मुंबई : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी झाडे आणि झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत बृहन्मुंबई महानगरपालिकेने मंगळवार, ७ जुलै २०२६ रोजी महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सर्व सार्वजनिक उद्याने दिवसभर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (BMC Park)
महापालिकेच्या माहितीनुसार, रविवार (५ जुलै) आणि सोमवार (६ जुलै) या दोन दिवसांत मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळी वाऱ्यांमुळे महानगरपालिका क्षेत्रात, खासगी हद्दीतील झाडांसह, सुमारे ४०० झाडे उन्मळून पडली असून तब्बल ६०० झाडांच्या फांद्या तुटल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत. (BMC Park)
या सर्व घटनांची माहिती मिळताच महापालिकेच्या उद्यान विभागाने तातडीने मदतकार्य सुरू केले. विभागीय कार्यालये, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, मुंबई अग्निशमन दल आणि इतर संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून झाडे व फांद्या हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. विशेषतः ज्या ठिकाणी वाहतुकीत अडथळे निर्माण झाले होते किंवा नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता, अशा ठिकाणी प्राधान्याने कार्यवाही करण्यात आली. (BMC Park)
मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आल्याने इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ...
महापालिकेची पथके आवश्यक यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाच्या मदतीने दिवसरात्र काम करत असून बहुतांश ठिकाणी झाडे आणि फांद्या हटविण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ठिकाणीही काम वेगाने सुरू असून नागरिकांनी संबंधित ठिकाणी सुरक्षित अंतर राखावे, काम सुरू असलेल्या परिसरात गर्दी करू नये तसेच आवश्यक असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. (BMC Park)
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी पुन्हा एकदा जोरदार वाऱ्यांचा आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटणे, झाडे कोसळणे किंवा अन्य अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून ७ जुलै रोजी सर्व महापालिका उद्याने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (BMC Park)
मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उद्या म्हणजेच मंगळवार ७ जुलैसाठी ऑरेंज अलर्ट ...
महापालिकेने नागरिकांना आपल्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित दिवशी उद्यानांमध्ये जाणे टाळावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन केले आहे. हवामानातील बदलाचा आढावा घेऊन पुढील निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (BMC Park)






