Monday, June 22, 2026

Nashik : नाशिकमधील या प्रसिद्ध सराफ व्यवसायाकडून बँकेच्या ३८ कोटी रुपयांचा अपहार, सराफ व्यावसायिक ताब्यात

Nashik : नाशिकमधील या प्रसिद्ध सराफ व्यवसायाकडून बँकेच्या ३८ कोटी रुपयांचा अपहार, सराफ व्यावसायिक ताब्यात

Nashik : नाशिक शहरातील सराफा व्यावसायिक क्षेत्राला हादरा देणाऱ्या तब्बल ३८ कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात बाफणा ज्वेलर्सचे संचालक नीलेश सुभाष बाफणा यांना अटक करण्यात आली आहे. सरकारवाडा पोलिस ठाण्यात (Sarkarwada Police Station) दाखल गुन्ह्यात न्यायालयाने त्यांना २६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

या बहुचर्चित प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून, बनावट स्टॉक स्टेटमेंटच्या आधारे टीजेएसबी सहकारी बँकेकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलल्याचा आरोप आहे. बँकेचे व्यवस्थापक सुहास विजय दंडवते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नीलेश बाफणा यांच्यासह सुभाष लखीचंद बाफणा, नम्रता नीलेश बाफणा, प्रभावती सुभाष बाफणा तसेच जामीनदार कांतिलाल लखीचंद बाफणा व सरला पारसमल बाफणा यांनी संगनमत करीत बँकेची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

नेमकं प्रकरण काय ?

फिर्यादीनुसार, बाफणा ज्वेलर्सने १९९८ मध्ये सुरुवातीला २० लाख रुपयांचे कॅश क्रेडिट कर्ज घेतले होते. त्यानंतर वेळोवेळी कर्जमर्यादा वाढवित ती तब्बल ४४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. कर्जासाठी दुकानातील सोने, चांदी, हिरे आणि व्यवसायातील येणी तारण ठेवण्यात आली होती. फेब्रुवारी २०२४ मध्ये झालेल्या ऑडिटमध्ये ५४.४८ कोटी रुपयांचा माल आणि २.०७ कोटी रुपयांची व्यापारी येणी असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, मार्च २०२५ पासून कर्जावरील व्याज भरणे थांबल्यानंतर बँकेने वसुली प्रक्रिया सुरू केली

मात्र, मार्च २०२५ पासून कर्जावरील व्याज भरणे थांबल्याने बँकेने वसुली प्रक्रिया सुरू केली. खाते एनपीए घोषित झाल्यानंतर सरफेसी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आणि प्रत्यक्ष स्टॉक पडताळणीचा निर्णय घेण्यात आला.

३० एप्रिल रोजी सादर करण्यात आलेल्या स्टॉक स्टेटमेंटमध्ये दुकानात ५९ कोटी ७ लाख रुपयांहून अधिक किमतीचा माल असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, न्यायालय नियुक्त आयुक्त, पंच आणि मूल्यांकन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुकानाची तपासणी करण्यात आली असता धक्कादायक वास्तव समोर आले. दुकानात सोने किंवा हिरे आढळून आले नाहीत. केवळ चांदीचे दागिने मिळाले असून त्यांची किंमत अवघी २५ लाख १९ हजार रुपये असल्याचे निष्पन्न झाले.

या तफावतीमुळे खोटे व बनावट स्टॉक स्टेटमेंट सादर करून बँकेकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलल्याचा संशय अधिक गडद झाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून आर्थिक व्यवहार, तारण मालमत्ता, ऑडिट अहवाल आणि स्टॉक स्टेटमेंटची सखोल छाननी केली जात आहे. या तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >