Sunday, July 5, 2026

Tree Collapsed In Mumbai : मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्याचा तडाखा! १४२ झाड/फांदी पडण्याच्या घटना; २ दुर्दैवी मृत्यू

Tree Collapsed In Mumbai : मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्याचा तडाखा! १४२ झाड/फांदी पडण्याच्या घटना; २ दुर्दैवी मृत्यू

मुंबई: ताशी ७२ ते ७५ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाने मुंबईला झोडपून काढले असून बृहन्मुंबई क्षेत्रात झाडे व फांद्या पडण्याच्या तब्बल १४२ घटनांची नोंद झाली आहे. या संपूर्ण परिस्थितीत महापालिकेची यंत्रणा सतर्क असून सुमारे १० हजार अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष मैदानात कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Tree Collapsed In Mumbai)

दरम्यान, गेल्या २४ तासांत मुंबईत सुमारे १५० ते १७० मिमी पावसाची नोंद झाली असून, संततधार पाऊस आणि समुद्राला मोठी भरती असूनही शहरातील जनजीवन तुलनेने सुरळीत राहिले. विशेष म्हणजे, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही कोठेही पाणी साचल्याची गंभीर घटना नोंदवली गेली नाही, तसेच रेल्वे वाहतूकही सुरळीत सुरू होती. (Tree Collapsed In Mumbai)

हवामान खात्याचा रेड अलर्ट; प्रशासन सतर्क

भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षातून सतत परिस्थितीचा आढावा घेतला आणि सर्व यंत्रणांना अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले. महानगरपालिकेच्या सर्व परिमंडळ उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, अभियंते, आरोग्य कर्मचारी, पंपचालक तसेच आपत्कालीन पथकांना प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात उपस्थित राहण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. (Tree Collapsed In Mumbai)

झाडे पडण्याच्या १४२ घटना; तातडीने कारवाई :

ताशी ७२–७५ किमी वेगाने वाऱ्यांमुळे मुंबईत झाडे व फांद्या पडण्याच्या एकूण २७६ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी १४२ घटना प्रत्यक्ष झाडे/फांद्या पडल्याच्या होत्या. महापालिका कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवाई करत रस्ते मोकळे केले आणि वाहतूक सुरळीत केली. पावसाळापूर्व कामांतर्गत उद्यान विभागाने १,६२,६७६ झाडांचे सर्वेक्षण, १,०३,००० झाडांची छाटणी तर ६४८ धोकादायक झाडे हटवली असल्याची माहितीही देण्यात आली आहे. (Tree Collapsed In Mumbai)

दुर्दैवी घटना: दोन मृत्यू

या वादळी परिस्थितीत दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कुर्ला कमानी परिसरात झाडाची फांदी कोसळून युनूस कुंडावाला (६३) यांचा मृत्यू झाला, तर आरे कॉलनीतील युनिट १३ परिसरात झाड कोसळून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. (Tree Collapsed In Mumbai)

आणखी घटना; काही ठिकाणी बांधकाम कोसळले :

वरळी डेअरीजवळ खान अब्दुल गफार खान मार्गावर तीन मजली रिकामे बांधकाम कोसळल्याची नोंद झाली आहे. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली.

प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा :

महापालिका आयुक्तांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतत फिल्डवर राहून परिस्थितीवर नजर ठेवण्याचे निर्देश दिले असून, कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास तात्काळ प्रतिसाद देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईत सध्या संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडमध्ये कार्यरत आहे. (Tree Collapsed In Mumbai)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >