पावसाळ्यात, दमटपणा आणि साचलेल्या पाण्यामुळे जीवाणू, विषाणू आणि बुरशी यांची झपाट्याने वाढ होते. पाण्याचे स्रोत सहजपणे दूषित होऊ शकतात आणि दमट हवेमुळे अन्न लवकर खराब होते. त्याच वेळी, या हवामानात आपली पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे पोट अधिक संवेदनशील बनते. दूषित पाणी आणि अन्नातील जंतू यांमुळे पोटाचे विकार, अन्नविषबाधा, जुलाब, उलट्या आणि कावीळसारख्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे या दिवसांत खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. अन्नसुरक्षेचे नियम पाळण्याबरोबरच रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवली, तर अनेक संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळू शकते. सुरक्षित पाणी आणि ताजे अन्न महत्त्वाचे पावसाळ्यात नेहमी उकळलेले, गाळलेले किंवा शुद्ध केलेले पाणीच प्यावे. बाहेर मिळणारे पाणी वापरणे टाळावे. घराबाहेर जाताना स्वतःची पाण्याची बाटली बरोबर ठेवणे ही चांगली सवय आहे.
रस्त्यावरील उघडे खाद्यपदार्थ, आधीच कापलेली फळे आणि सॅलड खाणे शक्यतो टाळावे. घरचे ताजे आणि गरम अन्न हा सर्वात सुरक्षित पर्याय ठरतो. शिळे किंवा दीर्घकाळ साठवलेले अन्न खाणे टाळावे. अन्नाच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास ते फेकून देणे अधिक योग्य ठरते.फळे-भाज्या स्वच्छ धुवा पालेभाज्या आणि फळांवर चिखल, जंतू किंवा सूक्ष्म कीटक असू शकतात. त्यामुळे त्या वाहत्या पाण्याखाली नीट धुवाव्यात. शक्य असल्यास काही वेळ मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवाव्यात. भाज्या कच्च्या खाण्याऐवजी शिजवून खाल्ल्यास संसर्गाचा धोका कमी होतो. स्वयंपाकघराची स्वच्छता आवश्यक दमट वातावरणामुळे स्वयंपाकघरात जंतू आणि बुरशी वाढण्याची शक्यता अधिक असते. स्वयंपाकाची जागा, भांडी आणि अन्नसाठा स्वच्छ व कोरडा ठेवावा. अन्न नेहमी झाकून ठेवावे आणि कोरडे पदार्थ हवाबंद डब्यांत साठवावेत.प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल? मजबूत रोगप्रतिकारशक्ती शरीराला संसर्गाविरुद्ध लढण्यास मदत करते. त्यामुळे आहारात जीवनसत्त्वांनी समृद्ध मोसमी फळे, भाज्या, लिंबूवर्गीय फळे, आवळा, आले, लसूण, हळद आणि तुळस यांचा समावेश करावा. गरम सूप, हर्बल चहा आणि ताजे, पचायला हलके घरगुती अन्न अधिक लाभदायक ठरते.पावसाळ्यात तहान कमी लागत असली तरी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. कोमट किंवा सामान्य तापमानाचे पाणी आणि हर्बल पेये शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यास मदत करतात.नियमित हलका व्यायाम, पुरेशी झोप आणि तणावमुक्त जीवनशैलीही प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी महत्त्वाची आहे. तसेच हात वारंवार धुणे, पावसात भिजल्यानंतर लगेच कोरडे कपडे घालणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे या सवयींमुळे संसर्गाचा धोका कमी होतो.
कोणती लक्षणे धोक्याची?
काही वेळा योग्य काळजी घेऊनही संसर्ग होऊ शकतो. सतत उलट्या किंवा जुलाब, न उतरणारा ताप, तीव्र पोटदुखी, निर्जलीकरण, डोळे किंवा त्वचा पिवळी पडणे आणि तीव्र अशक्तपणा अशी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींनी विलंब न करता उपचार घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यातील काही साध्या सवयी—सुरक्षित पाणी, स्वच्छ अन्न, चांगली स्वच्छता आणि संतुलित आहार—यांचे पालन केल्यास पोटाचे संक्रमण आणि इतर मोसमी आजारांपासून मोठ्या प्रमाणात संरक्षण
मिळू शकते.