Monday, July 6, 2026

Nashik Crime : फेसबुकवरील ‘फ्रेंडशिप’ ठरली कोट्यवधींचा सापळा ! नाशिक सायबर पोलिसांनी उघड केला 5.45 कोटींचा नोकरी घोटाळा

Nashik Crime : फेसबुकवरील ‘फ्रेंडशिप’ ठरली कोट्यवधींचा सापळा ! नाशिक सायबर पोलिसांनी उघड केला 5.45 कोटींचा नोकरी घोटाळा

Nashik Crime : फेसबुकवर मैत्री, मंत्रालयात ओळख असल्याचा दावा अन सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष आणि त्यानंतर कोट्यवधी रुपयांची फसवणूक. नाशिकमध्ये सायबर पोलिसांनी अशाच एका हायटेक रॅकेटचा पर्दाफाश केला असून, सुरुवातीला ९७ लाख रुपयांचा वाटणारा हा गुन्हा आता तब्बल ५ कोटी ४५ लाख रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात बदलला आहे.

सरकारी नोकरीच्या नावाखाली आर्थिक घोटाळा

सोशल मीडियाचा गैरवापर करून बेरोजगार तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या टोळीने सरकारी नोकरीच्या नावाखाली मोठा आर्थिक घोटाळा उभा केल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. फेसबुकवरून मैत्री करून विश्वास संपादन करायचा आणि त्यानंतर मंत्रालयातील ओळखीच्या जोरावर शासकीय कोट्यातून नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळायचे, अशी या टोळीची कार्यपद्धती होती. या प्रकरणात शंभूराजे देशमुख उर्फ सचिन हंबीरराव पाटील आणि त्याचा साथीदार रवींद्र शांताराम कदम यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना अतिरिक्त सत्र न्यायालयाने गंभीर निरीक्षणे नोंदवत जामीन फेटाळला आहे.

हुबेहूब बनावट लेटरहेड,सह्या अन नियुक्तीपत्रे

सायबर पोलिसांच्या (Nashik Cyber ​​Police) माहितीनुसार, संशयित फेसबुकवरून विशेषतः सुशिक्षित आणि बेरोजगार तरुणांचा शोध घेत होते. मैत्री वाढवल्यानंतर सरकारी विभागात भरती सुरू असल्याचे सांगत मंत्रालयात थेट ओळख असल्याचा दावा केला जात होता. नोकरी निश्चित मिळेल, असे आश्वासन देत उमेदवारांकडून टप्प्याटप्प्याने लाखो रुपये घेतले जात होते. यासाठी संशयितांनी स्वतःचे वैयक्तिक क्यूआर कोड वापरून पैसे स्वीकारले. एवढेच नव्हे तर, संशय येऊ नये म्हणून विविध सरकारी विभागांची हुबेहूब बनावट लेटरहेड, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या, शिक्के आणि नियुक्तीपत्रे तयार करून उमेदवारांना दिली जात होती.

असा झाला घोटाळा उघड

काठे गल्ली परिसरातील ४३ वर्षीय व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीमुळे या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. १३ एप्रिल रोजी नाशिक शहर सायबर पोलिस ठाण्यात (Nashik City Cyber ​​Police Station) तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार राजेश भारती, शंभूराजे देशमुख उर्फ सचिन पाटील, स्वाती भारती आणि संबंधित बँक खातेधारकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. सुनावणीदरम्यान संशयितांच्या वकिलांनी फिर्यादीत सचिन पाटीलचे नाव नसल्याचा आणि रवींद्र कदमने तक्रारदाराचे पैसे परत केल्याचा युक्तिवाद केला. मात्र सरकारी पक्षाने हा दावा फेटाळून लावत, तक्रारदाराच्या नातेवाईकांना नोकरी लावण्यासाठीच २० लाख ५० हजार रुपये कदमच्या खात्यात जमा झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

बँक खात्यात कोट्यवधी रुपये जमा

यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे, तपासात रवींद्र कदमच्या (Ravindra Kadam) बँक खात्यात तब्बल ५ कोटी ४५ लाख ५ हजार ४१२ रुपये जमा झाल्याचे उघड झाले. या पैशांचा कोणताही वैध स्रोत किंवा हिशेब संशयितांकडे नसल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, मुख्य संशयित सचिन पाटीलच्या खात्यातही सुमारे ४८ लाख रुपयांचे व्यवहार आढळून आले आहेत. आतापर्यंत तक्रारदार आणि इतर काही तरुणांची मिळून ९७ लाख ७९ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. मात्र, संशयितांच्या खात्यातील कोट्यवधींचे व्यवहार पाहता या रॅकेटचे बळी ठरलेल्यांची संख्या यापेक्षा कितीतरी मोठी असू शकते, असा संशय तपास यंत्रणांना आहे.

आता सायबर पोलीस या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास करत असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, किती जणांची फसवणूक झाली आहे आणि कोट्यवधी रुपयांचा पैसा नेमका कुठे गेला, याचा शोध घेत आहेत. या तपासातून आणखी मोठे धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >