Monday, June 15, 2026

चिंता आणि दिलासा

चिंता आणि दिलासा

अर्थनगरीमध्ये सरत्या आठवड्यात काही महत्वपूर्ण निरीक्षणे समोर आली. त्यातून महागाईच्या कचाट्यात सापडलेल्या जनतेला काही वेगळे आर्थिक मुद्दे समजून घ्यायला मिळाले. यापैकी पहिले लक्षवेधी अर्थवृत्त म्हणजे भारताला नैसर्गिक वायूचा मोठा साठा सापडणे. दुसरी बातमी म्हणजे शहरी भारतीयांमध्ये आर्थिक चिंतेमुळे तणाव पहायला मिळत आहे. दरम्यान, ‘एटीएम’मध्ये रोख रकमेची कमतरता असल्याचे आढळून आले.

भारतात नैसर्गिक वायूचा (नॅचरल गॅस) साठा सापडल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. याआधी भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्ये तेल आणि वायूचे साठे सापडल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता भारताच्या अंदमान समुद्रक्षेत्रातही नैसर्गिक वायूचा मोठा साठा आढळल्याने ऊर्जा क्षेत्रासाठी ही सकारात्मक आणि दिलासादायक बातमी मानली जात आहे. सरकारी मालकीच्या ‘ऑइल इंडिया लिमिटेड’ने अंदमान बेटांच्या परिसरातील विजयपूरम-३ या विहिरीत नैसर्गिक वायू सापडल्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या मते, ही या भागातील दुसरी महत्त्वाची हायड्रोकार्बन (तेल आणि वायू) शोधमोहीम यशस्वी ठरली आहे. विजयपूरम-३ ही विहीर अंदमान बेटसमूहाच्या पूर्व किनाऱ्यापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी सुमारे ३५५ मीटर खोल समुद्रात ड्रिलिंग करण्यात आले. प्राथमिक तपासणीदरम्यान समुद्रतळाखाली १,९०० मीटरपेक्षा अधिक खोलीवर नैसर्गिक वायूची चिन्हे आढळली. तसेच सातत्याने वायू बाहेर येताना दिसल्याने त्या ठिकाणी वायूचा साठा असल्याची पुष्टी झाली.

‘ऑइल इंडिया’ने सांगितले, की हा शोध अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण त्यामुळे अंदमान समुद्रक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे असण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे; मात्र या साठ्यातून व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर उत्पादन करता येईल की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. यासाठी पुढील काळात अधिक चाचण्या आणि अभ्यास केला जाणार आहेत. सध्या कंपनी वायूचे नमुने तपासत असून त्याची गुणवत्ता, ऊर्जा क्षमता आणि रासायनिक वैशिष्ट्ये यांचा अभ्यास सुरू आहे. तसेच हा वायू कोणत्या भूगर्भीय प्रक्रियेतून निर्माण झाला, याचाही वैज्ञानिक शोध घेत आहेत. विशेष म्हणजे, सप्टेंबर २०२५ मध्ये विजयपूरम-२ या विहिरीत नैसर्गिक वायू आढळल्याची माहिती समोर आली होती. आतापर्यंत या ब्लॉकमध्ये खोदलेल्या तीन विहिरींपैकी दोन विहिरींमध्ये वायूची उपस्थिती आढळली आहे. त्यामुळे अंदमान समुद्र क्षेत्र भारतासाठी भविष्यातील महत्त्वाचे ऊर्जा केंद्र ठरू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आणखी एक महत्वाचे आर्थिक निरीक्षण म्हणजे शहरांमध्ये राहणाऱ्या अनेक भारतीयांसाठी आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करणे हे तणावाचे मोठे कारण बनत आहे. चांगली बचत, आर्थिक सुरक्षितता आणि भविष्याची तयारी यांची इच्छा असली, तरी त्याच वेळी आरोग्य आणि वैयक्तिक आयुष्यातील समतोल राखणे अनेकांसाठी कठीण होत आहे. ‘मणिपासिग्ना हेल्थ इन्शुरन्स’ आणि ‘यूगव्ह इंडिया’ यांनी तयार केलेल्या ‘इंडिया हेल्थ कोशंट, २०२६ अहवालानुसार ४१ टक्के शहरी भारतीयांना आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याच्या प्रयत्नांमुळे तणाव आणि चिंता जाणवते. त्यामुळे आर्थिक चिंता या लोकांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या प्रमुख कारणांपैकी एक ठरल्या आहेत. या अभ्यासात शारीरिक आरोग्याला ६८ गुण, सामाजिक आरोग्याला ६२ गुण मिळाले, तर आर्थिक स्थितीला १०० पैकी केवळ ६२ गुण मिळाले. या अहवालासाठी देशातील १६ शहरांमधील २,६०० लोकांशी संवाद साधण्यात आला. त्यामध्ये त्यांच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक स्थितीचा अभ्यास करण्यात आला. अहवालानुसार आर्थिक दबाव हा केवळ बचत किंवा गुंतवणुकीपुरता मर्यादित नाही. सुमारे ३६ टक्के लोकांनी सांगितले, की आरोग्यदायी अन्न, पोषणपूरक उत्पादने आणि नियमित आरोग्य तपासण्यांवरील खर्च त्यांच्या बजेटवर अतिरिक्त ताण निर्माण करतो. तसेच ४० टक्के लोकांचे मत आहे, की तणाव आणि चिंतेचा त्यांच्या शारीरिक आरोग्यावर थेट परिणाम होत आहे.

तितक्याच लोकांनी असेही सांगितले, की कुटुंबीय आणि मित्रांसोबत कमी वेळ घालवल्यामुळे त्यांच्या कामावर किंवा शिक्षणावर नकारात्मक परिणाम झाला आहे. अभ्यासात असेही दिसून आले, की अनेक लोक आपल्या उत्पन्नाबद्दल, बचतीबद्दल आणि भविष्यातील खर्चांबद्दल सतत चिंतेत असतात. या चिंतेचा परिणाम त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो. आरोग्याशी संबंधित गरजा वाढल्यावर त्यासाठी अधिक खर्च करावा लागतो आणि त्यामुळे आर्थिक दबाव आणखी वाढतो.

अहवालानुसार,२५ते ३४ वर्षे वयोगटातील तरुणांवर या समस्येचा सर्वाधिक परिणाम होत आहे. भविष्य सुरक्षित करण्याची धडपड, घरगुती जबाबदाऱ्या आणि वाढते खर्च यांमुळे हा वयोगट अधिक तणाव अनुभवत आहे. महिलांनीही आर्थिक बाबींविषयी अधिक चिंता व्यक्त केली आहे. भविष्यातील खर्च, बचत आणि आर्थिक सुरक्षितता याबाबत अधिक सावध राहण्याची गरज असल्याचे अनेक महिलांचे मत आहे. या अहवालातून स्पष्ट होते, की आजच्या काळात आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे ही अनेक लोकांची सर्वात मोठी प्राथमिकता बनली आहे. अनेकजण शारीरिक किंवा मानसिक आरोग्य सुधारण्यापूर्वी आर्थिक स्थिती मजबूत करण्यावर भर देत आहेत, कारण त्यांच्या मते आर्थिक सुरक्षितता ही चांगल्या आणि स्थिर जीवनाची मूलभूत गरज आहे; मात्र आर्थिक प्रगतीच्या प्रयत्नांसोबत आरोग्य आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

आणखी एका अर्थवृत्ताने आर्थिक विषयांबाबत सजग असणाऱ्यांचे लक्ष वेधले. देशातील अनेक राज्यांमध्ये ‘एटीएम’मध्ये रोख रकमेची कमतरता भासत आहे. ‘एटीएम’ उद्योगाशी संबंधित ‘कॉन्फडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्री’ या संघटनेने ही समस्या ‘इंडियन बँक्स असोसिएशन’ आणि रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आणून दिली आहे. संघटनेच्या मते, अनेक ‘एटीएम’मध्ये पुरेशी रोकड पोहोचत नसल्यामुळे सेवा विस्कळीत होण्याचा धोका वाढला आहे. विशेषतः ग्रामीण आणि उपनगरांमधील नागरिकांना पैसे काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी आणि लहान व्यावसायिकांमध्ये चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही ‘एटीएम’मध्ये रोख रक्कम उपलब्ध नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. देशभरातील अनेक ‘एटीएम’मध्ये रोख रकमेची कमतरता जाणवत असून नागरिकांचे म्हणणे आहे, की अनेक यंत्रे पूर्णपणे रिकामी आहेत किंवा त्यामध्ये अत्यंत मर्यादित प्रमाणात रोकड उपलब्ध आहे. उद्योगक्षेत्राशी संबंधित संस्थांच्या मते, ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून सर्वसामान्यांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर तिचा परिणाम होऊ शकतो.

मार्च आणि एप्रिल महिन्यांमध्ये ‘एटीएम नेटवर्क’साठी एकूण ९४ हजार कोटी रुपयांच्या रोख रकमेची आवश्यकता होती; मात्र मार्चमध्ये केवळ ६१ हजार कोटी रुपये आणि एप्रिलमध्ये ५४ हजार कोटी रुपयेच उपलब्ध होऊ शकले. मागणी आणि पुरवठा यांमधील वाढलेल्या तफावतीमुळे अनेक भागांतील ‘एटीएम’ सेवांवर परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातील हिंगोली, परभणी आणि मराठवाड्यातील काही भागांमध्येही ही समस्या प्रकर्षाने दिसून आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात स्टेट बँक आणि ‘बँक ऑफ इंडिया’ यांसह अनेक ‘एटीएम’मध्ये रोकड उपलब्ध नव्हती. परभणीमध्येही अनेक ‘एटीएम’मधील रोकड संपली आणि ती बंद ठेवावी लागली. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसत आहे. खरीप हंगामाच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर शेतीकामांसाठी रोख पैशांची गरज असते; मात्र अनेक ठिकाणी ‘एटीएम’मधून पैसे मिळत नसल्याने शेतीसंबंधित कामे आणि स्थानिक व्यापारावर परिणाम होत आहे. अनेक राज्यांमधील बँक शाखा आणि ‘एटीएम’पर्यंत पुरेशा प्रमाणात रोकड पोहोचत नाही.

ग्रामीण आणि उपनगरी भागांमधील रोकड पुरवठा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी संघटनेने केली आहे. तसेच या समस्येबाबत रिझर्व्ह बँकेच्या चलन व्यवस्थापन विभागालाही माहिती देण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या मते, रोकड पुरवठा लवकर सुरळीत न झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था, लहान व्यवसाय आणि कृषी क्षेत्रावर अधिक गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बँका आणि संबंधित यंत्रणांनी या समस्येवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा