इस्रोच्या ‘रॉकेट वुमन’ची साडी अमेरिकेच्या अंतराळ संग्रहालयात

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत नंदिनी हरीनाथ यांची लाल आणि निळ्या रंगाची एक साडी चर्चेत आहे. वॉशिंग्टन येथील जगप्रसिद्ध ‘स्मिथसोनियन नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियम’मध्ये इस्रोच्या वरिष्ठ महिला शास्त्रज्ञ नंदिनी हरिनाथ यांनी परिधान केलेली लाल आणि निळ्या रंगाची सिल्क साडी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. आंतरशाखीय अंतराळ विज्ञानाच्या संग्रहात स्थान मिळवणारी ही भारतातील पहिलीच वस्तू, तर या संग्रहालयातील पहिलीच साडी ठरली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) ‘मंगळयान’ मोहिमेचे यश संपूर्ण जगाने पाहिले आहे. आता या ऐतिहासिक मोहिमेची आणि भारताच्या ‘रॉकेट वुमन’ची एक अनोखी ओळख थेट अमेरिकेत पोहोचली आहे. म्युझियममध्ये ठेवण्यात आलेली ही साडी केवळ एक वस्त्र नसून, भारताच्या एका अत्यंत कठीण अंतराळ मोहिमेच्या यशाची साक्षीदार आहे.


५ नोव्हेंबर २०१३ रोजी श्रीहरीकोटा येथून मंगळयान अवकाशात झेपावले होते. त्यानंतर डिसेंबर २०१३ मधील एक दिवस मोहिमेसाठी अत्यंत धोक्याचा आणि महत्त्वाचा होता. या मोहिमेच्या डेप्युटी ऑपरेशन्स डायरेक्टर असलेल्या नंदिनी हरिनाथ यांच्यासह सर्व शास्त्रज्ञ कंट्रोल रूममध्ये उपस्थित होते. अंतराळ यानाला पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर काढून मंगळाच्या दिशेने ३०० दिवसांच्या प्रवासावर ढकलणे हा सर्वात मोठा टप्पा होता. नंदिनी यांच्या मते, तो दिवस ‘करो या मरो’ असा होता. यान कुठे, कसे आणि कधी जाणार हे त्या दिवशी ठरत होते. याच अत्यंत महत्त्वाच्या दिवशी नंदिनी यांनी ही लाल-निळी सिल्क साडी परिधान केली होती. पुढे २४ सप्टेंबर २०१४ रोजी भारताचे मंगळयान मंगळाच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचले. मंगळयान मोहीम फत्ते झाल्यानंतर इस्रोच्या कंट्रोल रूममधील साडी नेसलेल्या भारतीय महिला शास्त्रज्ञांच्या आनंदाचा आणि सुखाचा फोटो जगभर प्रचंड व्हायरल झाला होता.

म्युझियमचे अंतराळ इतिहास क्युरेटर मॅट शिंडेल यांनी सांगितले की, तो फोटो मनाला भिडणारा होता. पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या रॉकेट सायन्स क्षेत्रात भारतीय महिलांनी मिळवलेले हे यश थक्क करणारे होते. याच कारणामुळे त्यांनी २०२० मध्ये नंदिनी हरिनाथ यांच्याशी ईमेलद्वारे संपर्क साधला. भारताच्या या यशाचे प्रतीक म्हणून कोणती वस्तू म्युझियममध्ये ठेवता येईल, यावर चर्चा करताना नंदिनी यांनी त्या खास दिवशी नेसलेली साडी देण्याचे मान्य केले. त्यामुळे भारतीय महिला शास्त्रज्ञांच्या सन्मानार्थ अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील स्मिथसोनियन नॅशनल एअर ॲण्ड स्पेस म्युझियममध्ये नंदिनी यांनी परिधान केलेली ही लाल-निळ्या रंगाची साडी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. नंदिनी यांनी आपल्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत इस्त्रोसाठी विविध प्रकारच्या चौदा महत्त्वपूर्ण मोहिमा आपल्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पाडल्या. त्यांचे वडील इंजिनीअर तर आई गणिताची प्राध्यापिका होती. त्यामुळे उपजतच गणित आणि अभियांत्रिकी विषयाची आवड निर्माण झाली. नंदिनी यांनी त्यांचे शिक्षण अभियांत्रिकी क्षेत्रातून पूर्ण केले आहे.नंदिनी यांनी भारतीय अंतराळ क्षेत्रासाठी जे योगदान दिले आहे, ते निश्चितच गौरवास्पद आहे. शिवाय त्या ‘रॉकेट वुमन’ म्हणून देखील ओळखल्या जातात. मंगळयानसाठी त्यांनी ज्या प्रकारे मेहनत घेतली, ती सर्वांनाच प्रेरणादायी आहे. अशा या थोर महिला शास्त्रज्ञाचा सन्मान म्हणून त्यांच्या साडीची निवड करण्यात आली. यावरून आणखी एक गोष्ट सिद्ध होते की, एकदा का तुम्ही यशस्वी झालात की तुमची प्रत्येक गोष्ट यशास पात्र ठरते.
Comments

Anil Shantaram bhat    June 15, 2026 09:46 AM

Great

Add Comment

प्रेमात हरवलेली माणुसकी

मागोवा-वैष्णवी भोगले प्रेम... हा शब्द उच्चारला की डोळ्यांसमोर विश्वास, आपुलकी, त्याग आणि एकमेकांसाठी जगण्याची

'शुद्धते'चा बुरखा आणि पुरुषी मानसिकतेची झापड

प्रासंगिक-विवेक कांबळे नमध्ये डेटॉलच्या लाँड्री सॅनिटायझरच्या जाहिरातीवरून सध्या वादळ उठलेले आहे. पण, ही केवळ

कन्यादान की जबाबदारीचा अंत?

वेध-सीमा पवार मुलीला "परकी" समजणारी मानसिकता बदलली पाहिजे. कन्यादान म्हणजे मुलीशी असलेले नाते संपणे नाही.

Minister Nitesh Rane : शुभेच्छांचा वर्षाव, पण उत्सव नाही, नितेश राणे यांचा संवेदनशील निर्णय

संभव इंगोले Nitesh Rane Birthday : आज, २३ जून २०२६, महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग

जे मनात, तेच ओठांवर...एक बेधडक व्यक्तिमत्त्व : मंत्री नितेश राणे

राजकारणात शब्दांचे खेळ करून सोयीस्कर मुखवटे घालणाऱ्यांची तशी मोठी गर्दी असते; पण या गर्दीत कोणताही मुखवटा न

महाराष्ट्राच्या ‘ब्लू इकॉनॉमी’चा नवा शिल्पकार : नितेश राणे

सुहास शेलार महाराष्ट्राला ८७७ किलोमीटरची विस्तीर्ण आणि समृद्ध किनारपट्टी लाभली असली, तरी प्रदीर्घ काळ तिची ओळख