अनंत काळपर्यंत शब्दांमध्ये राहू…

आम्ही सोमैया विद्याविहार विद्यापीठात आयोजित केलेल्या चर्चसत्रात कवी डॉ. नरेंद्र पुंडरीक यांच्या कविता आणि कवी म्हणून ऐकण्याचा योग आला. साहित्य समजून घेताना आपला भाषिक अवकाश विस्तारत जाणे,नेहमी पूरक ठरते. पुंडरीक हे उत्तर प्रदेशमधील बांदा इथले कवी.हिंदीत त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांच्या मते “कवीच्या हाती कविता एका शस्त्रासारखी असते, जी माणसाला जागवेल आणि योग्य रस्ता दाखवेल. कवी कवितेच्या माध्यमातून केवळ निसर्गाचे चित्रण किंवा कल्पनेचे निरूपण करत नाही. कविता माणसाचे सुख-दुःख, संघर्ष आणि समाज वास्तव समोर ठेवते. ’’ १९५३ - ५४ च्या आसपास उत्तर प्रदेशमधील बांदा येथे जन्मलेला हा कवी, समीक्षक आणि संपादक. त्यांची कविता लोक जीवनाशी दृढपणे जोडली गेली आहे. त्यांची कविता निव्वळ फँटसी नाही ती बाजारीकरणाच्या विरोधात उभी राहून सामान्य माणसांची बाजू घेते. त्यांच्या एका कवितेत त्यांनी म्हटले आहे, “असे म्हटले जायचे की वाचन - लेखन माणसाला अधिक चांगला माणूस बनवते. पण आता माणसांची ओळख कपड्यांवरुन होते. जितके चांगले कपडे तितका माणूस चांगला असे लोक समजायला लागतात.” कृत्रिम पोशाखी सभ्यतेचे चित्र थेटपणे पुंडरीक रंगवतात.



त्यांच्या आणखी एका कवितेतला आशय मला भावला. त्या कवितेत आवश्यक गोष्टींमध्ये गहू, तांदूळ, छत, दरवाजा यांचा समावेश ते करत नाहीत. मात्र ‘एक अशी खिडकी जिच्यातून मोकळे आकाश दिसेल ‘ती त्यांना आवश्यक गोष्ट वाटते. अनेक अर्थांनी विकास, विशालता, निरभ्र मोकळपणा, विस्तीर्णता हे संदर्भ आकाशाशी जोडले आहेत. पुंडरीक यांच्या आणखी एका कवितेबद्दल बोलणे आवडेल मला. संघर्षशील, श्रमिक, स्वयंभू महिलांबद्दल त्यांच्या कवितेत विलक्षण आदर व्यक्त होतो. आयुष्यभर व्यसनी नवऱ्याचा अत्याचार आणि त्रास सहन करणाऱ्या एका बाईमध्ये झालेला बदल अतिशय भेदकपणे त्यांच्या एका कवितेत टिपला आहे . “ अचानक एके दिवशी ती आली तशी नाही, जशी ती पूर्वी यायची तिच्या चेहऱ्यात आणि पोशाखात खूप बदल झाले होते. एक असा विश्वास दिसत होता जो पतीच्या मृत्यूनंतर एका स्त्रीमध्ये निर्माण झाला होता” उभे आयुष्य सोसल्यानंतर अचानक अनुभवायला मिळालेले आणि तिच्या चेहऱ्यावर दिसणारे मुक्त मोकळेपण पुंडरीक यांनी किती सूचकपणे टिपले आहे. एका पुरुषाने हे व्यक्त करावे, याचे निश्चित अप्रूप वाटते. जाती, धर्म, वर्ग इत्यादींच्या भेदांचे बुरखे ओढून काढणे हे पुंडरीकांच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे. छोट्या छोट्या गोष्टी आणि घटना हा त्यांच्या कवितेचा भाग होतो. कवी त्याच्या भाषेतून लिहितो पण त्याची कविता एकाच भाषेपुरती मर्यादित राहात नाही. नरेंद्र पुंडरीकांसारखा ज्येष्ठ कवी म्हणूनच समर्थपणे लिहितो, “लिहिले तर अनंत काळपर्यंत शब्दांमध्ये राहू जेव्हा पुस्तके वाचली जातील, तेव्हा पुन्हा जीवित होऊ… आणि काळ्या रात्रीतही चमकू.”

वीणा सानेकर

Comments
Add Comment

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनामागील शांत, पण ठाम चेहरा : गीतांजली आंग्मो

पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या आंदोलनादरम्यान सर्वाधिक चर्चेत राहिले ते त्यांचे उपोषण

धोंडीबा

आमच्या संगमनेरहून गाडीने अर्धा-पाऊण तासाच्या अंतरावर असलेल्या सिन्नर या तालुक्यात, एमआयडीसी भागात, एक

शर्यत अजून संपलेली नाही

वेध-सीमा पवार आज महिलांनी शिक्षण, उद्योग, प्रशासन आणि विज्ञान अशा प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची छाप

मुंबई गुदमरतेय...

प्रासंगिक-विवेक कांबळे सात बेटांचे शहर असलेली मायानगरी मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानीच नाही, तर लाखो

चवीच्या मोहात आरोग्याचा विसर

मागोवा-वैष्णवी भोगले आजकाल घराबाहेर पडले, की प्रत्येक चौकात खाद्यपदार्थांचा वास जिभेला भुरळ पाडतो. मग ते तळलेले

पोलिसांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण नको!

विश्लेषण-प्रवीण दीक्षित नवी दिल्ली येथील जंतर-मंतर याठिकाणी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात