Saturday, August 15, 2026

Gold Silver Rate Today : जळगावच्या सुवर्ण बाजारात पुन्हा तेजी, सोनं-चांदी महागल्याने ग्राहकांना धक्का

Gold Silver Rate Today : जळगावच्या सुवर्ण बाजारात पुन्हा तेजी, सोनं-चांदी महागल्याने ग्राहकांना धक्का

Gold Silver Rate Today : जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सलग दोन दिवस सोने, चांदीच्या दरात घसरण नोंदविण्यात आल्याने रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर दागिने, भेटवस्तू खरेदीसाठी उत्सुक ग्राहकांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला होता. मात्र, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी १५ ऑगस्ट रोजी सकाळी दोन्ही मौल्यवान धातूंचे दर पुन्हा उसळल्याने ग्राहकांनी डोक्याला हात लावला.जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत दोन दिवसांच्या घसरणीनंतर शनिवारी पुन्हा सोने आणि चांदीच्या दरात तेजी आली. त्यामुळे रक्षाबंधनासाठी खरेदीची तयारी करणाऱ्या ग्राहकांच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे.

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारातील घडामोडींमुळे सोने-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. १२ ऑगस्ट रोजी जीएसटीसह सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ५८ हजार ३११ रुपयांवर, तर चांदीचा दर प्रति किलो २ लाख ४८ हजार २३० रुपयांवर पोहोचला होता. यानंतर १३ आणि १४ ऑगस्ट रोजी दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली. त्यामुळे दर आणखी कमी होतील, या अपेक्षेने काही ग्राहकांनी खरेदी पुढे ढकलली होती. रक्षाबंधनापूर्वी कमी दरात दागिने खरेदी करण्याची संधी मिळेल, अशी त्यांची अपेक्षा होती.

सोने आणि चांदीच्या दरात तेजी

मात्र, ही घसरण फार काळ टिकली नाही. शनिवारी सकाळी बाजार सुरू होताच सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली. त्यामुळे दोन दिवसांच्या घसरणीनंतर दर कमी होण्याची वाट पाहणाऱ्या ग्राहकांचा हिरमोड झाला. जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याच्या दरात ५१५ रुपयांची घट झाली होती. त्यामुळे तीन टक्के जीएसटीसह सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ५७ हजार ३८४ रुपयांवर आला होता. मात्र, शनिवारी सकाळी १ हजार १३३ रुपयांची वाढ झाल्याने हा दर पुन्हा १ लाख ५८ हजार ५१७ रुपयांवर पोहोचला. चांदीच्या दरातही अशीच तेजी पाहायला मिळाली. शुक्रवारी चांदीच्या दरात १ हजार ३० रुपयांची घट होऊन जीएसटीसह प्रति किलो दर २ लाख ४३ हजार ८० रुपयांवर आला होता. शनिवारी मात्र २ हजार ६० रुपयांची वाढ झाली आणि चांदीचा दर पुन्हा २ लाख ४५ हजार १४० रुपयांवर पोहोचला.

रक्षाबंधनाचा सण जवळ येत असल्याने सोने-चांदीच्या दरातील या चढ-उतारांकडे ग्राहक आणि सराफा व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे. सध्याच्या दरात खरेदी करायची की आणखी काही दिवस प्रतीक्षा करायची, याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम कायम आहे. आता सोमवारी बाजार उघडल्यानंतर दरात पुन्हा तेजी येते की काही प्रमाणात घसरण होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा