Wednesday, June 10, 2026

Devendra Fadnavis : 'नव भारताच्या निर्मितीमध्ये पंतप्रधान मोदींचे स्थान अढळ'

Devendra Fadnavis : 'नव भारताच्या निर्मितीमध्ये पंतप्रधान मोदींचे स्थान अढळ'

मुंबई  : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंडित नेहरू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाची तुलना केल्यानंतर राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या वादावर मुख्यमंत्र्यांनी ही सडेतोड प्रतिक्रिया दिली. नव्या भारताच्या निर्मितीमध्ये पंतप्रधान मोदींचे स्थान अढळ असून, त्यांची कोणाशीही तुलना करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ व्या वर्धापनदिनी शरद पवार यांनी काँग्रेस आणि नेहरू-गांधी घराण्याच्या देशासाठीच्या योगदानाचा उल्लेख करत नेहरू आणि मोदी यांची तुलना होऊ शकत नसल्याचे म्हटले होते. यावर नवी दिल्लीत माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी पवारांचे संपूर्ण भाषण ऐकले नसल्याचे सांगत अर्धवट गोष्टींवर बोलणे टाळले; परंतु नेहरूंबाबत निर्माण केल्या जाणाऱ्या स्पर्धेचा त्यांनी समाचार घेतला.

फडणवीस म्हणाले, "देशात सर्वाधिक काळ सेवा बजावणाऱ्या निर्वाचित पंतप्रधानांमध्ये पंडित नेहरूंचा ४ हजार ३९८ दिवसांचा एक रेकॉर्ड होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता ४ हजार ३९९ दिवस पूर्ण केले असून हा कार्यकाळ पुढेही सुरू राहणार आहे. हा निव्वळ अधिकृत नोंदींचा भाग आहे. नेहरूंच्या काळात काय झाले आणि मोदींच्या काळात काय घडले, हे देशाला ठाऊक आहे. त्यामुळे इथे स्पर्धेचा किंवा तुलनेचा विषयच नाही," असे सांगत मुख्यमंत्र्यांनी मोदींच्या नेतृत्वाचा आलेख उंचावत असल्याचे आकडेवारीसह स्पष्ट केले.

'बुडत्याला काडीचा आधार'

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'मोदी सरकार एक वर्षही टिकणार नाही' या विधानाचा समाचार घेताना मुख्यमंत्री म्हणाले, "हे म्हणजे बुडत्याला काडीचा आधार मिळण्यासारखे आहे. स्वतःच्या मनाची समजूत घालण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना खोटे स्वप्न दाखवण्यासाठी ते गेली १० वर्षे अशा 'चमत्काराची' भाषा करत आहेत. मात्र, प्रत्यक्षात मोदीजीच नवनवीन राजकीय चमत्कार घडवत असून, पश्चिम बंगालमधील भाजपचा विजय संपूर्ण विश्वाला थक्क करणारा आहे," असा टोला त्यांनी लगावला.

"महाराष्ट्राच्या प्रश्नांवर मोदीजी नेहमीच संवेदनशील राहिले आहेत. २०१५ च्या भीषण दुष्काळात मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो, तेव्हा त्यांनी आमच्यासाठी विशेष 'बळीराजा योजना' मंजूर केली. यामुळेच विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील १०० प्रलंबित धरणे आपण पूर्ण करू शकलो," अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधानांच्या कार्यशैलीचा गौरव केला.

Comments
Add Comment