Saturday, June 13, 2026

UBT Sena : ऑपरेशन टायगर’च्या भीतीने उबाठाकडून मातोश्रीवर बैठकांचे सत्र

UBT Sena : ऑपरेशन टायगर’च्या भीतीने उबाठाकडून मातोश्रीवर बैठकांचे सत्र

सर्व खासदारांना निमंत्रण; पडद्यामागे हालचालींना वेग मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असून, ‘उबाठा’ गटाचे काही खासदार सत्ताधारी शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या बातम्या पुढे येत आहेत. ‘उबाठा’ गटाने त्याची धास्ती घेतली असून, पक्षातील संभाव्य गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रविवारी, १४ जून रोजी ‘मातोश्री’ निवासस्थानी सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली आहे.

शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी यापूर्वी अनेकदा ‘ऑपरेशन टायगर’चा उल्लेख करून ‘उबाठा’चे खासदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यातच आता केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेल्या मोठ्या दाव्यामुळे ‘उबाठा’ गटात अस्वस्थता पसरली आहे. "ऑपरेशन टायगर आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून ते पूर्णत्वाकडे गेले आहे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे ज्या दिवशी योग्य वेळ आणि मुहूर्त ठरवतील, त्या दिवशी हे ऑपरेशन अधिकृतपणे पूर्ण होईल," अशी माहिती जाधव यांनी परभणी येथे माध्यमांशी बोलताना दिली.

‘उबाठा’ गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मध्यंतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट आणि खासदार संजय जाधव यांच्या पत्नीच्या तब्येतीची शिंदे यांनी केलेली विचारपूस, यांमुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले होते. त्यातच, धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘उबाठा’ गटाच्या एका महत्त्वाच्या बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दांडी मारल्याने संशयाची धार तीव्र झाली आहे. अशा स्थितीत ‘मातोश्री’वर होणाऱ्या बैठकीत नेमके किती खासदार उपस्थित राहतात आणि काय निर्णय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >