Monday, July 6, 2026

Pune Landslide : पुण्यातील मावळ तालुक्यात घरावर दरड कोसळली; कुटुंब अडकल्याची भीती, NDRFचे बचावकार्य सुरू

Pune Landslide : पुण्यातील मावळ तालुक्यात घरावर दरड कोसळली; कुटुंब अडकल्याची भीती, NDRFचे बचावकार्य सुरू

पुणे : मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पाटण गावात सोमवारी पहाटे मोठी दुर्घटना घडली. एका घरावर दरड कोसळल्याने संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले आहे. (Pune landsilde)

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मावळचे तहसीलदार आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अद्याप अधिकृतरीत्या कोणतीही जीवितहानी झाल्याची पुष्टी करण्यात आलेली नाही. (Maval News)

या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) पुणे येथील ५व्या बटालियनचे पथकही घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. निरीक्षक रविंदर यांच्या नेतृत्वाखाली आणि सहाय्यक कमांडंट चंद्रकेतू शर्मा यांच्या देखरेखीखाली ३० सदस्यांचे पथक आवश्यक बचाव साहित्यांसह सकाळी ५.५० वाजता पाटण गावाकडे रवाना झाले.

दरम्यान, परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने बचावकार्य काळजीपूर्वक सुरू असून, प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासनाने नागरिकांसाठी आपत्ती व्यवस्थापन हेल्पलाईन क्रमांकही जारी केले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि PMRDAच्या आपत्ती प्रतिसाद दलाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >