Saturday, August 1, 2026

चिरकारीची कथा

चिरकारीची कथा

- महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे

स्कंद पुराणानुसार ही कथा महर्षी नारदांनी महिसागर संगमाच्या तीर्थक्षेत्री उपस्थित असलेल्या ऋषीमुनींना सांगितली. पुरातन काळी अंगीरसाच्या वंशात असलेल्या महर्षी गौतम ऋषींना एक पुत्र होता. त्याला कोणतेही काम सांगितले, तर तो ते करण्याआधी फार विचार करीत असे व त्यामुळे त्याच्या कामाला वेळ होत असे. त्याच्या या वृत्तीमुळे लोक त्याला चिरकारी असे म्हणू लागले.

गौतम ऋषींची पत्नी एक महान पतीव्रता होती. मात्र एके दिवशी तिच्या हातून महर्षींच्या आज्ञापालनात चूक झाली. त्यामुळे गौतम ऋषींनी आपल्या मुलाला आपल्या पत्नीला म्हणजे त्याच्या मातेला ठार करण्याची आज्ञा केली. तेव्हा चिरकारानी संमती दर्शक मान हलविली. मात्र सवयीप्रमाणे चिरकारी विचार करू लागला, की पित्याची आज्ञापालन न करणे हे पाप आहे; परंतु जन्मदात्रीला मारणे हे महापाप आहे. त्याला प्रायश्चित्त नाही. पित्याने रागाच्या भरात ठार करण्याची आज्ञा केली आहे. त्यामुळे चिरकरी विचार करू लागला व या विचारात बरेच दिवस निघून गेले.

चिरकारीच्या मनात विचार येऊ लागले” माता, पिता हे परमेश्वरांचे सगुण साकार रूप आहेत. लहानपणी माता बालकाला न्हावू माखू घालते. त्याला प्रेमाने भरविते. अंगाई गीत म्हणून झोपविते. मुलाकडून झालेल्या चुका माफ करते. तसेच त्याच्यावर चांगले संस्कार करून त्याला सुसंस्कृत करण्याचे काम करते. वेळप्रसंगी रागावते, तर चांगल्या कामाचे कौतुकही करते. त्यामुळे आईच्या प्रेमाचे मोल चुकविणे शक्य नाही.

इकडे वनात गेलेल्या गौतम ऋषींचा राग शांत झाल्यावर त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली. रागाच्या भरात आपण पत्नीला ठार करण्याची आज्ञा केली, याबद्दल ते पश्चात्ताप करू लागले. ते ताबडतोब घरी परतले. पत्नीला जिवंत पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी पत्नीची क्षमा मागितली. चिरकारीच्या विचार करून कार्य करण्याच्या वृत्तीमुळेच आज आपण स्त्रीहत्तेसारख्या पापापासून वाचलो, हे कळून त्यांनी चिरकारीला मिठीत घेऊन त्यास आशीर्वाद देऊन उपदेश केला.

महर्षी गौतम चिरकारीला म्हणाले, “राग माणसाची बुद्धी नष्ट करतो. त्यामुळे रागाच्या भरात घेतलेले निर्णय हानिकारक ठरू शकतात. तेव्हा कोणतीही शिक्षा देण्यापूर्वी शांतडोक्याने विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे एखाद्या मोठ्या अनर्थापासून होणारी हानी टळू शकते. मात्र धर्मकार्यासाठी, साधुसंतांचे स्वागत करण्यासाठी, तसेच दानधर्म करण्यासाठी विलंब करू नये. पण आत्मसंरक्षणासाठी विलंब करणारा मूर्ख समजला जातो.

महिसागर संगमतीर्थ गुजरातमध्ये खंबातच्या आखातात आनंद जिल्ह्यातील वाहेडखडी गावाजवळ आहे. या महिसागर तीर्थाजवळ महीनदी अरबी समुद्राला मिळते. या मीलनालाच महिसागर संगम असे म्हणतात. या संगमावर धार्मिक विधी जसे स्नान, दान, श्राद्ध केल्याने अगणित व अक्षय पुण्य मिळते असा समज आहे. शनिवारी येणाऱ्या अमावस्येच्या योगावर या ठिकाणी केलेल्या स्नानाला गंगा व प्रयाग येथील स्थानाएवढेच महत्त्व असते असे मानले जाते. याच संगमावर स्तंभेश्वर महादेव मंदिर आहे. यालाच गुप्त महिसागर संगम तीर्थ असे म्हणतात. तारकासुराच्या वधानंतर कार्तिकेयाने येथेच शिवलिंगाची स्थापना केली, असा उल्लेख स्कंद पुराणात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा