Wednesday, July 22, 2026

INS Malvan : भारतीय नौदलाची ताकद वाढली; नौदलाच्या ताफ्यात आता स्वदेशी पाणबुडीविरोधी युद्धनौका 'मालवण' दाखल

INS Malvan : भारतीय नौदलाची ताकद वाढली; नौदलाच्या ताफ्यात आता स्वदेशी पाणबुडीविरोधी युद्धनौका 'मालवण' दाखल

- नौदलाची सागरी सुरक्षा आणि पाणबुडीविरोधी क्षमता होणार आणखी बळकट

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात आणखी एक महत्त्वाची भर पडली असून स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित 'आयएनएस मालवण' (INS Malvan) ही अत्याधुनिक पाणबुडीविरोधी युद्धनौका (ASW-SWC) अधिकृतपणे नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. कर्नाटकातील कारवार नौदल तळावर झालेल्या समारंभात या युद्धनौकेचे कमिशनिंग करण्यात आले. 'आत्मनिर्भर भारत' अभियानांतर्गत तयार झालेली ही माहे श्रेणीतील दुसरी युद्धनौका असून भारतीय सागरी सुरक्षेला नवी धार मिळणार आहे. (INS Malvan)

कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर करून तयार करण्यात आलेली आयएनएस मालवण भारताच्या स्वदेशी युद्धनौका निर्मिती क्षमतेचे प्रभावी उदाहरण मानली जात आहे. या युद्धनौकेमुळे विशेषतः किनारी आणि उथळ सागरी भागांमध्ये भारतीय नौदलाची पाणबुडीविरोधी कारवाई अधिक प्रभावी होणार आहे. (INS Malvan)

उथळ समुद्रात शत्रूंसाठी मोठे आव्हान :

आयएनएस मालवण ही युद्धनौका शत्रूच्या पाणबुड्या, अंडरवॉटर ड्रोन आणि सागरी घुसखोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर अचूक कारवाई करण्यासाठी विशेष डिझाइन करण्यात आली आहे. यामध्ये अत्याधुनिक सोनार प्रणाली, लाइटवेट टॉर्पेडो आणि पाणबुडीविरोधी रॉकेट लाँचर बसविण्यात आले आहेत. सुमारे ८० मीटर लांबी आणि १,१०० टन विस्थापन क्षमता असलेली ही युद्धनौका अत्याधुनिक वॉटर-जेट प्रोपल्शन प्रणालीने सुसज्ज आहे. त्यामुळे उथळ पाण्यातही ती सहज हालचाल करू शकते आणि ताशी सुमारे ४६ किलोमीटर (२५ नॉट्स) इतका वेग गाठू शकते. (INS Malvan)

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

'मालवण' नावामागे मराठी अभिमान :

या युद्धनौकेला महाराष्ट्रातील ऐतिहासिक किनारी शहर 'मालवण'चे नाव देण्यात आले आहे. तिच्या प्रतीकचिन्हात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेले 'वाघनख' समाविष्ट करण्यात आले आहे. हे प्रतीक धैर्य, चपळता आणि अचूक हल्ल्याचे प्रतिनिधित्व करते. (INS Malvan)

समुद्रातील 'सायलेंट किलर' :

उच्च दर्जाचे स्वदेशी तंत्रज्ञान, आधुनिक शस्त्रसज्जता आणि अचूक पाणबुडीविरोधी क्षमता यामुळे आयएनएस मालवणला समुद्रातील 'सायलेंट किलर' असेही संबोधले जात आहे. शत्रूच्या हालचालींचा गुप्तपणे मागोवा घेऊन आवश्यकतेनुसार अचूक हल्ला करण्याची क्षमता या युद्धनौकेत आहे. (INS Malvan)

वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची उपस्थिती :

कमिशनिंग सोहळ्यास हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पश्चिमी नौदल कमांडचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल संजय वात्सायन, कोचीन शिपयार्ड लिमिटेडचे प्रतिनिधी, नौदलातील वरिष्ठ अधिकारी, माजी सैनिक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. (INS Malvan)

सागरी सुरक्षेसाठी बहुराष्ट्रीय सरावही सुरू :

दरम्यान, भारतीय नौदल २० ते २३ जुलैदरम्यान कोची येथे 'ऑपरेशन सदर्न रेडीनेस 26-2' या बहुराष्ट्रीय सागरी सुरक्षा प्रशिक्षण सरावाचे आयोजन करत आहे. ४० हून अधिक देशांच्या संयुक्त सागरी दलाच्या (Combined Maritime Forces) सहकार्याने होणाऱ्या या सरावातून सागरी सुरक्षा, प्रशिक्षण आणि समन्वय अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.

भारतीय नौदलात आयएनएस मालवणच्या (INS Malvan) समावेशामुळे देशाची किनारी सुरक्षा, पाणबुडीविरोधी क्षमता आणि स्वदेशी संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भरता आणखी मजबूत झाली असून, हिंद महासागर क्षेत्रातील भारताचे सामरिक स्थान अधिक बळकट होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >