Wednesday, August 12, 2026

Nashik KumbhMela : १३ प्रमुख आखाड्यांपलीकडेही धार्मिक संस्थांनाही मिळणार रु १५ लाखांपर्यंत निधी, कुंभमेळा प्राधिकरणाकडुन कार्यपध्दती निश्चित

Nashik KumbhMela : १३ प्रमुख आखाड्यांपलीकडेही धार्मिक संस्थांनाही मिळणार रु १५ लाखांपर्यंत निधी, कुंभमेळा प्राधिकरणाकडुन कार्यपध्दती निश्चित

Nashik KumbhMela : नाशिकमधील ३ आणि त्र्यंबकेश्वरमधील १० प्रमुख आखाड्यांपलीकडे आता इतर आखाडे, त्यांच्याशी संलग्न आश्रम, मंदिरे, संस्थाने आणि महत्त्वाच्या धार्मिक स्थळांनाही सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध होणार आहे. यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने प्रमाणित कार्यपद्धती (SOP) निश्चित केली आहे.

या अंतर्गत संबंधित धार्मिक संस्था व स्थळांवर भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पात्र संस्थांना कमाल १५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. कुंभमेळ्याच्या काळात भाविकांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, तसेच निधीचे नियोजनबद्ध वितरण व्हावे, या उद्देशाने ही प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. सर्व संबंधित संस्थांनी निर्धारित नमुन्यातील प्रस्ताव २५ ऑगस्ट २०२६ पर्यंत सादर करावेत. प्राप्त प्रस्तावांची स्थानिक समित्यांकडून ३१ ऑगस्टपर्यंत प्राथमिक छाननी करून पुढील कार्यवाहीसाठी कुंभमेळा प्राधिकरणाकडे पाठविण्यात येणार आहे.(Nashik Municipal Corporation)

दोन स्तरांवर प्रस्तावांची छाननी

प्रमाणित कार्यपद्धतीनुसार नाशिक महापालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र स्थानिक समिती, तर नाशिक जिल्ह्यातील महापालिका क्षेत्राबाहेरील ठिकाणांसाठी जिल्हास्तरीय स्थानिक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समित्यांकडून प्रस्तावांची प्राथमिक छाननी केल्यानंतर ते कुंभमेळा प्राधिकरणाच्या स्तरावरील समितीकडे पाठविण्यात येतील. नाशिक जिल्ह्याबाहेरील ठिकाणांकरिता सर्व अधिकार प्राधिकरणस्तर समितीला असतील. कुंभमेळा प्राधिकरणस्तरीय समिती कुंभमेळा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावांचे एकत्रित परीक्षण करेल. त्यानंतर आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून शिफारशी कुंभमेळा प्राधिकरणाच्या प्रशासकीय मंजुरीसाठी सादर केल्या जातील.

स्थानिक समित्यांच्या बैठका दरमहा घेण्यात येणार असून, त्यानंतर प्राधिकरणस्तरीय समितीचीही दरमहा बैठक घेऊन प्रस्तावांवर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. भाविकांसाठी दिल्या जाणा-या सुविधांवर याद्वारे भर दिला जाणार आहे. संबंधित संस्थांनी निर्धारित नमुन्यात प्रस्ताव सादर करताना प्रस्तावित स्थळाची माहिती, सध्याच्या सुविधा, कुंभमेळ्याच्या काळातील अपेक्षित भाविकसंख्या, आवश्यक सुविधा आणि प्रस्तावित कामांचा तपशील सादर करायचा आहे.

यामध्ये निवास व्यवस्था, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, पार्किंग, आरोग्य सुविधा आणि आपत्कालीन व्यवस्थापनाशी संबंधित सुविधा यांचा समावेश करता येणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात भाविकांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या माध्यमातून धार्मिक संस्थांसोबत समन्वय वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. (Nashik Municipal Corporation)

स्थानिक गरजा लक्षात घेऊन निधीचे योग्य नियोजन

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीत विविध धार्मिक संस्था आणि स्थळांचे योगदान महत्त्वाचे आहे. या संस्थांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देताना भाविकांची संभाव्य संख्या आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन निधीचे योग्य नियोजन करण्यात येत आहे. निर्धारित प्रक्रियेमुळे प्रस्तावांचा समन्वयाने विचार करून आवश्यकतेनुसार प्राधान्यक्रम निश्चित करता येईल. असे नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह म्हणाले.

जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना निर्देश

कुंभमेळा प्राधिकरणाने SOP सोबत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय आणि नाशिक महापालिका प्रशासनाला समित्यांची स्थापना करून प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी किंवा त्यांच्याकडून प्राधिकृत करण्यात आलेले अधिकारी असतील. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद; पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण; सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा आणि एमएसआयडीसीचे अधीक्षक अभियंता; सार्वजनिक बांधकाम विभागाचे विद्युत कार्यकारी अभियंता; त्र्यंबक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी हे समितीचे सदस्य असतील. निवासी उपजिल्हाधिकारी हे सदस्य सचिव असतील.

नाशिक महापालिका क्षेत्रासाठीच्या समितीचे अध्यक्ष महापालिका आयुक्त किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी असतील. पोलीस आयुक्त, तहसीलदार नाशिक, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा आणि एमएसआयडीसीचे अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विद्युत कार्यकारी अभियंता, महापालिकेचे उद्यान निरीक्षक आणि शहर अभियंता हे समितीचे सदस्य असतील. शहर अभियंता सदस्य सचिव असतील. (Nashik Municipal Corporation)

दोन्ही समित्यांनी प्राप्त प्रस्तावांची निर्धारित पध्दतीनुसार छाननी प्रक्रिया करून ३१ ऑगस्टपर्यंत प्राथमिक प्रक्रीया पूर्ण करावी, तसेच पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव कुंभमेळा प्राधिकरणाच्या स्तरावरील समितीकडे वेळेत पाठवावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

महत्त्वाचे

SOP : आखाडे, आश्रम व धार्मिक स्थळांसाठी पायाभूत सुविधांकरीता निधी

व्याप्ती : नाशिकमधील ३ आणि त्र्यंबकेश्वरमधील १० प्रमुख आखाड्यांव्यतिरिक्त इतर आखाडे व धार्मिक संस्था

लाभार्थी : आखाडे, संलग्न आश्रम, मंदिरे, संस्थाने व अन्य महत्त्वाची धार्मिक स्थळे

आर्थिक सहाय्य : पात्र संस्थांना कमाल १५ लाख रुपयांपर्यंत

समिती व्यवस्था : स्थानिक समिती - नाशिक महापालिका, जिल्हाधिकारी यांचे स्तरावरील समिती आणि कुंभमेळा प्राधिकरणस्तरीय समिती

प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत : २५ ऑगस्ट २०२६

स्थानिक समितीकडून प्राथमिक छाननी : ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत

बैठक व्यवस्था : स्थानिक व प्राधिकरणस्तरीय समित्यांची दरमहा बैठक

प्रस्तावातील प्रमुख सुविधा : निवास, स्वच्छता, पिण्याचे पाणी, पार्किंग, आरोग्य व आपत्कालीन व्यवस्थापन

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >