असं कसलं प्रेम?

स्क्रोल स्टोरी-साक्षी माने



प्रेम… हा शब्द उच्चारला की प्रत्येकाच्या मनात वेगवेगळी चित्रं उभी राहतात. कोणाला पहिल्या भेटीचं स्मित आठवतं, कोणाला पावसातला एकत्र चाललेला रस्ता, तर कोणाला आयुष्याच्या कठीण काळात न बोलता हात धरून उभा राहिलेला माणूस. प्रेमाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते, पण त्याचा गाभा एकच असतो - विश्वास, काळजी, जबाबदारी आणि साथ. खरं तर आजही प्रेम बदललेलं नाही, बदलली आहे ती फक्त ते व्यक्त करण्याची भाषा.


काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. रशियातील एका हजारो फूट उंच इमारतीच्या अगदी टोकावर उभा राहून एक तरुण आपल्या प्रेयसीला लग्नाची मागणी घालत होता. एका हातात अंगठी, दुसऱ्या हातात तिचा हात आणि पायाखाली काळजाचा ठोका चुकवणारी खोल दरी! काही सेकंदांचा तो व्हिडीओ पाहतानाही अंगावर काटा येतो. केवळ एका चुकीच्या पावलाने दोन जीवांसह अनेक कुटुंबांचं आयुष्य क्षणात उद्ध्वस्त झालं असतं. पण म्हणतात ना, 'प्रेमासाठी वाटेल ते...' याचाच प्रत्यय हा क्षण देत होता. त्या व्हिडीओखाली 'कपल गोल्स!', 'हेच खरं प्रेम!', 'असं प्रपोजल मिळालं तर आयुष्य धन्य!' अशा हजारो प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. पण, त्या काही सेकंदांच्या थराराने मनामध्ये एक कायमचा प्रश्न निर्माण केला, प्रेम सिद्ध करण्यासाठी खरंच जीव धोक्यात घालावा लागतो का? खरं तर, आजही प्रेम बदललेलं नाही, बदलली आहे ती फक्त ते व्यक्त करण्याची भाषा! एकेकाळी प्रेमाला अशा जीवघेण्या प्रदर्शनाची गरज नव्हती. तेव्हा नजरेच्या एका कोपऱ्यातून भावना व्यक्त व्हायच्या. एखादं पत्र वर्षानुवर्षं काळजापाशी जपलं जायचं. स्टेशनवर निरोप देताना डोळे पाणावायचे. आजारपणात रात्रभर जागणं, संकटात खंबीरपणे पाठीशी उभं राहणं आणि संसाराच्या सुख-दुःखात खांद्याला खांदा लावून चालणं… हीच तर प्रेमाची खरी भाषा होती."



आज मात्र मोबाईलचा कॅमेरा आणि सोशल मीडियाने प्रेमालाही एका वेगळ्याच शर्यतीत उभं केलं आहे. कोणाचं प्रपोजल सर्वात हटके? कोणाचा सरप्राइज सर्वात महाग? कोणाचा व्हिडीओ सर्वाधिक व्हायरल? कोणाला जास्त लाईक्स? नकळत प्रेमापेक्षा त्याचं प्रदर्शन अधिक महत्त्वाचं ठरू लागलं आहे. यातूनच धोकादायक ट्रेंड जन्माला येतात. उंच इमारती, कड्यांची टोकं, धबधब्यांच्या कडा, रेल्वे रूळ, वेगाने धावणाऱ्या गाड्या… या सगळ्या जागा प्रेम व्यक्त करण्याची ठिकाणं बनू लागतात. काही सेकंदांचा थरार नक्कीच रोमँटिक वाटतो; पण त्या काही सेकंदांच्या चुकीची किंमत अनेकदा संपूर्ण कुटुंबाला आयुष्यभर मोजावी लागते.



नुकतंच महाराष्ट्राला हादरवून सोडणारं पुण्याजवळील लोहगड प्रकरणही ताज आहे. त्या घटनेचं स्वरूप पूर्णपणे वेगळं होतं. तिथे कुणालाही प्रसिद्धी मिळवायची नव्हती; उलट घरच्या दबावाखाली ठरलेल्या लग्नातून सुटका करण्यासाठी एक कट रचल्याचा आरोप समोर आला आणि एका निष्पाप तरुणाचा जीव गेला. त्या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया आपलं काम करेलच; पण त्या घटनेने एक कटू सत्य पुन्हा अधोरेखित केलं, भावनांवर विवेकाचा ताबा सुटला की प्रेम उरत नाही, फक्त विनाश उरतो. एका चुकीच्या निर्णयामुळे फक्त एक व्यक्ती मरत नाही; त्याच्यासोबत अनेक स्वप्नंही कायमची मरून जातात. ज्या घरात लग्नाच्या खरेदीची चर्चा सुरू असते, तिथे अचानक अंत्यसंस्काराची तयारी सुरू होते. आईच्या डोळ्यांतील स्वप्नं एका क्षणात तुटून पडतात. वडिलांच्या आयुष्याचा आधार निघून जातो. भावंडांच्या आयुष्यात कायमची पोकळी निर्माण होते. किती भयावह वास्तव आहे हे! परंतु शेवटी उरतं ते फक्त दुःख… आणि आयुष्यभर न भरून येणाऱ्या जखमा.



अशा अनेक घटना घडत राहतात. काही काळ त्या चर्चेचा विषय ठरतात. काही दिवसांनी लोक त्यांना विसरून जातात. नवीन घटना घडते, नवीन ट्रेंड सुरू होतो. पण एखाद्या घरात मात्र वेळ तिथेच थांबलेली असते. रिकामी खुर्ची तशीच राहते. दाराकडे लागलेले डोळे तसेच राहतात. मोबाईलमध्ये जपून ठेवलेले फोटो पाहताना त्या माऊलीचे डोळे पुन्हा पुन्हा भरून येतात. वडील नकळत मुलाचा नंबर शोधतात. भावंडं अजूनही त्याच्या आठवणीत हरवून जातात आणि एक कुटुंब रोज थोडं-थोडं तुटत राहतं. खरंतर प्रेम म्हणजे कोणताही स्टंट नाही. प्रेम म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी जीवाशी खेळणं नाही. प्रेम म्हणजे समोरच्याला सुरक्षित ठेवणं. त्याच्या भीतीत त्याचा आधार होणं. त्याच्या अपयशात त्याचा हात न सोडणं. त्याच्या स्वप्नांसाठी स्वतःची काही स्वप्नं बाजूला ठेवणं. "मी तुझ्यासाठी मरेन," हे वाक्य बोलणं सोपं आहे. पण "मी तुझ्यासोबत आयुष्यभर जगीन," हे रोज आपल्या कृतीतून सिद्ध करणं, हाच प्रेमाचा खरा अर्थ आहे.



आज समाज म्हणून आपणही स्वतःला एक प्रश्न विचारण्याची गरज आहे. आपण नेमकं कोणाचं कौतुक करतो आहोत? धोकादायक कृत्यांना लाखो लाईक्स देऊन आपण नकळत अशा प्रकारांना प्रोत्साहन तर देत नाही ना? कारण सोशल मीडियावर जे दिसतं, तेच संपूर्ण सत्य असतं असं नाही. अनेक व्हिडीओंच्या मागे सुरक्षा व्यवस्था, नियोजन, कॅमेरे आणि संपादन असतं. पण ते पाहणाऱ्या एखाद्या तरुणाला हे दिसत नाही; त्याला दिसतं फक्त व्हायरल होण्याचं आकर्षण.खरं प्रेम मात्र कधीच व्हायरल होत नाही. ते आई-वडिलांचा आदर करण्यात दिसतं. जोडीदाराच्या आजारपणात रात्रभर जागण्यात दिसतं. त्याच्या अपयशात खंबीरपणे उभं राहण्यात दिसतं. संसाराच्या छोट्या-छोट्या जबाबदाऱ्या हसत स्वीकारण्यात दिसतं. कॅमेऱ्याला न दिसणाऱ्या या क्षणांमध्येच आयुष्यभर टिकणारं प्रेम फुलत असतं. आजच्या तरुणांनी प्रेम करावं… मनापासून करावं. मोठी स्वप्नं पाहावीत. आयुष्य भरभरून जगावं. पण एक गोष्ट कधीही विसरू नये, आपल्या आयुष्यावर फक्त आपलाच हक्क नसतो. त्या आयुष्याशी आई-वडिलांची स्वप्नं जोडलेली असतात, जोडीदाराचं भविष्य जोडलेलं असतं, भावंडांच्या आशा जोडलेल्या असतात आणि आपल्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या अनेक माणसांचा श्वास जोडलेला असतो. काही सेकंदांच्या मौजमजेसाठी, काही हजार लाईक्ससाठी किंवा एका चुकीच्या निर्णयासाठी हे सगळं पणाला लावण्याइतकं कोणतंच प्रेम मोठं नसतं.



प्रेम सिद्ध करायचं असेल तर उंच इमारतीच्या टोकावर उभं राहू नका; कठीण प्रसंगी जोडीदाराच्या बाजूला उभे राहा. महागडी सरप्राइज देण्यापेक्षा विश्वास द्या. जगाला दाखवण्यापेक्षा ज्याच्यावर प्रेम करता, त्याला रोज ते जाणवू द्या. कारण व्हायरल होणारे व्हिडीओ काही दिवसांनी विसरले जातात. लाईक्स कमी होतात. कमेंट्स थांबतात. पण एका निष्काळजी क्षणाने गेलेला जीव कधीच परत येत नाही… आणि त्या एका क्षणानंतर एखाद्या आईच्या डोळ्यांतील पाणी आयुष्यभर आटत नाही. म्हणून प्रेमाचं खरं शिखर हजारो फूट उंच इमारतीवर नसतं… ते दोन हृदयांमधल्या विश्वासाच्या पायावर उभं असतं. प्रेम सिद्ध करण्यासाठी जीव धोक्यात घालू नका; कारण तुमच्या एका चुकीच्या निर्णयाने फक्त तुमचं आयुष्य संपत नाही, तर तुमच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या अनेक माणसांचं आयुष्यही कायमचं उद्ध्वस्त होतं.खरं प्रेम मरण्याचं कारण बनत नाही… ते जगण्याची हिंमत देतं. हात सोडण्याचं नाही, तर शेवटच्या श्वासापर्यंत हातात हात घेऊन चालत राहण्याचं वचन देतं आणि म्हणूनच प्रेमाचं सर्वात उंच शिखर इमारतीच्या टोकावर नसतं… ते विश्वास, जबाबदारी, त्याग आणि आयुष्यभर एकमेकांची साथ निभावण्यात असतं.

Comments
Add Comment

खाद्यसंस्कृतीचा जागतिक दस्तावेज

नोेंद- अनिता बागवे छायाचित्र म्हणजे केवळ दृश्य नोंद नाही; ती एक कथा असते, हे सिद्ध करणारी 'वर्ल्ड फूड फोटोग्राफी

महिला शेतकऱ्यांना न्याय

फोकस-संदीप खांडगेपाटील   राज्य सरकारमुळे महिला शेतकऱ्यांना आता खऱ्या अर्थांने न्याय मिळाला. शेतात राबणाऱ्या

व्हॉट्सॲपवर ‘युजरनेम’: ओळख नवी अन् धोकेही नवे!

प्रासंगिक-विवेक जाधव   जगभरात तीन अब्जांहून अधिक लोक वापरत असलेल्या व्हॉट्सॲपमध्ये लवकरच एक महत्त्वाचा बदल

प्रेमात हरवलेली माणुसकी

मागोवा-वैष्णवी भोगले प्रेम... हा शब्द उच्चारला की डोळ्यांसमोर विश्वास, आपुलकी, त्याग आणि एकमेकांसाठी जगण्याची

'शुद्धते'चा बुरखा आणि पुरुषी मानसिकतेची झापड

प्रासंगिक-विवेक कांबळे नमध्ये डेटॉलच्या लाँड्री सॅनिटायझरच्या जाहिरातीवरून सध्या वादळ उठलेले आहे. पण, ही केवळ

कन्यादान की जबाबदारीचा अंत?

वेध-सीमा पवार मुलीला "परकी" समजणारी मानसिकता बदलली पाहिजे. कन्यादान म्हणजे मुलीशी असलेले नाते संपणे नाही.