Saturday, June 20, 2026

Jalgaon Crime : क्षुल्लक कारणातून तरुणाचा विटांनी ठेचून खून

Jalgaon Crime : क्षुल्लक कारणातून तरुणाचा विटांनी ठेचून खून

Jalgaon Crime : चाळीसगाव बसस्थानक (Chalisgaon Bus Station) परिसरात क्षुल्लक कारणातून एका तरुणाचा विटांनी ठेचून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दुकान लावण्याच्या कारणावरून सुरू असलेल्या जुन्या वादातून 27 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या तरुणाचा विटांनी मारहाण करून खून करण्यात आला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, २७ वर्षीय अक्षय भानुदास पाटील (रा. लक्ष्मीनगर, चाळीसगाव) हा कुटुंबासह राहत होता. त्याचे आणि निखील सुनील अजबे यांचे बसस्थानकाच्या मागील भागात दुकान लावण्याच्या कारणावरून वाद होत असे. अशी माहिती समोर आली आहे. गुरूवारी (दि. 18) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास निखील अजबे (Nikhil Ajabe) याने बोलावल्याचे सांगून अक्षय घरातून बाहेर पडला. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. त्याचा शोध घेतल्यानंतरही तो आढळून आला नव्हता.

दरम्यान, शुक्रवारी (दि. 19) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अक्षयच्या कुटुंबीयांना त्याच्यावर मारहाण झाल्याची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीय ग्रामीण रुग्णालयात पोहोचले असता अक्षयच्या डोक्यावर व तोंडावर गंभीर दुखापती झालेल्या दिसून आल्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

घटनास्थळी पाहणी केली असता मांगारवाडी वाडा परिसरातील एका पडीक घरासमोर रक्ताचे थारोळे तसेच रक्ताने माखलेल्या विटांचे तुकडे आढळून आले. यामुळे अक्षयवर विटांनी हल्ला करून त्याचा खून करण्यात आल्याची खात्री झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी मृताचे वडील भानुदास राजाराम पाटील (वय 75, रा. लक्ष्मीनगर, चाळीसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निखील उर्फ भोला सुनील अजबे याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >