Monday, June 29, 2026

Devendra Fadnavis : नसरापूर'सारख्या गंभीर प्रकरणांत न्याय वेगाने मिळण्यासाठी प्रयत्न करू

Devendra Fadnavis : नसरापूर'सारख्या गंभीर प्रकरणांत न्याय वेगाने मिळण्यासाठी प्रयत्न करू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या वेगवान न्यायदानाचे विधानसभेत कौतुक

मुंबई : "पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील ३ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिच्या झालेल्या हत्येचे प्रकरण अत्यंत अमानुष होते. या खटल्यात पोलीस, सरकारी पक्ष आणि न्यायालयाने दाखवलेल्या तत्परतेमुळे अवघ्या ५९ दिवसांत आरोपीला तिहेरी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायव्यवस्थेतील हे एक आदर्श उदाहरण असून, आगामी काळातही अशा गंभीर स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये पीडितांना अत्यंत वेगाने न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल," असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत व्यक्त केला. नसरापूर प्रकरणातील नराधम भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने तिहेरी फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात या ऐतिहासिक न्यायदानाबाबत विशेष निवेदन केले.

विधानसभेत माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी या संपूर्ण खटल्याच्या वेगवान घटनाक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, या संवेदनशील प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी अत्यंत सक्षमपणे काम करत अवघ्या १४ दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर केवळ १६ दिवसांच्या कालावधीत तब्बल ५५ साक्षीदारांच्या साक्षी, तपासणी आणि उलटतपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. २४ तास तत्पर राहून पोलिसांनी गोळा केलेले ठोस वैज्ञानिक व परिस्थितीजन्य पुरावे आणि विशेष सरकारी वकिलांनी न्यायालयात मांडलेली प्रभावी बाजू यामुळेच या नराधमाला फाशीची शिक्षा देणे शक्य झाले आहे. २५ जून २०२६ रोजी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले होते आणि २९ जून २०२६ रोजी त्याला तिहेरी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. घटना घडल्यापासून अवघ्या ५९ दिवसांत संपूर्ण न्यायप्रक्रिया पूर्ण करून शिक्षा झाल्याने हा राज्याच्या न्यायव्यवस्थेतील एक महत्त्वाचा टप्पा आणि नवीन बेंचमार्क ठरला आहे.

न्यायाधीशांनी सुट्ट्या रद्द करून घेतली सुनावणी

"पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी स्वतःच्या सुट्ट्या रद्द करून या प्रकरणाची नियमित आणि सातत्यपूर्ण सुनावणी घेतली. अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये समाजातील गुन्हेगारांना जरब बसण्यासाठी गतीने न्याय मिळणे अत्यंत आवश्यक असते. न्यायमूर्ती साळुंखे(Salukhe) यांनी वेगवान न्यायदानासाठी घेतलेला हा पुढाकार अत्यंत कौतुकास्पद आहे," अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. तसेच सक्षम तपास करणाऱ्या पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांसह त्यांच्या संपूर्ण टीमचे आणि सरकारी वकिलांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. पालकांचे दुःख भरून निघणार नाही, पण...

मुख्यमंत्री म्हणाले की, समाजात अशा अमानुष घटना घडूच नयेत ही आपल्या सर्वांची अपेक्षा आहे. मात्र, दुर्दैवाने अशी घटना घडल्यास पोलीस, सरकारी वकील आणि न्यायालय यांनी समन्वयाने काम केले, तर अत्यल्प कालावधीत गुन्हेगाराला कठोर शिक्षा होऊ शकते हे या प्रकरणाने सिद्ध केले आहे. पीडित चिमुकलीच्या पालकांचे दुःख कोणत्याही शिक्षेने कधीही भरून निघणारे नाही; परंतु न्यायालयाने दिलेल्या या तिहेरी फाशीच्या निर्णयामुळे त्यांना न्याय मिळाल्याची भावना नक्कीच मिळेल, असे भावुक उद्गारही त्यांनी काढले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >