Thursday, June 25, 2026

Minister Uday Samant : नाशिकमध्ये शेतकऱ्यांसाठी उभारणार अद्ययावत शीतगृह; महापालिकेकडून जागा उपलब्ध होणार

Minister Uday Samant : नाशिकमध्ये शेतकऱ्यांसाठी उभारणार अद्ययावत शीतगृह; महापालिकेकडून जागा उपलब्ध होणार

भाजीपाला व फळांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारचा मोठा पुढाकार; मंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : नाशिक (Nashik) महानगरपालिका क्षेत्रातील आणि आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या भाजीपाला तसेच फळभाज्यांचे साठवणुकीअभावी होणारे मोठे नुकसान रोखण्यासाठी शासन स्तरावर वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नाशिक महानगरपालिकेकडून शीतगृह (Cold Storage) उभारणीसाठी आवश्यक ती जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. Minister Uday Samant

विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पंकज भुजबळ यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या कृषी माल साठवणुकीच्या समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. नाशिक हा भाजीपाला आणि फलोत्पादनात आघाडीवर असलेला जिल्हा असल्याने, येथील शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य साठवणूक व्यवस्था मिळणे किती गरजेचे आहे, हा मुद्दा त्यांनी मांडला होता.

या लक्षवेधी सूचनेला सकारात्मक उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी शासनाच्या नियोजित धोरणाची माहिती दिली. मंत्री सामंत म्हणाले की, नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून या शीतगृहाच्या प्रकल्पाला गती दिली जाईल. मनपाच्या आगामी अर्थसंकल्पातील निधी आणि आवश्यक आर्थिक तरतुदींचा सविस्तर विचार करून, शीतगृह उभारणीचा अधिकृत प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवला जाईल. या अद्ययावत सुविधेमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाची नासाडी थांबेल आणि त्यांना आपल्या उत्पादनाला योग्य भाव मिळेपर्यंत माल सुरक्षित ठेवता येईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल.

पणन मंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच संयुक्त बैठक

या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन केवळ जागा उपलब्ध करून देण्यापुरते मर्यादित न राहता, संपूर्ण प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी पणन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष बैठक आयोजित केली जाणार आहे. याबाबत बोलताना पणन मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केले की, राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून कृषी उत्पादनांची योग्य साठवणूक साखळी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. भाजीपाला आणि फळे नाशवंत असल्याने त्यांची काढणीनंतरची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी पणन विभाग, महापालिका आणि सर्व संबंधित घटकांची एकत्रित बैठक घेऊन प्रकल्पाच्या तांत्रिक व व्यावहारिक बाजू तातडीने पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >