Thursday, July 30, 2026

Cabinet Meetings : आता कॅबिनेट बैठका होणार एअर इंडियाच्या इमारतीत

Cabinet Meetings : आता कॅबिनेट बैठका होणार एअर इंडियाच्या इमारतीत

२२ व्या मजल्यावर जागा; २३ व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे भव्य कार्यालय

मुंबई : मंत्रालयातील गर्दी आणि जागेची टंचाई दूर करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडून खरेदी केलेल्या नरिमन पॉईंट (Nariman Point) येथील 'एअर इंडिया' (Air India) इमारतीचे नूतनीकरण वेगाने सुरू आहे. मरीन ड्राईव्हच्या (Marine Drive) नयनरम्य परिसरात असलेल्या या २३ मजली गगनचुंबी इमारतीच्या २३ व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे भव्य 'सी-फेसिंग' कार्यालय आणि २२ व्या मजल्यावर मंत्रिमंडळ (Cabinet) बैठकांसाठी अत्याधुनिक हॉल उभारला जात आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका याच इमारतीतून (Building) पार पडणार आहेत.

वर्ष १९७२ मध्ये उभारण्यात आलेली ही २३ मजली इमारत कोणत्याही खासगी मालकीकडे जाऊ नये, यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर १ हजार ६०१ कोटी रुपयांना ही इमारत खरेदी करण्यात आली. या इमारतीची दुरुस्ती व अंतर्गत सजावटीसाठी शासनाने पुरवणी मागण्यांद्वारे १८१ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. या इमारतीवर आता 'महाराष्ट्र शासन' असा नामफलकही लावण्यात आला आहे.

मंत्रालयात पुरेशी जागा नसल्यामुळे राज्य सरकारचे अनेक महत्त्वाचे विभाग सध्या बाहेर भाड्याच्या जागेत चालवले जातात. यासाठी शासनाला जवळपास ९ लाख चौरस फूट जागेपोटी दरमहा तब्बल २०० कोटी रुपये भाडे मोजावे लागत आहे. आता आरोग्य भवन, वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, तसेच पाणी पुरवठा व स्वच्छता यांसारखे सर्व विभाग एअर इंडियाच्या इमारतीत एकाच छताखाली आणले जाणार आहेत. यामुळे प्रशासकीय सुलभता येण्यासोबतच राज्य सरकारच्या तिजोरीवरील प्रचंड आर्थिक भार कमी होणार आहे.

पुढील ३ ते ४ महिन्यांत नूतनीकरण पूर्ण होणार

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गेल्या दोन महिन्यांपासून या इमारतीचे नूतनीकरण सुरू असून पुढील ३ ते ४ महिन्यांत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. संपूर्ण इमारतीचे काम पूर्ण होण्याआधीच मुख्यमंत्र्यांचे कार्यालय असणारा २३ वा मजला आणि २२ व्या मजल्यावरील १३ हजार ३६३ चौरस फुटांचा 'कॅबिनेट हॉल' प्राधान्याने पूर्ण केला जाणार आहे. इमारतीमध्ये १५२ वाहनांच्या पार्किंगची सोय असून दोन्ही बाजूंनी स्वतंत्र प्रवेशद्वारे असल्याने येथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार नाही, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >