Friday, June 12, 2026

Sharad Pawar : काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव शरद पवारांनी आधीच दिला होता!

Sharad Pawar : काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव शरद पवारांनी आधीच दिला होता!

नाना पटोलेंचा दावा; प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंकडून मात्र इन्कार

मुंबई : एकीकडे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच, काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबाबत खळबळजनक दावा केला आहे. "राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव खुद्द शरद पवार यांनी याआधीच दिला होता," असे ते म्हणाले. मात्र, नाना पटोलेंचा हा दावा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी फेटाळून लावला असून विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव महाविकास आघाडीच्या पटलावर नसल्याचे स्पष्ट केले आहे. या वादामुळे मविआतील अंतर्गत सुंदोपसुंदी आणि दोन्ही पक्षांमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

काँग्रेस हायकमांडने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तातडीने दिल्लीला पाचारण केले आहे. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी मुंबई विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले यांनी शरद पवारांचा संदर्भ देत मोठा दावा केला. पटोले म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव ऑलरेडी पवार साहेबांनी दिला होता. मात्र, काही तांत्रिक किंवा राजकीय कारणांमुळे त्यावर निर्णय घेण्यास उशीर झाला. आज देशातील घटनात्मक व्यवस्था धोक्यात आली असून धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन रोखण्यासाठी, तसेच देश आणि संविधान वाचवण्यासाठी सर्व सेक्युलर पक्षांनी एकत्रित येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे." पटोले यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

नाना पटोलेंच्या या दाव्यावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी यावर तीव्र आक्षेप घेत विलीनीकरणाची शक्यता फेटाळून लावली. शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, "काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा कोणताही प्रस्ताव शरद पवार यांच्याकडून देण्यात आलेला नाही आणि काँग्रेसकडूनही असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. जर असा काही विषय असता, तर नक्कीच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून आम्हाला त्याची कल्पना दिली गेली असती."

बुधवारी सकाळी शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीचा हवाला देत शिंदे म्हणाले, "या बैठकीत विलीनीकरणाच्या कोणत्याही प्रस्तावावर शरद पवार यांनी आमच्याशी चर्चा केलेली नाही. माझ्यापर्यंत अशी कोणतीही अधिकृत माहिती आलेली नसल्याने समोर आलेल्या वृत्तामध्ये काडीचेही तथ्य नाही", असे शिंदे यांनी सांगितले. आता सर्वच नेत्यांना 'शहाणपण' सुचले - अंकुश काकडे

- दरम्यान, या वादावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट करताना काँग्रेसला टोला लगावला आहे. काकडे म्हणाले, "संविधान वाचवण्यासाठी सर्व डाव्या आणि पुरोगामी विचारांच्या पक्षांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे, यात दुमत नाही. पण काँग्रेसने राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला आहे या चर्चेत तथ्य नाही. असा प्रस्ताव जेव्हा येईल तेव्हा वरिष्ठ नेते त्यावर निर्णय घेतील." - "अलीकडच्या काळातील दोन-तीन निवडणुकांमुळे आता सर्वच पक्षाच्या नेत्यांना 'शहाणपण' सुचले आहे. मग ते राहुल गांधी असोत, ममता बॅनर्जी असोत किंवा अन्य कोणी... सगळेच राजकारणात तावून सुलाखून निघाले आहेत. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी एकत्र येणे गरजेचे असले, तरी विलीनीकरणाची कोणतीही घाई आमच्या बाजूने नाही," असे काकडे यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >