मुंबई : मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या उपाहारगृहे आणि खाद्यपदार्थ पुरवठादारांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक कारवाई सुरू केली आहे. वांद्रे येथील अतिश्रीमंत वर्गाचे पसंतीस्थान असलेल्या 'ऑटर्स क्लब'सह क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म 'झेप्टो' आणि इतर चार प्रमुख आस्थापनांमधील अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन उघडकीस आल्यानंतर एफडीएने कारवाईचा बडगा उगारला आहे. (FDA Action)
वांद्रे येथील कार्टर रोडवरील 'ऑटर्स क्लब'ची तपासणी केली असता ( Bandra Otters Club), तेथील धक्कादायक परिस्थिती समोर आली. क्लबच्या स्वयंपाकघरात तुटलेल्या फरश्या, तुंबलेली गटारे आणि खराब झालेले फ्रीज आढळले. सर्वात गंभीर म्हणजे, ग्राहकांना 'रेग्युलर पनीर'च्या नावाखाली 'अॅनालॉग' पनीर दिले जात असल्याचे निष्पन्न झाले. हे पनीर 'पंजाब सिंध डेअरी'कडून पुरवले जात असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले असून, वापरलेल्या तेलाच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणारी 'टीपीसी' चाचणीची कोणतीही नोंद तेथे ठेवण्यात आली नव्हती. (Maharashtra)
मुंबई : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल ...
याशिवाय ऑनलाइन खाद्यपदार्थ पुरवठादारही नियमांचे उल्लंघन करत असल्याचे कारवाईतून स्पष्ट झाले आहे. चेंबूर येथील 'झेप्टो'च्या डार्क स्टोअरमध्ये अन्नाच्या साठवणुकीसाठी आवश्यक असणारे तापमान राखले जात नव्हते. नियमानुसार मांस ५ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमानात ठेवणे बंधनकारक असताना ते ९ अंश सेल्सिअसवर ठेवले होते, तर गोठवलेले पदार्थ उणे १८ अंशांऐवजी उणे ११ अंशांवर होते. स्टोअरमध्ये झुरळांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छता आढळल्याने प्रशासनाने येथील कामकाज थांबवण्याचे आदेश दिले आहेत. ( Food Safety )
कुठे झुरळे, तर कुठे उंदीर
या मोहिमेत इतर चार आस्थापनांवरही प्रशासनाने कारवाई केली आहे. दहिसर येथील 'डेली फ्रेश बेकर्स अँड केक्स'मध्ये जमिनीवर केक तयार केले जात होते आणि तेथे झुरळे व मुंग्यांचा सुळसुळाट होता. खार येथील 'प्रिन्स ऑफ वेल्स रेस्टॉरंट'मध्ये अन्नाचे तापमान नियंत्रित नसल्याचे आणि कीटकनियंत्रणाचा अभाव असल्याचे आढळले. विलेपार्ले येथील 'राज ऑइल ट्रेडिंग'मध्ये उंदरांनी तेलाची पाकिटे कुरतडल्याचे दिसून आले, तर अंधेरी पूर्व येथील 'कॅफे सिफारिश'मध्येही स्वच्छतेच्या नियमांची पायमल्ली केल्यामुळे प्रशासनाने कारवाई केली आहे. ( License Suspension)





