० वर्षे खड्डे पडणार नाहीत, असा दावा त्यांनी केला.

मंत्री महाजनांची बेळे कुटुंबियांना सांत्वनपर भेट

नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी होऊन ३९ दिवस कोमात राहिल्यानंतर निधन झालेल्या दीपाली बेळे यांच्या निवासस्थानी रविवारी मंत्री गिरीश महाजन यांनी सांत्वनपर भेट दिली. या अत्यंत दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत त्यांनी बेळे कुटुंबाला शासनाकडून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. बेळे यांच्या दुचाकीचा खड्ड्यात तोल जाऊन झालेल्या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान त्यांनी तब्बल ३९ दिवस मृत्यूशी झुंज दिली; मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. ही घटना अत्यंत वेदनादायी असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे महाजन यांनी सांगितले.

शहरात युटिलिटीसह विविध रस्त्यांची कामे सुरू

रस्त्यांच्या दुरवस्थेवरून महापालिका आणि प्रशासनावर होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शहरातील सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती आणि विकासकामांची माहिती दिली. शहरात युद्धपातळीवर खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले असून, पावसामुळे काही प्रमाणात अडथळे येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या शहरात युटिलिटीसह विविध रस्त्यांची कामे सुरू असून, पुढील तीन ते चार महिन्यांत ती पूर्ण होतील. यावेळी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार साहित्याचा वापर करून असे रस्ते तयार केले जात आहेत की, पुढील ३० ते ४० वर्षे खड्डे पडणार नाहीत, असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला.

रस्ते अपघातातील घटनांची गांभीर्याने दखल

डांबराच्या किमती वाढल्या असल्या तरी विकासकामांचा वेग कमी होणार नाही. नाशिकला सुंदर आणि खड्डेमुक्त शहर बनविण्यासाठी नागरिकांनी सध्याचा काहीसा त्रास समजून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. शहरात अलीकडे विविध दुर्घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून, या घटनांची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी दीपाली बेळे यांचे पती दिलीप बेळे, त्यांच्या तीन मुली, जावई आणि नातवंडे तसेच महापौर हिमगौरी आडके, नगरसेवक प्रवीण जाधव, नगरसेविका रूपाली नन्नावरे, रंजना भानसी, माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते आणि माजी जिल्हा परिषद सदस्या मनीषा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

दशक्रिया विधीच्या दिवशी मानसिक आधार

दीपाली बेळे यांचा रविवारी ( दि.२ ऑगस्ट ) दशक्रिया विधी होता. या पार्श्वभूमीवर मंत्री महाजन यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यामुळे बेळे कुटुबियांना काहीसा मानसिक आधार मिळाला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >