जे मनात, तेच ओठांवर...एक बेधडक व्यक्तिमत्त्व : मंत्री नितेश राणे

राजकारणात शब्दांचे खेळ करून सोयीस्कर मुखवटे घालणाऱ्यांची तशी मोठी गर्दी असते; पण या गर्दीत कोणताही मुखवटा न चढवता, जसे आहोत तसे निर्भीडपणे लोकांसमोर जाणारे नेते विरळच. राज्याचे मंत्री नितेश राणे हे याच पठडीतलं एक अस्सल रसायन आहे. त्यांच्या सडेतोड आणि आक्रमक शैलीमुळे त्यांच्यावर आजवर अनेकांनी टीका केली, त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांची मोठी रांगच नेहमी पाहायला मिळते. पण, या टीकेच्या धुरळ्यात 'नितेश राणे' नावाचं खरं नेतृत्व आणि माणूस म्हणून त्यांची संवेदनशीलता कायम आहे. ज्यांनी त्यांना जवळून पाहिलं नाही, त्यांच्यासाठी ते कदाचित केवळ एक आक्रमक नेते असतील; पण वास्तवात, आज महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी आणि अन्यायाविरुद्ध घुमणारा त्यांचा 'बुलंद आवाज' हीच त्यांची खरी ओळख आहे. "जे मनात, तेच ओठांवर" हा त्यांचा बाणा आहे. वरवर पाहता त्यांचा रोखठोक स्वभाव अनेकांना कडक वाटू शकतो; मात्र या कणखर व्यक्तिमत्त्वामागे कार्यकर्त्यांबद्दलची आत्मीयता आणि जनसेवेची तळमळ दडलेली आहे. राजकीय व्यासपीठावरील आक्रमक नेता आणि लोकांच्या अडचणींना तत्परतेने धावून जाणारा जनप्रतिनिधी, अशा दोन्ही भूमिका ते प्रभावीपणे निभावताना दिसतात. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त, स्वतःची अशी एक 'कमाल शैली' निर्माण करणाऱ्या या बेधडक आणि धडाडीच्या नेतृत्वावर टाकलेला हा एक खास दृष्टिक्षेप...



शब्दांना धार, भूमिकेवर ठाम...


राजकीय फायद्यासाठी गोड बोलणे, केवळ टाळ्या मिळवण्यासाठी आश्वासनांची खैरात करणे किंवा सोयीस्कर भूमिका घेणे हे नितेश राणे यांच्या स्वभावात बसत नाही. त्यांना जे योग्य वाटते, ते ते कोणत्याही आडपडद्याविना स्पष्टपणे मांडतात. चांगल्याला चागलं आणि वाईटाला वाईट म्हणणारे नितेश राणे विनाकारण शब्दांशी खेळत बसत नाहीत. त्यांच्या भाषणातील धार, स्पष्टवक्तेपणा आणि बिनधास्त शैली यामुळेच ते इतर नेत्यांपेक्षा वेगळे ठरतात. कोणताही विषय कितीही संवेदनशील किंवा वादग्रस्त असला तरी त्यावर आपली भूमिका ठामपणे मांडण्याची त्यांची तयारी असते. अनेकदा त्यांच्या विधानांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडते, चर्चा रंगतात आणि विरोधकांनाही त्याची दखल घ्यावी लागते. त्यांचा हा स्पष्टवक्तेपणा म्हणजे लोकांच्या मनातील भावना निर्भीडपणे व्यक्त करण्याचे धाडस आहे. जनतेच्या प्रश्नांबाबतही ते तितकेच आक्रमकपणे भूमिका घेताना दिसतात. एखाद्या विषयावर अन्याय होत असल्याचे त्यांना वाटले, तर ते त्याविरोधात उघडपणे आवाज उठवतात. त्यामुळेच अनेकांच्या दृष्टीने ते केवळ राजकारणी नसून, आपले मत स्पष्टपणे मांडणारे आणि त्यासाठी ठामपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात.



कामात तडजोड नाही


नितेश राणे यांचा आक्रमकपणा केवळ भाषणांपुरता मर्यादित नाही. त्यांच्या प्रशासकीय कामकाजातही त्याच धडाडीची झलक पाहायला मिळते. एखादे काम हाती घेतल्यानंतर ते पूर्णत्वास नेण्यावर त्यांचा भर असतो. प्रशासनातील दिरंगाई, लालफितीचा कारभार किंवा निष्काळजीपणा त्यांना अजिबात मान्य नाही. अधिकाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केल्यास ते थेट जाब विचारतात. त्यामुळे प्रशासनावर त्यांचा एक वेगळाच वचक निर्माण झाल्याचे अनेकदा दिसून येते. विकासकामांचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करणे, संबंधित अधिकाऱ्यांकडून नियमित माहिती घेणे आणि कामांना वेळेत गती देणे ही त्यांची कार्यपद्धती राहिली आहे. केवळ सूचना देऊन थांबण्याऐवजी त्या सूचनांची अंमलबजावणी होत आहे की नाही, यावरही त्यांचे बारकाईने लक्ष असते.



'काऊंटर अटॅक'चे मास्टर


सध्याच्या गतिमान राजकारणात विरोधकांकडून सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत असतात. अशा वेळी बचावात्मक भूमिका घेण्याऐवजी नितेश राणे थेट प्रतिउत्तर देण्यावर भर देतात. अचूक माहिती, मुद्देसूद मांडणी आणि आक्रमक शैली यांच्या जोरावर ते विरोधकांना प्रत्युत्तर देतात. स्वतःच्या पक्षाची भूमिका आणि हिंदुत्वाचा विचार ठामपणे मांडण्यात ते विशेष प्रभावी मानले जातात. राजकीय मैदानात केवळ आरोपांना उत्तर देणे एवढ्यावर ते थांबत नाहीत, तर अनेकदा आपल्या आक्रमक मांडणीमुळे विरोधकांनाच बचावात्मक भूमिका घ्यायला भाग पाडतात. कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास, मुद्द्यांची अचूक मांडणी आणि प्रसंगानुरूप शब्दांची निवड यामुळे त्यांचे प्रतिउत्तर अधिक प्रभावी ठरते. याच कारणामुळे नितेश राणे यांची ओळख केवळ स्पष्टवक्ते नेते म्हणून नाही, तर योग्य वेळी योग्य रणनीती आखून राजकीय 'काऊंटर अटॅक' करणारे प्रभावी नेतृत्व म्हणूनही निर्माण झाली आहे.



बाहेरून कणखर, आतून संवेदनशील


राजकीय व्यासपीठावर आक्रमक वाटणाऱ्या नितेश राणे यांचा आणखी एक पैलू म्हणजे त्यांची संवेदनशीलता. सभांमधील त्यांची आक्रमक शैली आणि विरोधकांवर केलेले सडेतोड हल्ले पाहून त्यांचा स्वभाव केवळ कणखर आहे, असा समज अनेकांचा होतो. मात्र त्यांच्या जवळच्या लोकांना आणि मतदारसंघातील नागरिकांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील हळवा पैलू अधिक जवळून अनुभवायला मिळतो. गरजू विद्यार्थी, संकटात सापडलेले शेतकरी किंवा मदतीच्या अपेक्षेने आलेले सर्वसामान्य नागरिक यांच्याबाबत ते अत्यंत सहृदयतेने वागतात. अन्याय करणाऱ्यांसाठी कठोर असणारे नितेश साहेब अन्यायग्रस्तांसाठी मात्र आधारवड ठरतात. लोकांचे प्रश्न ऐकून घेणे आणि शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करणे, हा त्यांच्या स्वभावाचा महत्त्वाचा भाग आहे. कणखर नेतृत्व आणि माणुसकीचा स्पर्श यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो.



कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे


कोणत्याही पक्षाची खरी ताकद त्याचे कार्यकर्ते असतात. अशा वेळी कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारा नेता त्यांच्यासाठी प्रेरणास्थान बनतो. नितेश राणे यांची भाषणे आणि आक्रमक भूमिका कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण करते. विरोधकांच्या टीकेला ते जशास तसे उत्तर देतात, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो. "आपला नेता आपल्या पाठीशी आहे" ही भावना त्यांना सतत बळ देत असते. राजकीय संघर्षाच्या काळात किंवा एखाद्या कठीण प्रसंगी कार्यकर्त्यांना मानसिक आधार देण्याचे कामही ते सातत्याने करताना दिसतात. कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेणे, त्यांच्या समस्या ऐकून घेणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे याकडे ते विशेष लक्ष देतात.



थोडक्यात...


नितेश राणे यांचा रोखठोक स्वभाव हा केवळ आक्रमकतेचा भाग नाही, तर जनहितासाठी स्वीकारलेली एक कार्यपद्धती आहे. स्पष्टवक्तेपणा, निर्णयक्षमता आणि कामाबाबतची तळमळ यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विरोधकांवर सडेतोड टीका करणारे, प्रशासनाकडून काम करून घेण्यासाठी आग्रही असणारे, कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आणि सर्वसामान्यांच्या अडचणींना संवेदनशीलपणे प्रतिसाद देणारे असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. म्हणूनच समर्थकांच्या नजरेत ते केवळ मंत्री किंवा राजकीय नेते नाहीत, तर धडाडीचे नेतृत्व आणि ठाम भूमिकेचे प्रतीक म्हणून ओळखले जातात. राजकारणातील बदलत्या प्रवाहात स्वतःची स्वतंत्र शैली जपत, स्पष्ट भूमिका घेण्याचे धाडस दाखवणाऱ्या नेत्यांमध्ये नितेश राणे यांचे नाव विशेषत्वाने घेतले जाते. बाहेरून कणखर आणि धडाडीचे, पण आतून तितकेच संवेदनशील असलेले हे व्यक्तिमत्त्व आजही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राच्या या निर्भय, स्पष्टवक्त्या, कार्यतत्पर आणि धडाडीच्या नेतृत्वाला मनःपूर्वक शुभेच्छा!

Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या ‘ब्लू इकॉनॉमी’चा नवा शिल्पकार : नितेश राणे

सुहास शेलार महाराष्ट्राला ८७७ किलोमीटरची विस्तीर्ण आणि समृद्ध किनारपट्टी लाभली असली, तरी प्रदीर्घ काळ तिची ओळख

कार्यतत्पर आमदार…..कार्यक्षम मंत्री…

महेश सावंत राज्याच्या राजकारणात आपल्या वेगळ्या शैलीने, अभ्यासपूर्ण भूमिकेने आणि दमदार नेतृत्वाने ठसा

विकासाला वेग अन् जनतेला आधार देणारे नेतृत्व!

विकास पवार जनतेच्या प्रश्नांची जाण, विकासाची दूरदृष्टी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार ही नितेशजी राणे

जागतिक टेनिसमध्ये भारताची ‘किरण’

आंतरराष्ट्रीय ज्युनियर टेनिस वर्तुळात भारताच्या १३ वर्षीय सृष्टी किरण या उदयोन्मुख खेळाडूने उल्लेखनीय

२३ व्या वर्षी १९ सरकारी परीक्षा उत्तीर्ण!

सरकारी परीक्षांची विश्वासार्हता आणि निवड प्रक्रियेतील दिरंगाईमुळे आजच्या तरुण पिढीमध्ये स्पर्धा

न-नागरिकत्व

फेरफटका-सीमा मालाणी सारखी नजरेला पडणारी काही निरीक्षणं मांडायचा हा एक प्रयत्न. सार्वजनिक बागेत सकाळी वॉकला