Saturday, June 13, 2026

याद रखोगे, के भूल जाओगे ?

याद रखोगे, के भूल जाओगे ?

नॉस्टॅल्जिया- श्रीनिवास बेलसरे वहिदा रहमान या तमिळ अभिनेत्रीने ‘रोजुलू मरायी’(१९५५) या तमिळ चित्रपटातून आपली अभिनयाची कारकीर्द सुरू केली. गुरुदत्त यांनी त्यांचा अभिनय बघून लगेच त्यांना सी.आय.डी.(१९५६)साठी हिंदीत आणले आणि मग त्या हिंदीच्याच झाल्या. पाठोपाठ ‘प्यासा’(१९५७),‘चौदहवीका चांद’(१९६०), ‘साहिब बीबी और गुलाम’(१९६२), ‘गाईड’(१९६५), ‘नील कमल’(१९६८), ‘रेश्मा और शेरा’(१९७१), अशी एकेक यशस्वी पावले टाकत त्या एक आयकॉन बनल्या. राजेश खन्ना आणि धर्मेंद्रबरोबर तिचा ‘खामोशी’ आला १९६९साली. त्यात ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’च्या फिल्मफेयर पुरस्कारासाठी तिचे नामांकन झाले होते. आपल्या लाजबाब अभिनयाने या तमिळ अभिनेत्रीने हिंदी चित्रपटसृष्टीत राहून तीन फिल्मफेयर, २ राष्ट्रीय पुरस्कार, २ पद्मपुरस्कार पटकावले. उत्कृष्ट विचारशील अभिनयाकरता प्रसिद्ध असलेल्या वहिदाने ‘पत्थरके सनम’(१९६७)मध्ये मात्र एक अल्लड आणि खेळकर मुलीची भूमिका केली होती. मनोजकुमारबरोबरच्या तिच्या या सिनेमाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे नेहमी उदात्त आदर्श, देशप्रेम, समाजप्रबोधन असे विषय हाताळणाऱ्या मनोजकुमारने यात एका रोमँटिक नायकाची भूमिका केली होती.मुमताज (मीना) आणि वहिदा (तरुणा) मैत्रिणी असतात आणि शहरातून घरी परतताना रेल्वे प्रवासात मीनाला मनोजकुमारने (राजेश) दिलेल्या त्रासाचा बदला म्हणून ती त्याला धडा शिकवायचे ठरवते. त्यासाठी तिच्याबरोबर तरुणानेही त्याच्याशी प्रेमाचे नाटक करायचे असे सांगून ती वहिदाला त्यासाठी तयार करते. गंमत म्हणजे हळूहळू दोघीही खरोखरच त्याच्या प्रेमात पडतात. मनोजकुमारचे प्रेम मात्र वहिदावर असते. तो एकदा शहरात जायला निघतो तेव्हा तिला विचारतो, ‘मी शहरातून तुझ्यासाठी काय भेट आणू?’ यावर उत्तर म्हणून तिच्या तोंडी मजरूह सुलतानपुरी यांनी जे गाणे दिले होते ते चांगलेच लोकप्रिय झाले होते. तत्कालीन प्रेमिकांच्या साध्याभोळ्या भावना नेमक्या शब्दांत मांडणारे ते गाणे होते. लक्ष्मी-प्यारेंनी त्याला इतके सुंदर संगीत आणि इतका जबरदस्त ठेका दिला की लतादीदींच्या गोड आवाजातले ते गाणे त्यावर्षी तर प्रचंड लोकप्रिय झालेच, शिवाय १९६८ सालच्या वार्षिक बिनाकात त्याला १०वा क्रमांक मिळाला. त्याचवेळी मुकेशजींच्या नितळ, सात्त्विक आवाजातले ‘मेहबूब मेरे, मेहबूब मेरे, तू हैं तो दुनिया कितनी हसीन हैं.’ने लोकप्रियतेत २०वा क्रमांक मिळवला! त्यावर्षी सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या सिनेमांच्या क्रमवारीत ‘पत्थरके सनम’ ९वा आला. असरार उल हसन खान ऊर्फ ‘मजरूह सुलतानपुरी’साहेबांची ही प्रेमिका प्रियकराला प्रांजळपणे इतकेच म्हणते, ‘माझ्यासाठी काहीही आणू नकोस, तू लवकर परत ये इतकीच भेट मला पुरेशी आहे.’ गाण्यातला वदिदाचा अभिनय खूप लोभस आणि खेळकर होता. लतादीदीने तिच्यासाठी कदाचित आवाजही मुद्दाम काहीसा लाडीक लावला होता. शब्द होते - ‘बता दूं, क्या लाना? तुम लौटके आ जाना, ये छोटासा नज़राना, पिया, याद रखोगे, के भूल जाओगे?’ मनापासून प्रेम करणाऱ्या एखाद्या ग्रामीण मुलीचे प्रेम कसे असते, खरे तर ‘असायचे’, ते या गाण्याच्या एकेका कडव्यात दिसते! वहिदाचा अभिनय इतका सहज आणि निर्मळ होता की गाण्यात क्षणाक्षणाला बदलणाऱ्या तिच्या मुद्रा नुसत्या पाहत राहाव्यात. प्रेमात पडलेल्या त्या काळच्या भाबड्या मुलीची मानसिकता मजरूह साहेबांनी किती सहज शब्दात पकडली होती! वहिदा मनोजला म्हणते, ‘माझ्याकडे नजर लावून बसलेले तुझे डोळे मला चमचमणाऱ्या दागिन्यासारखे वाटतात. तुझी जी झुलपे कपाळवर येताहेत ना, ती बघ, अगदी माझ्या मनगटावरच्या बांगडीसारखी गोलाकार आहेत! तू परत येशील तेव्हा हे सगळे असेच असू दे. शहरात गेल्यावर तुझी प्रेमळ नजर इकडेतिकडे जाऊ देऊ नकोस. माझ्यासाठी ती आहे तशीच परत घेऊन ये. माझ्यासाठी हाच मोठा नजराणा आहे. ‘सजते हैं जो तनपे हमारे, वो हैं पिया नैन तुम्हारे. है लट जो माथेपे आयीसी, चूड़ी है मेरी कलाईकी. पलटके जब आना, ये लट ये नज़र लाना, ये छोटासा नज़राना, पिया, याद रखोगे के भूल जाओगे?’ त्या प्रसंगाच्या तात्कालिक निरोपाच्या वेळीही तिला संभाव्य दुराव्याने अस्वस्थ वाटू लागते. मनोज जेव्हा तिला म्हणतो, ‘मी तुला शहरातून सुंदर साडी आणेन, बिंदी, कंगना असे दागिने आणेन.’ तेव्हा तिचा थेट नकार आहे. तिची मागणी वेगळीच आहे. तिला प्रियकारला कायमचे विवाहबंधनात बांधून घ्यायची घाई झाली आहे. ती म्हणते, ‘काही नको, तू परत आलास की मला तुझ्या हाताने भांगात सिंदूर भरून घ्यायचा आहे. विकतची बिंदी नकोच. तिचे मी काय करणार? त्यापेक्षा कपाळावर तू घेतलेल्या चुंबनाच्या खुणाच मला बिंदीसारख्या शोभून दिसतील. ‘चाहतसे ये मांग भरूँगी, बिंदियाका मैं काह* करूंगी, माथेपे लागे सुहानीसी, होंठोंपे तेरे निशानीसी. बलमवा जब आना, बिंदिया तुम्ही बन जाना, ये छोटासा नज़राना... पिया, याद रखोगे के भूल जाओगे?’ (या कडव्यात ‘बिंदियाका मैं ‘काह’ करूंगी’ या ओळीतले ‘बिंदियाका’ हे पुल्लिंगी नाम प्रथम खटकते पण हिंदीच्या अवधी, बुंदेली अशा बोलीभाषांत ‘काह’चा अर्थ ‘क्या?’ असा आहे. त्यामुळे वहिदाला म्हणायचे आहे, ‘त्या तुझ्या विकतच्या बिंदीचे मी काय करू?’) अजून तिचा जीवलग शहराकडे गेलाही नाही तोच तिला त्याच्या परतीची ओढ वाटू लागते. ती म्हणते, ‘माझ्यासाठी तू चंद्राइतका सुंदर आहेस. तो पौर्णिमेला जसा डोंगरामागून हळूच वर येतो तसाच तू ये. परत यायला उशीर करू नकोस. आपल्या दुराव्याच्या काळात माझे मन तुझ्याच विचारात मग्न राहणार आहे. तुझ्या आठवणीच मनात घोळत राहणार! आपले प्रेम कितीही खरे असले तरी मला बाई भीतीच वाटते. तू नसताना तुझ्या येण्याचा थोडाही उशीर मला सहन होणार नाही. तू लवकर परत ये. माझ्यासाठी तुझे परतणे हीच तू आणलेली मोठी भेट ठरणार आहे!’ ‘आँखोंमें चाँद बनके उभरना, देखो बलम देर ना करना. रेहता है दिलमें तुम्हारा दिल, डरता है फिर भी हमारा दिल. बहोत ना तरसाना, तुम लौटके आ जाना, ये छोटासा नज़राना पीया...’ जेव्हा इतक्या प्रेमाने वाट पाहणारे आणि वहिदाइतके सुंदर कुणी अशी वाट पाहत असेल, तर कोणता प्रेमिक परतायला उशीर करेल? कदाचित तो जायचा बेतच रद्द करेल, बरोबर ना?

Comments
Add Comment