चवीच्या मोहात आरोग्याचा विसर

मागोवा-वैष्णवी भोगले


आजकाल घराबाहेर पडले, की प्रत्येक चौकात खाद्यपदार्थांचा वास जिभेला भुरळ पाडतो. मग ते तळलेले वडापाव, चटकदार पाणीपुरी, रंगीबेरंगी ज्यूस, आकर्षक मिठाया, चमचमीत बिर्याणी, मसालेदार चायनीज असो की गरमागरम समोसे... चव जिभेवर रेंगाळते आणि आपण क्षणाचाही विचार न करता ते पदार्थ खायला जातो. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फूड व्हिडीओंनी तर या सवयीला अधिक खतपाणी घातले आहे. पण या चमचमीत पदार्थांच्या मागे लपलेले वास्तव मात्र अंगावर काटा आणणारे आहे. आज महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या धडक कारवायांमुळे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्यभरात बनावट तूप, कृत्रिम पनीर, भेसळयुक्त मसाले, निकृष्ट तेल, कालबाह्य अन्नपदार्थ, दूषित मिठाई आणि दूध यावर सातत्याने धाडी टाकल्या जात आहेत. अनेक कारखाने सील करण्यात आले, परवाने रद्द झाले, गुन्हे दाखल झाले. या कारवायांनी एक गोष्ट स्पष्ट केली, आपल्या ताटापर्यंत पोहोचणाऱ्या अन्नाचा प्रवास जितका मोठा, तितकाच त्यात भेसळीचा धोका अधिक.

याच पार्श्वभूमीवर अभिनेता श्रेयस तळपडे यांची ‘द इंडिया स्टोरी’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेली मुलाखत अत्यंत बोलकी आहे. त्यांनी या मुलाखतीत एक प्रश्न विचारला, तुमच्या थाळीतील अन्न खरोखरच सुरक्षित आहे का? हा प्रश्न केवळ चित्रपटाचा प्रचार नाही, तर समाजाला जागे करणारा इशारा आहे. श्रेयस तळपदे सांगतो की, या चित्रपटाची पटकथा वाचल्यानंतर थोडा धक्काच बसला. अन्नभेसळीमुळे लोकांचे जीव जाऊ शकतात, कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात, हे समजल्यावर त्यांनी हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, आज घरचे अन्न खा, असे आपण म्हणतो; पण घरात येणारे तांदूळ, डाळी, तेल, दूध आणि मसालेच भेसळयुक्त असतील, तर घरचे अन्नही किती सुरक्षित आहे? हा प्रश्न प्रत्येक कुटुंबाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. श्रेयस तळपदे यांनी आणखी एक मुद्दा मांडला तो म्हणजे, आज ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय अन्नाच्या नावाखाली महागडी उत्पादने विकली जात आहेत. पण ती सामान्य माणसाच्या आवाक्यात आहेत का? जर सुरक्षित अन्न खाण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत असतील, तर गरीब आणि मध्यमवर्गीयांनी काय करावे? सुरक्षित अन्न हा श्रीमंतांचा विशेषाधिकार नसून प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. आज परिस्थिती अशी आहे की, बाजारात मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूकडे संशयाने पाहावे लागते. दूध भेसळयुक्त तर नाही ना? तूप शुद्ध आहे का? मिठाईतील रंग आरोग्यास अपायकारक तर नाहीत? फळे कृत्रिमरीत्या पिकवली आहेत का? भाज्यांवर धोकादायक रसायनांचा मारा झाला आहे का? या प्रश्नांची उत्तरे सामान्य ग्राहकाकडे नसतात. अलीकडे आपल्या वाचनात अन्नभेसळ केलेल्या अनेक बातम्या समोर येत आहेत. प्रसिद्ध हॉटेलांमधील अन्नात अळ्या किंवा पाली आढळणे, ताकात माशी, मिठायांमध्ये किडे दिसणे, फ्रीजमध्ये कुजलेले मांस सापडणे, भाजीपाला डबक्यात धुणे, रस्त्यावरील खाद्यपदार्थांसाठी अत्यंत अस्वच्छ पाण्याचा वापर होत असल्याचे उघड झाले. यामध्ये केवळ विक्रेत्यांची चूक नाही. तर ग्राहक म्हणून आपणही अनेकदा निष्काळजीपणा करतो. स्वस्तात मिळते, चविष्ट वाटते म्हणून किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे म्हणून आपण कोणत्याही ठिकाणी खायला जातो. स्वच्छता, परवाना, अन्नाचा दर्जा, वापरलेले तेल, साठवणूक याचा विचार फार कमी लोक करतात.


दरम्यान, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी केलेले एक विधानही विचार करायला लावणारे आहे. त्यांनी काही वसतिगृहांच्या पाहणीत विद्यार्थी जेवणासोबत ड्रग्ज आणि मद्यही मागवत असल्याचा दावा केला. या विधानावर राजकीय वाद झाला; परंतु त्या विधानामागील मूळ संदेश वेगळा आहे. आजच्या तरुणांच्या खाण्याच्या सवयी झपाट्याने बदलत आहेत. पोषक आहारापेक्षा फास्टफूड, प्रक्रिया केलेले पदार्थ, ऊर्जा पेये आणि व्यसनांकडे झुकणारी जीवनशैली वाढत आहे. त्यातच भेसळयुक्त अन्नाची भर पडली, तर पुढील पिढीच्या आरोग्याचे चित्र किती भयावह असेल, याची कल्पनाही करवत नाही. अन्नभेसळ ही केवळ ग्राहकांची फसवणूक नाही; तर नफा कमावण्यासाठी एखादा व्यापारी हजारो लोकांच्या आरोग्याशी खेळत असेल, तर त्याला केवळ दंड करून चालणार नाही. तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी कारवाई करत आहेत, ही निश्चितच समाधानाची बाब आहे; पण ही मोहीम एखाद्या अधिकाऱ्यावर अवलंबून राहता कामा नये. ती संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी बनली पाहिजे. यासाठी सरकारने प्रत्येक जिल्ह्यात आधुनिक अन्न तपासणी प्रयोगशाळा उभारणे, नियमित तपासण्या करणे, दोषींवर कारवाई करणे आणि ग्राहकांना तक्रार नोंदविण्याची सुलभ व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालये आणि समाजमाध्यमांतून सुरक्षित अन्नाविषयी जनजागृतीही तितकीच महत्त्वाची आहे; परंतु शेवटी एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा, आपण आपल्या मुलांच्या हातात नेमके काय देत आहोत? त्यांच्या डब्यात पोषण आहे की रसायने? त्यांच्या आवडत्या चिप्समध्ये चव आहे की आरोग्याचा ऱ्हास? आपण बाहेरून आणलेला प्रत्येक घास त्यांच्या भविष्यातील आजारांचे कारण ठरत नाही तर ना? आज गरज आहे ती केवळ भेसळखोरांविरोधात कारवाईची नाही, तर चवीपेक्षा आरोग्याची निवड करणाऱ्या समाजाची. कारण आपल्या ताटातील प्रत्येक घास सुरक्षित असेल, तरच आपल्या कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचे भविष्य निरोगी राहील.

Comments
Add Comment

शर्यत अजून संपलेली नाही

वेध-सीमा पवार आज महिलांनी शिक्षण, उद्योग, प्रशासन आणि विज्ञान अशा प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची छाप

मुंबई गुदमरतेय...

प्रासंगिक-विवेक कांबळे सात बेटांचे शहर असलेली मायानगरी मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानीच नाही, तर लाखो

पोलिसांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण नको!

विश्लेषण-प्रवीण दीक्षित नवी दिल्ली येथील जंतर-मंतर याठिकाणी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात

पावसाळ्यात पोटाचे संक्रमण टाळा

पावसाळ्यात, दमटपणा आणि साचलेल्या पाण्यामुळे जीवाणू, विषाणू आणि बुरशी यांची झपाट्याने वाढ होते. पाण्याचे स्रोत

आपली मुले

आशय-वीणा सानेकर आम्हा सर्व मित्र-मैत्रिणींची मुलं तेव्हा लहान होती. आई-बाबा म्हणून आम्ही चुकत माकत घडत होतो आणि

महिला सक्षमीकरणाचा मानबिंदू

वेध-सीमा पवार   भारतीय सशस्त्र दलात महिलांचे वाढते योगदान हे देशाच्या बदलत्या सामाजिक आणि व्यावसायिक