Wednesday, August 19, 2026

Assistant Engineer accepting a bribe : मुंबई महापालिकेत खळबळ; २० हजारांची लाच घेताना 'अ' वॉर्डचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

Assistant Engineer accepting a bribe : मुंबई महापालिकेत खळबळ; २० हजारांची लाच घेताना 'अ' वॉर्डचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

MUMBAI : मुंबई महानगरपालिकेत (BMC) भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. मुंबई महापालिकेच्या 'अ' वॉर्डमध्ये (A-Ward) उपअभियंता पदावर कार्यरत असलेले आणि सध्या सहायक अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे राधेश्याम जैस्वाल यांना वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, तक्रारदाराचे एक कायदेशीर काम विनाव्यत्यय पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात राधेश्याम जैस्वाल यांनी वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तक्रारदाराची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) रीतसर तक्रार दाखल केली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन एसीबीच्या पथकाने तात्काळ पडताळणी केली आणि लाचेची मागणी योग्य असल्याचे सिद्ध झाले.

या खातरजनेनंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी 'अ' वॉर्ड कार्यालयाच्या परिसराजवळ एक सापळा रचला. ठरल्याप्रमाणे राधेश्याम जैस्वाल यांनी तक्रारदाराकडून वीस हजार रुपयांची रक्कम हाताळताच, लपून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. जैस्वाल यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या एसीबीचे पथक आरोपी जैस्वाल यांच्या निवासस्थानाची आणि कार्यालयातील संबंधित फाईल्सची कसून झडती घेत आहे. त्यांनी यापूर्वीही अशाच प्रकारे इतरांकडून बेकायदेशीरपणे पैसे उकळले आहेत का, यादृष्टीने अधिक तपास सुरू आहे. मुंबई महापालिकेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या प्रशासकीय यंत्रणेत वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यानेच असा गैरप्रकार केल्यामुळे पालिका प्रशासनाच्या पारदर्शक कारभारावर आणि कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पालिका वर्तुळात याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >