फेरफटका-सीमा मालाणी
सारखी नजरेला पडणारी काही निरीक्षणं मांडायचा हा एक प्रयत्न.
सार्वजनिक बागेत सकाळी वॉकला गेलो की माळी बाबा नसताना, तिथली सुंदर फुलं उदाहरणार्थ, कण्हेरी, गुलाब, मोगरा, कुंदा, गोकर्ण, जाई-जुई इत्यादी अनेक मध्यमवयीन किंवा वयस्कर बायका सर्रास तोडतात. आपण हटकलं की म्हणतात,“अहो देवालाच वहायची आहेत. देवासाठी नेते.” चोरलेली फुलं देवाला चालतात का असा प्रश्न विचारायचा नसतो. कारण आपल्याला तुच्छतादर्शक कटाक्ष मिळतो. माळी पाणी घालतो, खत घालतो, बागेची निगा राखतो, सरकार त्याला पगार देते. व्यायाम किंवा फिरायला येणाऱ्या सामान्य माणसांना फुलं आनंद देतात. फुलं असली की पक्षी, फुलपाखरं, वेगवेगळे कीटक-आळ्या असे अनेक जीवजंतू बघायला मिळतात. त्यांच्यात इतकी विविधता असते की स्तिमित व्हायला होते. फुलं तोडणाऱ्या माणसांना इतका विचार करायला वेळ नसतो कारण त्यांना घरी जाऊन देवाला फुलं वहायची असतात.
एकदा तर गंमतच झाली. एक वयस्कर स्थूल बाई व्यायाम करत होत्या. चांगला अर्धा तास व्यायाम केला. राऊंड मारले, मग व्यायामाच्या विविध उपकरणांवर कसरती केल्या, चांगल्या घामाघूम झाल्या होत्या. साडी व ब्लाऊज असा पोशाख होता. कपाळावर घामाचे बिंदू व पोलकं घामानं भिजलेलं, पण जाताना मस्त उमललेले दोन गुलाब पटकन तोडून, हळूच इकडे तिकडे बघत ब्लाऊजमध्ये दडवले आणि लगबगीने बागेतून बाहेर पडल्या. मला त्या बिचाऱ्या फुलांचीच दया आली. काय त्या फुलांचं नशीब? असं वाटलं.
रिकाम्या प्लॉटमध्ये कचरा टाकणे हा अनेकांचा छंद असतो, मग तो आपल्या बंगल्याच्या शेजारी का असेना. प्लॉट स्वच्छ ठेवणे ही मालकाची जबाबदारी असते, पालिकेची नव्हे पण तो मालक थोडीच रोज येणार बघायला? मग काही दिवसांनी प्लॉटची कचराकुंडी होते.परत अशीच एक गंमत दिसली. मी सकाळी वॉकला बाहेर पडले, रस्त्यावरून चालले असताना एक तरुण आई आपल्या छोट्या शाळेत जाणाऱ्या मुलाला शाळेच्या बसपर्यंत सोडायला चालली होती. पोरगं एकदम अप-टु-डेट शाळेच्या गणवेशात. शूज, बेल्ट, आय कार्ड भारीतलं दप्तर, वॉटर बॅग वगैरे सगळा जामानिमा केलेलं, व्यवस्थित भांग पाडून पावडर फासलेलं ते पोरगं गोडच होतं. बहुधा इंग्रजी शाळेचा थाटमाट होता. आई गाऊन मध्येच होती. एका हातात ओल्या कचऱ्याने गच्च भरलेली पिशवी व दुसऱ्या हाताला ते टीप टॉप पोरगं. माझी चाल थोडी संथ झाली. मी बघत होते, पोरगं शाळेच्या पिवळ्या बसमध्ये चढलं. मायलेकानं प्रेमानं एकमेकांना बाय केलं. बस निघून गेली. आईने इकडे तिकडे बघत, आदल्या दिवशीच पालिकेच्या लोकांनी एकदम साफसूफ केलेल्या एका नेत्याच्या होर्डिंगखाली ती कचऱ्याची पिशवी फेकून दिली. बहुधा त्याच नेत्याने काढलेल्या शाळेत पोरगं जात असावं असा विचार माझ्या मनात आला. फुलं वाहण्याऐवजी कचरा वाहिला. काय फरक पडतो? विनोद सोडा, मी त्या तरुण आईला हटकले, म्हणाले, “पोरगं इंग्रजी शाळेत जातं का हो?” आई एकदम आनंदून म्हणाली,
“हो हो”.
मी म्हटलं, “ताई, तुम्ही ही कचऱ्याने भरलेली पिशवी साफ केलेल्या जागेत का टाकली?” म्हणाली, "अहो तिथे सगळेच कचरा टाकतात." मी म्हणाले, "पण आज तर तिथे एकदम स्वच्छता आहे. पालिकेने ती जागा अगदी साफ केली आहे. पण आता तुम्ही परत सुरुवात केल्याने तिथे आता परत कचराकुंडी तयार होणार. लोकं पुन्हा तिथेच कचरा टाकायला सुरुवात करणार. मोठ्या इंग्रजी शाळेतच फार भारी शिक्षण मिळतं असं नव्हे तर खऱ्या शिक्षणाची सुरुवात घरातून होते." ती
नव-आई काहीशी वरमली. पण वळून एकदम भरभर चालती झाली. पिशवीतला अर्धा कचरा बाहेर सांडला होता.
आणखी एक नेहमीचं निरीक्षण म्हणजे मोठ्ठाली देवस्थानं असतात. उदाहरणार्थ, पंढरपूर, शिर्डी, तिरुपती बालाजी वगैरे ...तिथे व्हीआयपी दर्शन घेणे म्हणजे पैसे देऊन झटपट दर्शन घेणे. सर्वसामान्य गरीब जनता तीन-तीन-चार-चार तास रांगेत उभे राहून दर्शन घेते. त्यांच्या वेळेची, कष्टाची पर्वा न करता हे व्हीआयपी लोक व्हीआयपी दर्शन घेतात. जणू या लोकांच्या मनात असलेल्या श्रद्धा जास्त व्हीआयपी असतात. यांच्या चिंता किंवा देवाजवळच्या मागण्या जास्त व्हीआयपी असतात. अशी अनेक माणसं असतात की त्यांनी घेतलेलं व्हीआयपी दर्शन ते चार चौघात मिरवतात देखील. आपल्या कृतीमागे जराही विचार नसलेल्या माणसांची सध्या खूप चलती आहे, हे अशा देवस्थानाच्या गर्दीतून सहज दिसते.
लाऊडस्पीकरचा शोध चांगला की वाईट हे ठरविणे मुश्किल आहे. या स्पीकर टेक्नॉलॉजीमुळे, भारतरत्न पंडित भीमसेनजी किंवा लताबाई किंवा गान सरस्वती किशोरीताई आपल्या कानात येऊन गातात. कुणालाही आवाजाचा त्रास न देता हेडफोन्स वापरून आपण संगीताचा आनंद घेऊ शकतो. हे खरंच खूपच अद्भुत आहे. परंतु त्याचवेळी कुठल्याही मिरवणुकीचा डीजे माणसांना ठार बहिरे किंवा हृदय बंद पाडून ठार मारायलाही मागेपुढे पहात नाही. खिडकीची तावदाने किंवा लोखंडी पत्र्यांसारख्या निर्जीव वस्तूंना देखील नाचवतात हे डिजे.
प्रकाशाचं प्रदूषणही आजकाल इतकं वाढलं आहे की आकाशातील ताऱ्यांना लोकं विसरून जातील की काय असं वाटतं. मग डोळ्यांसमोर तारे चमकवण्यासाठी कानाखाली एक सणसणीत ठेवून द्यावी लागेल. झाडांना लायटिंग करणे हे सुद्धा क्रुर वाटते.आमच्या गावात एक-दोन महत्त्वाच्या चौकांमध्ये प्रचंड मोठ्ठ्या कमानी, त्यावर मोठ्ठ्या राजकीय नेत्यांच्या प्रतिमा कायम स्वरुपी झाल्यात. आधीच वाहतूकीची कोंडी... आता तर कमानी पुढे कमानी म्हणजे एक कॉंग्रेसची, त्यापुढे भाजपची, त्यापुढे शिवसेनेची... शिवाय होर्डिंग्जची तर गर्दी विचारूच नका... होर्डिंग्ज लावणाऱ्या लोकांना हा पैसा कुठून मिळतो हे सूज्ञांस सांगणे न लगे...
एका सार्वजनिक बागेत मुलांसाठीच्या घसरगुंड्या व इतर आणखी काही बरेच सामान येऊन पडले आहे. यातील काही योग्य ठिकाणी लावले व निम्म्याच्या वर एका बाजूला दीड-दोन वर्षे झाली नुसतेच पडून राहून पावसाने गंजले आहे.
सिव्हीक सेन्स अर्थात् सुजाण नागरिकत्वाचे धडे खरेतर पाश्चात्त्यांप्रमाणे शाळेतूनच द्यायला हवेत. लोकसभेत व विधानसभेत खासदार/ आमदारांची संख्या किती असते किंवा केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय हे ठाऊक असणे जितके महत्त्वाचे आहे त्याहूनही सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे हे महत्त्वाचे नाही का?
शाळेपासूनच ही जागरूकता रुजवायला नको का? काय बरं करावं असल्या लोकांचं?