Saturday, July 25, 2026

Devendra Fadnavis : देशी गायीकडे ज्या शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले त्यांचे नुकसान झाले, मुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्य

Devendra Fadnavis : देशी गायीकडे ज्या शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले त्यांचे नुकसान झाले, मुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्य

नागपूर (Nagpur) : भारत देश हा कृषी संस्कृतीचा होता. देश संपन्न होता. दूध,दही भरपूर प्रमाणात होते. हे समृद्धीचे प्रतीक आहे. या कृषी संस्कृतीच्या केंद्रस्थानी गोमाता होती. गोमातेपासून दूध,दही, शेण, गोमुत्र अशा बहुपयोगी वस्तू शेतकऱ्यांना मिळत होत्या. आपली देशी गाय जन्मापासून मृत्यूपर्यंत फक्त देत असते. तीला चारा, पाणी कमी लागते. प्रदूषणही कमी करणारी देशी गाय आहे. या देशी गायीमुळे शेतकरी समृद्ध होता. परंतु तीचे महत्त्व कमी होत गेले. परिणामी शेती रसातळाला गेली आणि शेतकरीही देशोधडीला लागला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले. ते नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृहात राज्यमाता गोमाता संवाद यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात बोलत होते.

पशुसंवर्धन विभाग आणि हाराष्ट्र गोसेवा आयोगाच्यावतीने या संवाद यात्रेच आयोजन करण्यात आले होते. गोसेवा, गोसंवर्धन आणि भारतीय संस्कृतीतील गोमातेचे महत्त्व जनमानसात रुजवण्यासाठी २२ जूनला यात्रेची सुरुवात झाली. एक हजारहून अधिक गोशाळांनी यात सहभाग नोंदवला. १५ हजार गोशाळा संचालक, गोसेवक, गोपालक आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यात आला. २९ जिल्ह्यातून यात्रेचा प्रवास झाला. समारोपाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री तसेच गृह राज्यमंत्री पंकज भोयर,(Pankaj Bhoyal) वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार माया इवनाते, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त किरण पाटील, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा आदी उपस्थित होते.

रासायनिक खत आणि जनुकीय बियाणांचा वापर वाढला आहे. प्रथम यामुळे फायदा झाला. परंतु आता जमिनीची उत्पादन क्षमता कमी होत आहे. त्यामुळे आता पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळावे लागणार आहे. नैसर्गिक शेतीचा केंद्र बिंदू गोमाताच आहे. नैसर्गिक शेतीपासून उत्पादकता वाढत आहे, असेही मुख्यंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत २००६-०७ मध्ये एक अहवाल आला. ज्या शेतकऱ्यांकडे गोधन आहे, त्यांनी आत्महत्येचा विचार केला नाही. तर ज्यांच्याकडे गोमाता नव्हती त्यांनी आत्महत्येचा विचार केला. गोमातीही आधार देणारी आहे. अनेक देशांनी भारतीय गायी नेल्या. तिथे आता दूधाची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. गोशाळा या गोशक्तीचे केंद्र झाले पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

गो-आधारित अर्थव्यवस्थेतून शेतकरी समृद्धीचा मार्ग

आपल्या संस्कृतीत गायीला आईचा दर्जा देण्यात आला आहे. विषमुक्त अन्ननिर्मितीसाठी आणि मानवाच्या आरोग्यासाठी गोमातेचे संवर्धन ही आजच्या काळातील सर्वात मोठी गरज बनली आहे. भारताला गीर, राठी, थारपारकर, लाल सिंधी, देवणी यांसारख्या देशी गायींचा मोठा इतिहास आहे.

गोमाता नैसर्गिक शेतीचा केंद्रबिंदू असून आज समाजात गोवंशाबद्दल मोठी जागृती निर्माण होत आहे. चांगल्या दर्जाचे दूध देणाऱ्या देशी गाईंच्या माध्यमातून एक मोठी अर्थव्यवस्था उभी राहू शकते. आपल्याला केवळ पारंपरिक गोपालनावर मर्यादित न राहता 'गो-आधारित अर्थव्यवस्था' उभी करावी लागेल. आपल्या गोशाळा या केवळ निवारा केंद्र न राहता 'गोशक्ती' आणि 'संशोधन' केंद्र म्हणून विकसित झाल्या पाहिजेत. आज शेतकऱ्यांसमोर 'एल निनो'सारखी नैसर्गिक आणि इतर अनेक संकटे आहेत. अशा परिस्थितीत आपण गो-आधारित अर्थव्यवस्था निर्माण केली, तर शेतकरी कोणत्याही संकटाचा सामना करू शकतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचा 'गो 10' ब्रँड लाँच केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >