Saturday, August 1, 2026

भारतीय शिक्षणतत्त्वज्ञानाचे शिल्पकार

भारतीय शिक्षणतत्त्वज्ञानाचे शिल्पकार

- आठवण; प्रा. डॉ. बाळासाहेब मुरादे

- लोकमान्य टिळकांना केवळ न्यू इंग्लिश स्कूल किंवा डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक म्हणून स्मरणे म्हणजे त्यांच्या कार्याचा केवळ एक छोटासा भाग पाहणे होय. त्यांनी शिक्षणाला राष्ट्रीय पुनर्जागरणाचे साधन बनवत विद्यार्थ्यांमध्ये स्वाभिमान, चिकित्सक विचार आणि राष्ट्रभक्ती निर्माण करणाऱ्या शिक्षणाचा पुरस्कार केला. त्यांच्या दृष्टीने शिक्षण म्हणजे व्यक्तिमत्त्व घडवण्याची, समाज बदलण्याची प्रक्रिया होती. १ ऑगस्ट रोजी येणाऱ्या त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त घेतलेला वेध.

शिक्षण ‌हे मनुष्याला केवळ उदरनिर्वाहाचे साधन देत नाही, तर त्याला राष्ट्राचे जबाबदार नागरिक बनवते.‌’ हा विचार आज अनेक शिक्षणतज्ज्ञ मांडतात; परंतु या संकल्पनेची बीजे भारतात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात रोवणाऱ्यांमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे स्थान अग्रक्रमाने घ्यावे लागेल. लोकमान्य टिळक यांचा उल्लेख झाला, की स्वराज्याची घोषणा, जहाल राष्ट्रवाद, केसरीचे निर्भीड संपादक, सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक किंवा मंडालेतील गीतारहस्य यांचा उल्लेख हमखास होतो; मात्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ते एक दूरदृष्टीचे शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांनी शिक्षणसंस्था उभारल्या; पण त्याहून मोठे कार्य म्हणजे भारतीय शिक्षणाचा आत्मा काय असावा, याची वैचारिक मांडणी केली. आज भारत राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून ज्ञानकेंद्रित, कौशल्याधारित आणि भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षणव्यवस्था घडवण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर टिळकांचे शैक्षणिक विचार अधिक समकालीन वाटतात. ब्रिटिशांनी भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया घातला, हा इतिहासाचा एक भाग असला, तरी त्या शिक्षणामागील उद्देश भारतीयांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडवणे नव्हता. मेकॉलेच्या शिक्षणधोरणातून प्रशासनासाठी कारकून तयार करणे, इंग्रजी जाणणारा मध्यमवर्ग निर्माण करणे आणि भारतीय समाजाला मानसिकदृष्ट्या ब्रिटिश साम्राज्याशी जोडून ठेवणे, हा हेतू होता. टिळकांनी या धोरणातील सर्वात मोठी उणीव ओळखली. त्यांच्या मते जे शिक्षण विद्यार्थ्याला आपल्या देशाचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि राष्ट्रीय अस्मिता विसरायला लावते, ते शिक्षण पूर्ण असू शकत नाही.

लोकमान्य म्हणत, की शिक्षणाने बुद्धी विकसित झाली पाहिजे; पण त्याचबरोबर स्वाभिमान आणि कर्तव्यभावनाही जागी झाली पाहिजे. टिळकांनी शिक्षणाला कधीही केवळ नोकरीचे साधन मानले नाही. त्यांच्या मते, शिक्षणाचा खरा उद्देश असा नागरिक घडवणे हा आहे. जो विचार करू शकेल, निर्णय घेऊ शकेल आणि देशासाठी जबाबदारी स्वीकारू शकेल. त्यांना वाटत होते, की परकीय राजवटीतून मुक्त होण्यासाठी सर्वप्रथम भारतीयांच्या मनातील गुलामगिरी नष्ट झाली पाहिजे. ही मानसिक मुक्ती केवळ शिक्षणातूनच शक्य आहे. त्यामुळे शिक्षण हे त्यांच्या दृष्टीने सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिवर्तनाचे प्रभावी माध्यम होते. १८८० मध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर आणि इतर सहकाऱ्यांसह टिळकांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. या शाळेची संकल्पना त्या काळासाठी अत्यंत क्रांतिकारक होती. ही शाळा ब्रिटिश सरकारच्या नियंत्रणाखाली नव्हती. येथे विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवले जात होते; पण त्याचबरोबर भारतीय इतिहास, संस्कृती, स्वाभिमान आणि नैतिक मूल्ये यांनाही तितकेच महत्त्व दिले जात होते. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारावेत, चिकित्सक दृष्टी विकसित करावी आणि समाजाशी जोडले जावे, हा या शिक्षणाचा आत्मा होता. टिळक स्वतः गणित आणि संस्कृतचे उत्कृष्ट शिक्षक होते. त्यांच्या अध्यापनात केवळ पाठांतराला स्थान नव्हते, तर तर्क, विश्लेषण आणि विचारशक्तीला प्राधान्य होते. त्यांच्या पुढाकारातून १८८४ मध्ये स्थापन झालेली डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही केवळ शिक्षणसंस्था नव्हती, तर राष्ट्रीय पुनर्जागरणाची चळवळ होती.

भारतीयांनी स्वतःच्या शिक्षणसंस्था उभाराव्यात, त्यांचे व्यवस्थापन करावे आणि शिक्षणाला राष्ट्रीय ध्येयाशी जोडावे, हा तिच्या स्थापनेमागील मूलभूत विचार होता. या संस्थेतून पुढे फर्ग्युसन महाविद्यालय अस्तित्वात आले. या महाविद्यालयाने पुढील अनेक दशकांमध्ये भारताला असंख्य विद्वान, प्रशासक, स्वातंत्र्यसैनिक आणि विचारवंत दिले. टिळकांना इंग्रजी भाषेचा द्वेष नव्हता. उलट जागतिक ज्ञान मिळवण्यासाठी इंग्रजी आवश्यक असल्याचे ते मान्य करत; पण प्राथमिक शिक्षण मातृभाषेत झाले पाहिजे, हा त्यांचा ठाम आग्रह होता. त्यांच्या मते, विद्यार्थ्याच्या विचारशक्तीचा विकास त्याच्या मातृभाषेत अधिक प्रभावीपणे होतो. परकीय भाषेत शिक्षण घेताना अनेकदा ज्ञानापेक्षा भाषेचा अडथळा मोठा ठरतो. आज राष्ट्रीय शिक्षण धोरणात मातृभाषेला दिलेले महत्त्व पाहिले, तर टिळकांचे विचार किती दूरदर्शी होते, याची जाणीव होते. टिळकांचा विश्वास होता, की ज्ञान आणि चारित्र्य यांची सांगड घातल्याशिवाय समाज प्रगत होऊ शकत नाही. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, प्रामाणिकपणा, धैर्य, कर्तव्यभावना आणि राष्ट्रप्रेम यांचे संस्कार होण्यावर भर दिला. आज उच्चशिक्षित व्यक्ती आर्थिकदृष्ट्या यशस्वी होत असल्या, तरी सामाजिक जबाबदारी, नैतिकता आणि सार्वजनिक जीवनातील मूल्यांचा अभाव दिसतो.

अशा परिस्थितीत टिळकांचे मूल्याधिष्ठित शिक्षण अधिक महत्त्वाचे वाटते. टिळक शिक्षकाला केवळ पगारासाठी काम करणारा कर्मचारी मानत नसत. त्यांच्या मते शिक्षक हा समाजाचा दीपस्तंभ असतो. तो विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील धडे शिकवत नाही, तर जीवन कसे जगावे, समाजासाठी कसे काम करावे आणि राष्ट्राशी नाते कसे जोडावे, हे शिकवतो. आज शिक्षकांवर प्रशासकीय कामांचा भार वाढत असताना आणि शिक्षणाचे व्यापारीकरण होत असताना टिळकांची ही भूमिका अधिक महत्त्वाची ठरते. टिळक स्वतः विद्वान संशोधक होते. ‌‘ओरियन, द आर्क्टिक होम इन द वेद‌’ आणि ‌‘गीतारहस्य‌’ यांसारखे ग्रंथ त्यांच्या संशोधक वृत्तीचे उदाहरण आहेत. त्यांच्या मते शिक्षण म्हणजे तयार उत्तरे स्वीकारणे नव्हे, तर प्रश्न विचारण्याची आणि सत्याचा शोध घेण्याची प्रक्रिया आहे. ही चिकित्सक वृत्तीच विद्यार्थ्यांना सर्जनशील बनवते. आज कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात माहिती सहज उपलब्ध आहे; पण विचार करण्याची क्षमता अधिक आवश्यक झाली आहे. म्हणूनच टिळकांचा हा दृष्टिकोन आजही तितकाच महत्त्वाचा आहे. टिळकांनी शिक्षणाला उद्योग, विज्ञान आणि स्वदेशी अर्थव्यवस्थेशी जोडले. त्यांच्या मते भारताने परकीय ज्ञान स्वीकारावे; पण स्वतःची बौद्धिक आणि आर्थिक क्षमता विकसित केली पाहिजे. आज ‌‘आत्मनिर्भर भारत‌’, ‌‘स्टार्टअप‌’, नवोपक्रम आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या चर्चेची तत्त्वे टिळकांच्या विचारांमध्ये पूर्वीपासूनच दिसून येतात. आज शिक्षणाचा विस्तार झाला आहे; पण गुणवत्ता, संशोधन, रोजगारक्षमता, मूल्यशिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांसारख्या प्रश्नांवर अजूनही काम करण्याची गरज आहे.

अनेक विद्यार्थी पदव्या घेतात; पण विचारशक्ती, समस्या सोडवण्याची क्षमता आणि सामाजिक संवेदनशीलता विकसित होत नाही. टिळकांच्या मते शिक्षणाने व्यक्तीला स्वतंत्र विचार करण्याची क्षमता दिली पाहिजे. परीक्षेतील गुण हे शिक्षणाचे अंतिम मोजमाप असू शकत नाही. आज राष्ट्रीय शिक्षण धोरणात भारतीय ज्ञानपरंपरा, मातृभाषा, कौशल्याधारित शिक्षण, बहुविषयक अभ्यास, संशोधन आणि मूल्यशिक्षण यांना महत्त्व दिले जात आहे. या सर्व संकल्पनांचा वैचारिक पाया टिळकांसारख्या शिक्षणतज्ज्ञांनी शंभर वर्षांपूर्वीच घातला होता. अर्थात, काळ बदलला आहे. तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, जागतिकीकरण आणि डिजिटल शिक्षणामुळे नवी आव्हाने निर्माण झाली आहेत; मात्र शिक्षणाचे मूलभूत उद्दिष्ट आजही तेच आहे, ते म्हणजे विचारशील, जबाबदार आणि सुसंस्कृत नागरिक घडवणे. लोकमान्य टिळकांना केवळ न्यू इंग्लिश स्कूल किंवा डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक म्हणून स्मरणे म्हणजे त्यांच्या कार्याचा केवळ एक छोटासा भाग पाहणे होय. त्यांनी शिक्षणाला राष्ट्रीय पुनर्जागरणाचे साधन बनवले. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, स्वाभिमान, चिकित्सक विचार, नैतिकता आणि राष्ट्रभक्ती निर्माण करणाऱ्या शिक्षणाचा पुरस्कार केला. त्यांच्या दृष्टीने शिक्षण हे माहितीचे ओझे नव्हते. ती व्यक्तिमत्त्व घडवण्याची, समाज बदलण्याची आणि राष्ट्र उभे करण्याची प्रक्रिया होती.

आज भारत जागतिक ज्ञानमहाशक्ती होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, टिळकांचे शिक्षणविषयक विचार पुन्हा अभ्यासण्याची आवश्यकता आहे, कारण त्यांनी आपल्याला केवळ शाळा आणि महाविद्यालये दिली नाहीत, तर भारतीय शिक्षणाला राष्ट्रीय आत्मा दिला. हीच त्यांची शिक्षणतज्ज्ञ म्हणून सर्वात मोठी ओळख आहे आणि आधुनिक भारतासाठीची चिरंतन देणगीही.

(लेखक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य आहेत.)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा