Monday, August 10, 2026

Japan warn US : अमेरिकन प्रचारात ॲनिमे व गेम्सचा वापर, जपानने अमेरिकेला सुनावले

Japan warn US : अमेरिकन प्रचारात ॲनिमे व गेम्सचा वापर, जपानने अमेरिकेला सुनावले

टोकियो : जागतिक मुत्सद्देगिरीत एक अत्यंत अनोखा वाद समोर आला आहे. जगभरात लोकप्रिय असलेल्या जपानी संस्कृतीची ओळख ठरलेल्या 'ॲनिमे' आणि 'व्हिडिओ गेम्स'च्या पात्रांचा अमेरिकन सरकारच्या प्रचारात वापर केल्याने जपान संतापला आहे. अहवालानुसार, जपानने अत्यंत कडक शब्दांत अमेरिकेला सरकारी पोस्ट आणि राजकीय मीम्स मध्ये जपानी बौद्धिक संपदांचा बेकायदेशीर वापर तातडीने थांबवण्यास सांगितले आहे. जपानी परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेला ठणकावून सांगितले आहे की, कोणाच्याही बौद्धिक संपदेचा वापर करण्यापूर्वी, मग ती सरकारी असो किंवा सार्वजनिक संस्था असो, क्रिएटरची (निर्मात्याची) परवानगी घेणे अनिवार्य आहे. तथापि, जपानने अद्याप अमेरिकेविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही, परंतु याला एक गंभीर मुत्सद्देगिरीचा मुद्दा मानले आहे.

संबंधित जपानी कंपन्या आणि हक्कधारकांनी या राजकीय प्रचारापासून स्वतःला तातडीने वेगळे करत स्पष्ट केले आहे की, राजकीय प्रोपगंडा किंवा मीम्समध्ये या पात्रांचा वापर करणे पूर्णपणे बेकायदेशीर असून ते आंतरराष्ट्रीय कॉपीराइट कायद्यांचे उल्लंघन आहे. 'पोकेमॉन कंपनी'ने स्पष्ट केले की, त्यांचा अमेरिकन व्हिडिओशी काहीही संबंध नाही. तर 'युगीओ'ने सांगितले की, त्यांचे क्रिएटर्स आणि ॲनिमे कर्मचारी या राजकीय आशयात सामील नाहीत.

कार्टून आणि पॉप-कल्चर ही कोणत्याही देशाची मजबूत आर्थिक आणि सांस्कृतिक संपत्ती मानली जाते. जापानी ॲनिमे आणि मांगा उद्योगाचे जागतिक बाजारमूल्य २०२६ पर्यंत सुमारे ₹२.५ लाख कोटी आहे. एकट्या 'पोकेमॉन' मीडिया फ्रँचायझीने मर्चेंडाइज, गेम्स आणि चित्रपटांच्या माध्यमातून आतापर्यंत ८.३ लाख कोटींचा एकूण महसूल मिळवला आहे. 'हॅलो किटी', 'ड्रॅगन बॉल' आणि 'सुपर मारियो' यांचा व्यवसाय मोठ्या टेक कंपन्यांच्या वार्षिक महसुलाला टक्कर देतो.

  1. पोकेमॉन आणि इमिग्रेशन: स्थलांतर कायद्यावर कडक भूमिका दर्शवण्यासाठी 'पोकेमॉन' थीमवर आधारित व्हिडिओ बनवण्यात आला. तसेच 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' मोहिमेतही पोकेमॉनचा वापर करण्यात आला.
  2. मारियो आणि नासा मिशन: व्हाईट हाऊसने 'आर्टिमिस २' मिशनच्या प्रसिद्धीसाठी 'सुपर मारियो'च्या फुटेजचा वापर केला.
  3. नारुतो आणि ट्रम्प: एआयद्वारे तयार केलेल्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना प्रसिद्ध ॲनिमे पात्र 'नारुतो'च्या रूपात दाखवण्यात आले.
  4. युगीओ आणि सैन्य: अमेरिकन लष्करी कारवाईच्या प्रचारासाठी 'युगीओ' या ॲनिमेच्या दृश्यांचा जसाच्या तसा वापर करण्यात आला.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >