मुंबई : मुंबईत ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली दोन ज्येष्ठ नागरिकांची तब्बल ७९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास करत मुंबई सायबर पोलिसांनी केरळमधून दोन आरोपींना अटक केली आहे. फसवणुकीची रक्कम ज्या बँक खात्यांमध्ये जमा झाली, त्यांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. (Mumbai Cyber Police)
मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा शिवसेना संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत उबाठा गटाच्या सोशल मीडिया ...
पहिलं प्रकरण
पहिल्या प्रकरणात दहिसर येथील ७५ वर्षीय निवृत्त आयकर अधिकाऱ्याला सायबर ठगांनी तब्बल ५१ लाख रुपयांचा गंडा घातला. फसवणुकीच्या रकमेचा माग काढत मुंबई पोलीस केरळपर्यंत पोहोचले. याप्रकरणी मुहम्मद सफवान अब्दुल हमीद याला १४ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्याला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणल्यानंतर न्यायालयाने पुढील तपासासाठी पोलीस कोठडी सुनावली. (Cyber Police)
दुसरे प्रकरण
दुसऱ्या प्रकरणात बोरिवलीतील ७६ वर्षीय निवृत्त महिलेची २८.७० लाख रुपयांची फसवणूक झाली. ७ ते २१ जुलैदरम्यान तिला कथित नाशिक पोलीस उपनिरीक्षकाचा फोन आला. तिच्या एटीएम कार्डमधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचे सांगून तिला अटकेची धमकी देण्यात आली.
यानंतर आरोपींनी महिलेला बनावट अटक वॉरंट आणि जप्तीचे आदेश पाठवले. अटक टाळण्यासाठी तसेच जामिनासाठी पैसे द्यावे लागतील, असे सांगून तिच्याकडून २८.७० लाख रुपये उकळण्यात आले.
तपासादरम्यान या रकमेपैकी ८.५० लाख रुपये केरळमधील एर्नाकुलम येथील एका खात्यात असल्याचे पोलिसांना आढळले. त्यानंतर एम. बी. ट्रेडर्सचे मालक शेजिमोन एम. के. यांना अटक करण्यात आली.
पुढील तपास सुरु
उत्तर सायबर पोलीस सध्या फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वीकारण्यासाठी वापरण्यात आलेल्या बँक खात्यांची तपासणी करत आहेत. या खात्यांमधून पुढे झालेल्या पैशांच्या व्यवहारांचा आणि रकमेच्या हालचालींचा मागोवा घेतला जात आहे. तसेच, या प्रकरणातील इतर खातेधारक, लाभार्थी आणि कथित सायबर फसवणूक नेटवर्कमधील सदस्यांची ओळख पटवण्याचे कामही पोलिसांकडून सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पीआय सुनील लोखंडे, एपीआय राहुल खेत्रे, पीएसआय रोहन अहिरे, एचसी परब, एचसी गवळी, पीसी शिंदे आणि पीसी गणेश चव्हाण यांच्या पथकाकडून करण्यात येत आहे. (Mumbai Police)
इतर आरोपींचा शोध सुरू
दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींनी पीडितांना अटकेची भीती दाखवून मानसिक दबाव आणला आणि पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. आता पोलीस या रकमेच्या पुढील व्यवहारांचा माग काढत असून, संबंधित बँक खाती, लाभार्थी आणि सायबर फसवणूक नेटवर्कमधील इतर सदस्यांचा शोध घेत आहेत.





