Sunday, June 14, 2026

Narayan Seva Sanstha : नारायण सेवा संस्थेकडून मुंबईच्या वडाळा येथील निको हॉलमध्ये १०४ दिव्यांगांना १५४ कृत्रिम अवयवांचे मोफत वाटप

Narayan Seva Sanstha : नारायण सेवा संस्थेकडून मुंबईच्या वडाळा येथील निको हॉलमध्ये १०४ दिव्यांगांना १५४ कृत्रिम अवयवांचे मोफत वाटप

मुंबई : दिव्यांगजनांचे पुनर्वसन, आरोग्य सेवा आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी समर्पित असलेल्या भारतातील अग्रगण्य संस्थांपैकी एक असलेल्या 'नारायण सेवा संस्थे'ने १४ जून रोजी मुंबईतील वडाळा येथील निको हॉल येथे 'मोफत नारायण कृत्रिम अवयव व कॅलिपर वाटप शिबिरा'चे आयोजन केले होते.या शिबिरात १०४ दिव्यांगजनांना त्यांच्या गरजेनुसार १५४ कृत्रिम अवयवांचे (अप्पर-लिंब, लोअर-लिंब आणि मल्टिपल-लिंब प्रोस्थेसिस) मोफत वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा हे होते, ते त्यांच्या धर्मपत्नी मंजू लोढा यांच्यासह उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून कॅम्पचे सहयोगी राधा कृष्ण चॅरिटेबल फाऊंडेशन (यूएसए), जयश्री भाटिया, समाजसेविका निती गोयल, संरक्षक सत्य भूषण जैन (मुंबई) आणि शाखा अध्यक्ष महेश अग्रवाल उपस्थित होते. या शिबिरात संस्थेचे विश्वस्त आणि संचालक देवेन्द्र चौबीसा हे देखील उपस्थित होते, तर आभार प्रदर्शन विदेश विभाग प्रभारी रविश कावडिया यांनी केले.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश दिव्यांगजनांना मोफत स्क्रीनिंग, तपासणी आणि कृत्रिम अवयवांची गरज ओळखून त्यांना व्यापक पुनर्वसन मदत उपलब्ध करून देणे हा होता. लाभार्थ्यांसाठी जपानी आणि जर्मन तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक ३डी प्रिंटिंग प्रोस्थेटिक सोल्यूशन्सचा वापर करण्यात आला, जे अधिक आरामदायी आणि अचूक फिटिंग सुनिश्चित करतात.संस्थेच्या प्रयत्नांचे कौतुक करताना प्रमुख पाहुणे मंगल प्रभात लोढा म्हणाले की, "लाभार्थ्यांना स्वावलंबनाच्या दिशेने पहिले पाऊल टाकतांना पाहणे, हे आम्हाला आमच्या प्रयत्नांचा विस्तार करण्यासाठी आणि देशातील अधिकाधिक समुदायांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरणा देते." त्यांनी महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतात दिव्यांगजनांसाठी नारायण सेवा संस्थेद्वारे राबविल्या जाणाऱ्या सुविधांचे कौतुक केले.संस्थेचे अध्यक्ष प्रशांत अग्रवाल म्हणाले की, "नारायण सेवा संस्थेमध्ये आमचा असा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्ती सन्मानाने आणि आत्मविश्वासाने जगण्यास पात्र आहे. कृत्रिम अवयव हे केवळ एक उपकरण नसून ती गतिशीलता, स्वावलंबन आणि नवीन आशेची किरण आहे. आम्ही दिव्यांगजनांना सक्षम करण्यासाठी वचनबद्ध आहोत."संस्थेने मे महिन्यात मुंबईत दिव्यांगांसाठी एक मापन शिबिर आयोजित केले होते, ज्यामध्ये मोफत शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची निवड करण्यात आली होती. याशिवाय, नुकतेच दिल्लीमध्ये संस्थेच्या वतीने ४६ वा 'दिव्यांग सामूहिक विवाह सोहळा' पार पडला, ज्यामध्ये २१ दिव्यांग जोडप्यांचे लग्न संपन्न झाले.(IND vs PAK Women's T20 World Cup 202)

संस्थेचे संस्थापक कैलाश मानव अग्रवाल यांना सामाजिक सेवेतील योगदानाबद्दल २००८ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा वारसा पुढे चालू ठेवत, संस्थेचे अध्यक्ष प्रशांत अग्रवाल यांना २०२३ मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिव्यांग सक्षमीकरणासाठी 'राष्ट्रीय पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. आतापर्यंत संस्थेने ३९,५९१ पेक्षा जास्त दिव्यांगजनांना कृत्रिम अवयव आणि ४,५२,००० पेक्षा जास्त लाभार्थ्यांना मोफत वैद्यकीय उपचार प्रदान केले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा