विकास पवार
जनतेच्या प्रश्नांची जाण, विकासाची दूरदृष्टी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार ही नितेशजी राणे यांच्या कार्यशैलीची ठळक वैशिष्ट्ये आहेत. मत्स्यव्यवसाय क्षेत्राला नव्या युगाशी जोडण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित व्यवस्थापन प्रणालीच्या दिशेने त्यांनी महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. तंत्रज्ञान, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेच्या माध्यमातून विभागाला अधिक सक्षम बनविण्याचा हा प्रयत्न आहे. विकासासोबतच पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य देत "प्लास्टिकमुक्त कोळीवाडे" सारख्या उपक्रमांतून त्यांनी केवळ निर्णय घेणारे नव्हे, तर स्वतः मैदानात उतरून काम करणारे नेतृत्व दाखवून दिले आहे.
सत्ता आणि पदे अनेकांना मिळतात; मात्र त्या पदांना आपल्या कार्यकर्तृत्वाने अर्थ प्राप्त करून देणारे नेते मोजकेच असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक चेहरे येतात, अनेक जबाबदाऱ्या सांभाळतात आणि काळाच्या ओघात इतिहासाच्या पानांवर विरून जातात. पण काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, जी केवळ पदामुळे नव्हे, तर आपल्या निर्णयक्षमतेने, दूरदृष्टीने आणि जनतेच्या मनात निर्माण केलेल्या विश्वासामुळे कायम स्मरणात राहतात. विकासाला वेग, प्रशासनाला दिशा आणि जनतेला आधार देणारे असेच एक अभ्यासू आणि धाडसी नेतृत्व म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नामदार नितेश राणे. पारंपरिक क्षेत्रांना आधुनिकतेची जोड देत, विकासाच्या नव्या संधी निर्माण करत आणि सामान्य नागरिकांशी आपली नाळ कायम जोडून ठेवत त्यांनी अल्पावधीतच कार्यक्षम, निर्णयक्षम आणि लोकाभिमुख मंत्री म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मत्स्यव्यवसाय आणि बंदरे क्षेत्र केवळ प्रगती करत नाही, तर नव्या युगाकडे आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेतला असता, एका अशा नेतृत्वाचे दर्शन घडते ज्यांनी केवळ प्रशासनाची जबाबदारी सांभाळली नाही, तर विकासाला गती दिली, तंत्रज्ञानाचा स्वीकार केला, पारंपरिक क्षेत्रांना आधुनिकतेची जोड दिली आणि अनेक नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास या दोन्ही क्षेत्रांना नवी दिशा देत त्यांनी महाराष्ट्राच्या सागरी क्षमतेला अधिक बळकटी देण्याचे काम केले आहे. मंत्रीपद स्वीकारल्यानंतर अल्पावधीतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या ‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात’ बंदरे विभागाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात अग्रस्थान मिळवले.
राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेण्यात आले आहेत. त्यापैकी महाराष्ट्राच्या विस्तीर्ण किनारपट्टीवर राहणाऱ्या लाखो मच्छीमार कुटुंबांसाठी आशेचा नवा किरण ठरलेला ऐतिहासिक निर्णय म्हणजे मत्स्यव्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा देणे हा होय. या निर्णयामुळे मच्छीमार समाजाच्या विकासासाठी नव्या संधींची दारे खुली झाली आहेत. शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमार बांधवांना कर्जसुविधा, विमा संरक्षण तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग अधिक सुलभ झाला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला न्याय देत मत्स्यव्यवसाय क्षेत्राला सन्मानाचे आणि महत्त्वाचे स्थान मिळवून देण्याचे कार्य मा. नितेश राणे यांच्या माध्यमातून पुढे आले. याच धर्तीवर केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनाच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. मच्छीमार बांधवांच्या आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी सुरू करण्यात आलेली ही योजना भविष्यात महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. मात्र या नेतृत्वाचा दृष्टिकोन केवळ आर्थिक विकासापुरता मर्यादित राहिलेला नाही. मत्स्यव्यवसाय क्षेत्र अधिक सुरक्षित, आधुनिक आणि सक्षम करण्यासाठी सागरी सुरक्षेच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. राष्ट्रीय सागरी सुरक्षेच्या अनुषंगाने महाराष्ट्रात ड्रोन आधारित सागरी सुरक्षा प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून अत्याधुनिक स्टील गस्ती नौकांचा ताफाही मजबूत करण्यात येत आहे. या आधुनिक यंत्रणांमुळे समुद्रातील हालचालींवर अधिक प्रभावी लक्ष ठेवणे शक्य झाले आहे. बेकायदेशीर कारवाया, अनधिकृत मासेमारी आणि सुरक्षेच्या दृष्टीने निर्माण होणाऱ्या आव्हानांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या उपाययोजना अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. तसेच प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना अंतर्गत मासेमारी नौकांवर ट्रान्सपाँडर प्रणाली बसविण्यात येत आहे. यामुळे समुद्रात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नौकांशी संपर्क साधणे अधिक जलद, सुरक्षित आणि प्रभावी झाले आहे. या सर्व दूरदर्शी निर्णयांमुळे महाराष्ट्राची सागरी सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि सज्ज होत असून राज्यातील मच्छीमार बांधवांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक मजबूत पायाभरणी निर्माण झाली आहे.
विकासाला तंत्रज्ञानाची जोड देणे हे नितेशजी राणे यांच्या कार्यशैलीचे आणखी एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य ठरले आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्र अधिक सक्षम, आधुनिक आणि भविष्योन्मुख करण्याच्या उद्देशाने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. नामांकित मार्वेल कंपनीसोबत करण्यात आलेली भागीदारी ही केवळ तांत्रिक सुधारणा नसून, विभागातील कार्यपद्धती अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक बनविण्याचा दूरदृष्टीपूर्ण प्रयत्न आहे. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने मासेमारी नौकांवर कार्यरत असलेल्या खलाशांची अचूक ओळख निश्चित करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. खलाशांसाठी आधार-संलग्न ओळखपत्र प्रणाली लागू करून समुद्रातील सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत, विश्वासार्ह आणि शिस्तबद्ध करण्यात आली. विकासासोबतच पर्यावरण संवर्धनालाही नितेशजी राणे यांनी तितकेच महत्त्व दिले. राज्यातील कोळीवाडे स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी “प्लास्टिकमुक्त कोळीवाडे” ही अभिनव संकल्पना राबविण्यात आली. विशेष म्हणजे, केवळ सूचना देण्यापुरते मर्यादित न राहता स्वतः स्वच्छता मोहिमेत सहभागी होत त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून नेतृत्वाचा आदर्श समाजासमोर ठेवला. मच्छीमारांचे आर्थिक सक्षमीकरण आणि उत्पन्नवाढीच्या उद्देशाने राज्य शासन व केंद्र शासनाच्या सहकार्याने आधुनिक खोल समुद्रातील मासेमारी नौका उपलब्ध करून देण्यात आल्या. या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील मच्छीमारांना खोल समुद्रातील मासेमारीसाठी नव्या संधी उपलब्ध झाल्या असून, उत्पादन वाढ आणि उत्पन्नवाढीचे नवे मार्ग खुले झाले आहेत. देश हरित ऊर्जेच्या दिशेने वाटचाल करत असताना मत्स्यव्यवसाय क्षेत्रातही महाराष्ट्राने नाविन्यपूर्ण पाऊल टाकले. देशातील पहिली इलेक्ट्रिक मासेमारी नौका ‘विकल्पिका’ साकारण्यामागे नितेशजी राणे यांची दूरदृष्टी, आधुनिक विचारसरणी आणि पर्यावरणपूरक विकासाची भूमिका महत्त्वाची ठरली. ही नौका पर्यावरणपूरक, शाश्वत आणि आधुनिक मत्स्यव्यवसायाच्या दिशेने टाकलेले ऐतिहासिक पाऊल मानले जाते.
बंदर विकास क्षेत्रातही त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी निर्णय घेण्यात आले आहेत. जहाज पुनर्वापर धोरण २०२५ लागू करून सागरी उद्योगांना नव्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. राज्यातील विविध बंदर प्रकल्प आणि जेट्टी प्रकल्पांना गती देत किनारपट्टीवरील पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. या माध्यमातून व्यापार, पर्यटन आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळत आहे. मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा यासाठी मुंबई महानगर प्रदेशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला. तसेच, गेटवे ऑफ इंडिया परिसरातील प्रवासी बोटींचा वाढता ताण लक्षात घेऊन रेडिओ क्लबजवळ नवीन जेट्टी उभारण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदर परिसरातील अनेक वर्षांपासूनची अतिक्रमणे हटवून त्या भागाला नवे स्वरूप देण्याचे धाडसी कार्यही त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करण्यात आले. त्यामुळे बंदर विकासाची कामे अधिक वेगाने मार्गी लागत असून महाराष्ट्रातील सागरी पायाभूत सुविधांना नवे बळ मिळत आहे. महाराष्ट्राच्या सागरी अर्थव्यवस्थेला जागतिक स्तरावर नेण्याच्या दृष्टीनेही उल्लेखनीय कार्य करण्यात आले आहे. इंडिया मेरीटाईम वीक २०२५ मध्ये महाराष्ट्रासाठी तब्बल ७२ हजार ७०० कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक आकर्षित करण्यात यश आले. ही गुंतवणूक राज्यातील सागरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तसेच मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याचबरोबर पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे उभारण्यात येणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या बंदर प्रकल्पात महाराष्ट्राचा २६ टक्के सहभाग निश्चित करण्यात आला आहे. भविष्यात जागतिक दर्जाच्या प्रमुख बंदरांमध्ये गणना होईल अशा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती आणि नवे सामर्थ्य प्राप्त होणार आहे. आज नामदार नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेताना, त्यांची विकासाभिमुख दृष्टी, अभ्यासपूर्ण निर्णयक्षमता, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, मच्छीमार बांधवांप्रती असलेली बांधिलकी आणि महाराष्ट्राच्या सागरी सामर्थ्याला जागतिक पातळीवर नेण्याची दूरदृष्टी निश्चितच प्रेरणादायी ठरते. समृद्ध विचार, विकासाची तळमळ, जनतेप्रती असलेली निष्ठा आणि कार्यक्षम नेतृत्व यांचा सुंदर संगम असलेल्या नामदार नितेशजी राणे साहेबांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! समाजहित, विकास आणि लोकसेवेचा त्यांचा हा अविरत प्रवास अधिक यशस्वी, अधिक प्रेरणादायी आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्याला नवी दिशा देणारा ठरो, हीच ईश्वरचरणी मनःपूर्वक प्रार्थना.