Sunday, June 14, 2026

Monsoon Update : मुंबईत मान्सूनच्या आगमनासाठी २० जून उजाडणार ?

Monsoon Update : मुंबईत मान्सूनच्या आगमनासाठी २० जून उजाडणार ?

Mumbai: अरबी समुद्रातील मान्सूनची शाखा सक्रिय असली तरी महाराष्ट्रातील मान्सूनचा पुढील प्रवास लांबल्याचे दिसत आहे. राज्यात मान्सून पोहोचला असला तरी नागरिकांना उकाडा आणि दमट हवामानापासून अद्याप दिलासा मिळालेला नाही. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, मान्सूनचा पुढील प्रवास १९ ते २० जून पर्यंत लांबू शकतो. भारतीय हवामान विभागाने (IMD) काही दिवसांपूर्वीच माहिती दिली होती की, महाराष्ट्रात मान्सून काही दिवस पुढे सरकला आहे. मात्र १३ जूनच्या अद्ययावत अहवालात महाराष्ट्राचा उल्लेख वगळण्यात आला असून राज्यातील काही भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईत दमट उकाडा कायम

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत १६ जूनपर्यंत उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असली तरी मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. मुंबईतील किमान तापमान गेल्या सात दिवसांपासून ३० अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक नोंदवले जात आहे. यामुळे मुंबईकरांना पावसासाठी आणखी वाट बघावी लागणार आहे.(Legal notice served to Amazon)

राज्यात उष्णता कायम

मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे रविवारी उष्णतेची तीव्रता वाढू शकते. तर अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांत सोमवारपर्यंत उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. अमरावती आणि बुलढाणा येथे ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात काय स्थिती?

कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले असले तरी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भाग अजूनही प्रतीक्षेत आहेत. पुण्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. कोल्हापूर आणि घाटमाथ्यावरील भागांत पूर्वमान्सूनच्या हलक्या सरी कोसळू शकतात. खानदेशात मान्सूनचे आगमन रखडले असून तापमान ३९ ते ४२ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वातावरण ढगाळ असले तरी उष्णता कायम राहणार आहे. पुढील आठवड्यात हलक्या पावसाची शक्यता असली तरी जोरदार पावसासाठी जुलै अखेरपर्यंत वाट पाहावी लागू शकते. हवामानातील या बदलांमुळे राज्यातील नागरिकांचे लक्ष आता मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे. २० जूननंतर परिस्थितीत सुधारणा होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा