Monday, July 6, 2026

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

Mumbai  : खेड, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठा पूर आला आहे. या पुराचा फटका संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत दाखल झालेल्या लाखो वारकऱ्यांना बसला असून, शहरातील अनेक भाग जलमय झाल्याने वारकऱ्यांच्या निवास, भोजन आणि इतर मूलभूत सुविधांवर परिणाम झाला आहे.

पुराच्या पाण्यामुळे शासन आणि प्रशासनाने उभारलेल्या अनेक सुविधा बाधित झाल्या असून वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार(Sumetra Pawar) यांनी वारकऱ्यांना सध्या आळंदी व देहूकडे येणे टाळण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन व प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.

या नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत मुंबई डबेवाले कामगार व कार्यकारिणीने आळंदीतील धर्मशाळेत वारकऱ्यांच्या निवासासह भोजनाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष  उल्हासभाऊ मुके, मंडळ अध्यक्ष रामदास करवंदे, ट्रस्ट सचिव विनोद शेटे, सचिव  किरण गवांदे तसेच कार्यकारिणी सदस्यांच्या पुढाकारातून ही सेवा राबविण्यात येणार आहे.

"या नैसर्गिक संकटाच्या काळात मुंबई डबेवाले वारकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. वारकऱ्यांना आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," अशी ग्वाही मुंबई डबेवाले संघटनेचे प्रवक्ते  विष्णू काळडोके यांनी दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >