मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केल्याने राज्य प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सतर्क केली आहे. राज्यातील संवेदनशील भागांमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) 17 आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (SDRF) 6 पथकांची तैनाती करण्यात आली असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. (Maharashtra Heavy Rain)
मान्सून काळातील संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी पालघर आणि नागपूर येथे प्रत्येकी दोन NDRF पथके, तर पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि धाराशिव येथे प्रत्येकी एक पथक तैनात करण्यात आले आहे. याशिवाय मुंबईत चार NDRF पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. SDRF ची सहा पथकेही धुळे, नागपूर, नांदेड आणि गडचिरोली येथे तैनात असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देण्यासाठी सज्ज आहेत. (Maharashtra Heavy Rain)
राज्यात अनेक ठिकाणी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. लोणावळ्यात तब्बल 670 मिमी पाऊस झाला असून ताम्हिणी येथे 580 मिमी, अंबोना येथे 537 मिमी, जुहू विमानतळ परिसरात 325 मिमी, विभाग येथे 305 मिमी, माथेरान येथे 302 मिमी, कर्जत येथे 291.5 मिमी, निलशी येथे 275 मिमी, भिवपुरी येथे 266 मिमी, मुळशी येथे 230 मिमी, भाईंदर येथे 188.5 मिमी, पनवेल येथे 182.5 मिमी, तर मुंबईतील सांताक्रूझ येथे 151.2 मिमी आणि कुलाबा येथे 128 मिमी पावसाची नोंद झाली आहे. (Maharashtra Heavy Rain)
मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असून, आज म्हणजेच ...
दरम्यान, माथेरान, लोणावळा, खोपोली आणि लोहगड परिसरात मुसळधार पावसामुळे भूस्खलनाचा धोका वाढला असून या भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्र (SEOC) कडून GEO-DSS प्रणालीच्या माध्यमातून धोक्याचे विश्लेषण करून संबंधित जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सातत्याने सतर्कतेचे संदेश पाठविण्यात येत आहेत. (Maharashtra Heavy Rain)
अतिवृष्टीमुळे राज्यातील वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. खोपोली येथे पाणी साचल्यामुळे जुना मुंबई-पुणे महामार्ग बंद करण्यात आला आहे. तसेच पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे. मंकी हिल ते ठाकूरवाडीदरम्यान दरडी कोसळल्यामुळे पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे. दरडी हटवून रस्ते आणि रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. (Maharashtra Heavy Rain)
मावळ तालुक्यातील घोरावाडी (तळेगाव दाभाडे) येथे पुराच्या पाण्यात 25 प्रवाशांसह एक बस अडकली होती. NDRF च्या पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका केली. तसेच मावळमधील पाटण येथे दरड कोसळून एक घर मातीखाली दबले असून तीन ते चार जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तेथे बचावकार्य सुरू असून NDRF ची टीम घटनास्थळी कार्यरत आहे. (Maharashtra Heavy Rain)
मुंबई : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी झाडे आणि झाडांच्या फांद्या ...
दरम्यान, मुंबईतील मानखुर्द परिसरात झोपडपट्टीवर इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. (Maharashtra Heavy Rain)
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने नागरिकांना नदी, नाले, धबधबे आणि दरडप्रवण भागांपासून दूर राहण्याचे, अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळण्याचे आणि हवामान विभाग व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. (Maharashtra Heavy Rain)






