प्रासंगिक-विवेक कांबळे
माणसाच्या मूलभूत गरजांपैकी सर्वांत महत्त्वाच्या असलेल्या अन्नातच किती मोठ्या प्रमाणावर भेसळ सुरू आहे, हे गेल्या काही दिवसांत एफडीएने केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. त्यामुळे आपण जे अन्न खातो ते खरोखरच सुरक्षित आहे का? हा प्रश्न आता सर्वसामान्यांना सतावत आहे.तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून राज्यभरात कारवायांचा धडाका लावला आहे. आतापर्यंत राज्यभरात ९०४ ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यातून ३४.६६ कोटी रुपयांचा प्रतिबंधित आणि भेसळयुक्त माल जप्त करण्यात आला. २३५ गुन्हे दाखल झाले, ४५७ जणांना अटक करण्यात आली आणि २७४ आस्थापना सील करण्यात आल्या. ही राज्यातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या अन्नसुरक्षा मोहिमांपैकी एक आहे. या आकड्यांवरून स्पष्ट होते, की भेसळीचा हा धंदा किती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. छाप्यांमध्ये सापडलेला माल पाहिला तर काळजी वाटते. त्यात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू तर आहेच, पण त्याहून धोकादायक म्हणजे, नकली दूध, नकली पनीर आणि निकृष्ट दर्जाचा मावा. रसायने आणि व्हे प्रिमिक्स पावडर वापरून दूध बनवले जात आहे. एक्सपायरी झालेले अन्नपदार्थ तारीख बदलून पुन्हा विकले जात आहेत.
विचार करा, सकाळी सकाळी आपल्या मुलांना दिलेले ग्लासभर दूध, सणाला घरी बनवलेली बासुंदी, लग्नात वाढलेली पनीरची भाजी, यात जर भेसळ असेल तर? दूध हे संपूर्ण आहार मानले जाते. त्यातच जर पाणी, युरिया किंवा रसायन मिसळले असेल, तर कॅल्शियम आणि प्रोटीनऐवजी आपण चक्क आजार विकत घेतोय... लहान मुलांच्या वाढीवर, गर्भवती महिलांच्या आरोग्यावर आणि वृद्धांच्या किडनीवर याचा थेट परिणाम होतो.निकृष्ट मावा आणि कालबाह्य पदार्थांमुळे फूड पॉयझनिंग, कावीळ, पोटाचे विकार तर वाढतातच, पण त्याहून गंभीर म्हणजे दीर्घकाळ अशा अन्नाचे सेवन केल्याने कर्करोग, हार्मोनल बिघाड आणि प्रतिकारशक्ती कमी होण्याचा धोका असतो. ९०४ ठिकाणी छापे आणि ३४ कोटींची जप्ती म्हणजे ही काही एक-दोन दुकानदारांची लबाडी नाही. ही एक संघटित साखळी आहे. उत्पादक, घाऊक विक्रेता, वाहतूकदार आणि किरकोळ विक्रेता या सगळ्यांचा यात सहभाग आहे. नफ्यासाठी माणसांच्या आरोग्याशी खेळणारे हे एक मोठे रॅकेट आहे.
सगळ्यात वाईट बाब म्हणजे याचे बळी सर्वसामान्य नागरिक होतात. महागाईमुळे स्वस्त पर्याय शोधणारा मध्यमवर्गीय आणि गरीब माणूसच या भेसळीच्या जाळ्यात अडकतो. त्याला माहितीही नसते की तो काय खात आहे. तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये धाक निर्माण झाला आहे. ४५७ जणांना अटक आणि २७४ आस्थापना सील यामुळे "दंड भरून मोकळे होऊ" ही मानसिकता मोडली आहे. ‘अन्नात भेसळ केली तर सुटका नाही’ हा संदेश यातून गेला आहे. यासाठी तुकाराम मुंढे यांचे मनापासून आभार.परंतु, एका मोहिमेने हा प्रश्न सुटणार नाही. अशा धडक मोहिमा अधूनमधून होऊन उपयोग नाही. वर्षभर, दर महिन्याला अचानक तपासणी झाली पाहिजे. म्हणजे प्रत्येक व्यापाऱ्याला कधीही छापा पडू शकतो ही भीती राहील.गुन्हे दाखल होऊन वर्षानुवर्षे केस चालतात. तोपर्यंत आरोपी जामिनावर बाहेर येऊन पुन्हा धंदा सुरू करतात. त्यामुळे अशी प्रकरणे फास्टट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर त्यांचा निकाल लागला पाहिजे आणि दोषींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून पुन्हा दुसरा कोणी भेसळ करायला घाबरेल. अन्नसुरक्षा ही फक्त एफडीएची जबाबदारी नाही. ती सरकारची, उत्पादकांची, विक्रेत्यांची आणि आपलीही आहे. तुकाराम मुंढे यांनी काडी टाकली आहे. आता त्याची आग होऊन संपूर्ण व्यवस्था स्वच्छ झाली पाहिजे.
भेसळमुक्त अन्न हा आपला अधिकार आहे आणि तो मिळवण्यासाठी आता आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आपणही वैयक्तिक पातळीवरही काही गोष्टी नक्की करू शकतो. प्रत्येक नागरिकाने खाद्यपदार्थांचे बिल मागितलेच पाहिजे, पॅकिंगवर FSSAI चा लोगो, बॅच नंबर आणि एक्सपायरी डेट तपासली पाहिजे. घरात, शाळा आणि महाविद्यालयांत अन्नसुरक्षेचे धडे दिले पाहिजेत. कारण, एकदा आरोग्य गेले की ते परत मिळवता येत नाही आणि ते जपायचे असेल तर सुरुवात आपल्या ताटापासूनच करावी लागेल.