Tuesday, August 25, 2026

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ?

मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या उत्सवात पुन्हा एकदा मूर्तिकलेचा एक अद्भुत नमुना भाविकांना पाहायला मिळणार आहे. 'बॅलन्सिंग' मूर्तींसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षीही एक भन्नाट आणि नेत्रदीपक कलाकृती घेऊन येत आहेत. गेल्या वर्षीच्या 'परळच्या महाराजा'च्या २२ फुटांच्या भव्य आणि एका टाचेवर उभ्या असणाऱ्या बॅलन्सिंग मूर्तीला जगभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. यंदाही भाविकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून अरुण दत्ते यांनी यावर्षी ६० ते ७० लहान-मोठ्या बॅलन्सिंग मूर्ती साकारल्या आहेत. (Arun Datte)

सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

अलीकडेच भुलेश्वर येथे घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलताना मूर्तिकार अरुण दत्ते यांनी सुरक्षिततेबाबत बोलताना ते म्हणाले, "माझ्याकडे १५ ते २४ फुटांपर्यंतच्या अनेक बॅलन्सिंग मूर्ती आहेत. परंतु, भाविकांची श्रद्धा आणि मूर्तीचे पावित्र्य जपताना विज्ञानाचे नियम पाळणे अत्यंत गरजेचे असते. मूर्तीचा समतोल अचूक राहावा यासाठी माझे सर्व अनुभवी कारागीर आणि वेल्डर्सची टीम प्रत्येक गोष्टीची पूर्वदक्षता घेते."

भुलेश्वर येथील दुर्घटनेवर दुःख व्यक्त करताना मूर्तिकार अरुण दत्ते यांनी सुरक्षेचा मुद्दा अतिशय गांभीर्याने मांडला. गणेशोत्सव हा आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा मुख्य सण असल्याने त्याला कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी त्यांनी गणेशोत्सव मंडळे आणि नवोदित मूर्तिकारांना सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. त्यांच्या मते, आगमन अथवा विसर्जनादरम्यान होणारे अपघात टाळण्यासाठी मंडळांनी अजिबात घाई करू नये. मूर्ती पूर्णपणे सुकलेली असावी आणि ती ज्या ट्रॉली, पाठ किंवा टेबलवर ठेवली जाणार आहे, ती व्यवस्था दणकट आहे का याची आधीच कारखान्यात जाऊन खात्री केली पाहिजे. अनेकदा ट्रॉली आणि पाठाच्या मजबुतीबाबत मूर्तिकारांना शंका असते; अशा वेळी मंडळांनी मूर्तिकारांच्या तांत्रिक सल्ल्याचा आदर करून त्यांचे ऐकले पाहिजे. याशिवाय, नवीन किंवा होतकरू मूर्तिकारांनी काम करताना संकोच न बाळगता ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. कलाकारांमधील परस्पर संवाद आणि मंडळांची योग्य पूर्वदक्षता यांमुळेच संभाव्य धोके टळून उत्सवाचा आनंद द्विगुणित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Arun Datte)

३५१ गणपतींची विशेष कलाकृती आणि पी.ओ.पी.बाबत दिलासा

यंदा अरुण दत्ते यांनी उल्हासनगरच्या एम.एम. ग्रुपसाठी एकाच मूर्तीवर ३५१ गणपती साकारण्याचा एक नवा आणि वेगळा अनुभव घेतला आहे. याशिवाय, उच्च न्यायालय आणि प्रशासनाकडून पी.ओ.पी. मूर्तींबाबत सध्या तरी सकारात्मक पाठिंबा आणि दिलासा मिळाल्यामुळे मूर्तिकारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. परळच्या महाराजासह यावर्षीच्या सर्व बॅलन्सिंग मूर्ती रस्त्यावर आगमनासाठी सज्ज झाल्या असून, भाविकांना पुन्हा एकदा अरुण दत्ते यांची ही अनोखी आणि आव्हानात्मक कलाकृती डोळ्यांत साठवून घेता येणार आहे. (Arun Datte)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >