Tuesday, June 30, 2026

India in Venezuela : व्हेनेझुएलामधील भारताची मदत मोहीम अधिक तीव्र; चोवीस तास मोफत वैद्यकीय सेवा सुरू

India in Venezuela : व्हेनेझुएलामधील भारताची मदत मोहीम अधिक तीव्र; चोवीस तास मोफत वैद्यकीय सेवा सुरू

व्हेनेझुएला : ऑपरेशन ‘अमिस्ताद’ (Amistad)अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलामध्ये तैनात भारतीय लष्कराचे फील्ड हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने कार्यरत झाले असून ते चोवीस तास मोफत वैद्यकीय सेवा देत आहे.

व्हेनेझुएलातील भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, अनुभवी डॉक्टरांच्या भारतीय वैद्यकीय पथकाने काराकास येथील आंतरराष्ट्रीय ला रिंकोनाडा रेसट्रॅक येथे वैद्यकीय छावणी उभारली आहे. सोमवारी या छावणीने पूर्ण क्षमतेने काम सुरू केले असून सर्व वैद्यकीय सेवा नागरिकांना विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, भारतीय लष्कराचे फील्ड हॉस्पिटल भूकंपग्रस्तांना पूर्ण क्षमतेने वैद्यकीय मदत पुरवत आहे. भारतीय हवाई दलाच्या माहितीनुसार, ऑपरेशन ‘अमिस्ताद(Amistad)’ अंतर्गत सी-१७ ग्लोबमास्टर या दोन मालवाहू विमानांद्वारे व्हेनेझुएलामध्ये ६६ टन मदतसामग्री पोहोचवण्यात आली आहे. यामध्ये भारतीय लष्कराचे फील्ड हॉस्पिटल, ३५ टनांहून अधिक मदतसाहित्य, औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि दोन ‘भीष्म क्यूब्स’(Bhishma Cubes') यांचा समावेश आहे. ‘सहयोग, हित आणि मैत्री’ (भीष्म) क्यूब्स ही भारताची आरोग्यविषयक आपत्कालीन पुढाकार असून, ही अत्याधुनिक मोबाईल रुग्णालये आहेत. आपत्तीच्या काळात तातडीच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे.

गेल्या बुधवारी सायंकाळी व्हेनेझुएलामध्ये ७.२ आणि ७.५ रिश्टर तीव्रतेचे दोन शक्तिशाली भूकंप झाले. हे भूकंप गेल्या शंभरहून अधिक वर्षांतील सर्वाधिक तीव्र भूकंपांपैकी एक मानले जात आहेत. रविवारी मृतांचा आकडा १,७०० वर पोहोचला असून हजारो जण जखमी झाले आहेत, तर अनेक नागरिक अद्याप बेपत्ता आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >