नवी दिल्ली : भारतीय उद्योगपतींनी आणि नागरिकांनी भारतीय उत्पादने आणि सेवा जागतिक बाजारपेठेत नेताना उचित व्यापार पद्धतींचा अवलंब करावा तसेच पुनर्वापर, पुनर्प्रक्रियेला प्रोत्साहन देत चक्रिय अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी केले. नवी दिल्लीतील भारत मंडपम् इथे ‘भारतीय व्यापार महोत्सवाच्या’ उद्घाटन समारंभात बोलताना त्यांनी भारताच्या वाढत्या जागतिक आर्थिक सहभागावर प्रकाश टाकला आणि नऊ मुक्त व्यापार करारांच्या माध्यमातून भारतीय उद्योग आणि व्यवसायांसाठी बाजारपेठा खुल्या झाल्याचे नमूद केले. आंतरराष्ट्रीय व्यापारात आता भारताला प्राधान्याने प्रवेश मिळत असल्याचे सांगत, भारतीय उत्पादने आणि सेवा जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यात, भारतीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, कर्मचारी, मच्छिमार, शेतकरी, उद्योजक आणि सेवा क्षेत्राच्या असलेल्या योगदानाचे महत्व त्यांनी अधोरेखित केले.
भारताची गुणवत्ता, डिझाईन क्षमता आणि ब्रँडचा आदर करून, ‘मेक इन इंडिया’ मोहीम अधिक बळकट करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन गोयल यांनी केले. भारताची सध्याची अर्थव्यवस्था सुमारे ४ ट्रिलीयन डॉलर्स आहे; २०४७ पर्यंत ३० ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने तिची वाटचाल सुरू असताना ही मोठी संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. संपूर्ण जग आज भारताशी व्यापारी संबंध वाढवण्यास उत्सुक असल्याचे नमूद करत, या प्रचंड वाढीच्या संधीसाठी उद्योग, उद्योजक आणि नागरिक यांच्या सामूहिक सहभागाच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. (Piyush Goyal)
आत्मनिर्भरता आणि राष्ट्रीय विकास यांचा परस्पर घनिष्ठ संबंध असल्याचे गोयल यांनी विशेषत्वाने सांगितले. ते म्हणाले की, नागरिकांनी स्वतःहून या बदलाचा भाग बनले पाहिजे आणि देशाच्या आत्मनिर्भरतेच्या वाटचालीत योगदान दिले पाहिजे. २०१४ पासून हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा त्यांनी विशेषत्वाने उल्लेख केला. यात डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टँड-अप इंडिया आणि मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास यांचा समावेश आहे. या उपक्रमांनी उद्योग आणि व्यवसायाला बळकटी देण्यात आणि तरुणांसाठी संधी निर्माण करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. (Piyush Goyal)
भारतीय उद्योगांनी मर्यादित बाजारपेठेच्या पलीकडे जाऊन स्थानिक उत्पादने आणि सेवा जागतिक बाजारपेठेत नेण्याचे आवाहन गोयल यांनी केले. देशाच्या विकासाच्या वाटचालीत अधिकाधिक सहभागी होण्याचे आवाहन करताना गोयल म्हणाले की, प्रगती साधण्याच्या प्रक्रियेत, सुधारणा, परिवर्तन आणि कामगिरी समाविष्ट असते; तसेच, आपली क्षमता सिद्ध करून, आणि आपल्या कार्याच्या माध्यमातून भारताला जागतिक स्तरावर नेणे ही सर्व संबंधित घटकांची जबाबदारी आहे. सर्व व्यावसायिक आणि उद्योजकांनी आपले व्यवसाय डिजिटल करून घेण्याचे, चांगल्या आणि श्रेष्ठ उत्पादन पद्धतींचा अवलंब करण्याचे आणि न्याय्य आणि वाजवी व्यापार पद्धतींचे पालन करण्याचे आवाहन गोयल यांनी यावेळी केले.
८६३ ट्रिलीयन डॉलरची विक्रमी निर्यात
भारताच्या निर्यातीत झालेल्या वाढीकडे मंत्री गोयल यांनी लक्ष वेधले. गेल्या वर्षी वस्तू आणि सेवांची निर्यात ८६३ ट्रिलीयन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचली; ज्यात ४४२ ट्रिलियन डॉलर्सची व्यापारी मालाची निर्यात आणि ४२१ ट्रिलियन डॉलर्सची सेवा निर्यात यांचा समावेश होता अशी माहिती गोयल यांनी यावेळी दिली. (Piyush Goyal)






