फेरफटका सीमा मालाणी
काही वर्षांपूर्वी संगमनेर महाविद्यालयात प्रसिद्ध लेखक राजन खान यांची एक, एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सर्वांसाठी खुली होती. ‘लेखन कसे करावे’ असा विषय होता. मला प्रचंड उत्सुकता होती. राजन खान यांचे तोवर मी एकही पुस्तक वाचलेले नव्हते. फक्त काही वृत्तपत्रांमधील लेख वाचले होते. त्या कार्यशाळेला मी गेले. बीए, एमएचे बरेच विद्यार्थी-विद्यार्थिनी होते. बहुतेक मी एकटीच गृहिणी होते. चार-पाच तासांच्या त्या कार्यशाळेत ते नक्की काय बोलले ते आठवत नाही पण मी त्यांना विचारलेला प्रश्न व त्यांचे उत्तर मात्र आठवते. मी त्यांना विचारले,“मी एक सामान्य गृहिणी आहे. मला वाचनाची आवड आहे. चांगले पुस्तक वाचले की मी खूप दिवस भारावलेल्या अवस्थेत असते. मला खूप खूप लिहावेसे वाटते. जीवनाविषयी, मानवी आयुष्याविषयी वगैरे... पण काय लिहावे, कसे लिहावे कळत नाही. लेखनासाठी आवश्यक असं अनुभवसंपन्न किंवा विविधता असलेलं माझं जग नाही. फारसा प्रवास नाही. खूप जणांशी माझा संपर्क आहे असंही नाही. माझं अनुभवविश्व फारच मर्यादित आहे, तर लिखाणासाठी मी अधिक काय करू?”त्यांनी दिलेले उत्तर आजही माझ्या लक्षात आहे. ते म्हणाले,“खूप चांगलं लिहिण्यासाठी खूप अनुभव मुद्दामहून घ्यावे लागतात, खूप प्रवास करावा लागतो, खूप माणसे संपर्कात असावी लागतात असे मुळीच नाही. तुमच्याकडे तुमचं स्त्रीत्व आहे त्यावर लिहा. तुम्हाला जमेल त्या भाषेत, जमेल त्या शब्दात लिहा. तुम्हाला जेवढं उमगलं आहे तेवढं लिहा. स्वतःच्या आनंदासाठी किंवा व्यक्त होण्याची एक गरज म्हणून लिहा. लिहून जर तुम्हाला हलकं व मोकळं वाटत असेल, तर अवश्य लिहा. लिहिलेलं कुणी वाचलंच पाहिजे असंही नाही आणि हो, त्या लिखाणाचा खरोखरच कुणाला उपयोग होणार असेल तर नक्की लिहा. कदाचित तुम्हाला जे वाटतंय तेच इतर स्त्रियांनाही वाटत असेल किंवा मग तुमचा एखादा अनुभव हा खरोखरच खूप वेगळा असू शकेल. आपण का लिहावे हे जर तुमचे स्वतःशी स्पष्ट असेल तर तुम्ही नक्कीच लिहू शकता.”
त्यांचे उत्तर मला आज पटते. ठरवून कुणी लेखक/लेखिका होऊ शकत नाही. जसं जसं आपलं व्यक्तिमत्त्व घडत जातं तसं तसं आपली व्यक्त होण्याची एक पद्धत विकसित होत जाते. कुणी गाण्यातून, कुणी चित्रातून, कुणी अभिनयातून, तर कुणी लेखनातून व्यक्त होतात. प्रत्येक व्यक्तीगणिक ही व्यक्त होण्याची तऱ्हा वेगळी असू शकते. त्यासाठी आपण कलाकार असणं आवश्यकच असतं असं मुळीच नाही तर केवळ माणूस असणंही पुरेसं असतं.आता मी फेसबुकवर लिखाणाला सुरुवात केली आहे. कशासाठी? तर मला आनंद मिळतो म्हणून. लोकांना शहाणं करावं हा उद्देश मुळीच नाही, हे लिखाण खूप वरवरचं आहे याची मला जाणीव आहे पण हा एक प्रकारचा सराव आहे. साधासाच. अनुभव रंजक कसा करावा, एखादी घटना उत्कंठावर्धक कशी मांडावी, उपहासात्मक कसे लिहावे, आपली जगण्याविषयी जी काही छोटी-मोठी भूमिका आहे ती कशी मांडावी, शब्दमर्यादा असेल तर नेमकं कसं लिहावं, आपलं आपणच एखाद्या घटनेचं विश्लेषण कसं शब्दबद्ध करावं, काल्पनिक संवाद कसे लिहावे, अभिनेवेशरहित कसे लिहावे वगैरे वगैरे हे सगळं अजमावून पाहण्यासाठीचा हा सराव आहे. कुणी वाचा अथवा न वाचा, स्वतःला नव्याने शोधण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे म्हणा ना. लिहून तर पाहू या भावनेने मी लिहिते.हे करता करताच राजन खान यांनी सांगितलेली वाक्ये मला आठवली व मी थबकलेच.
केवळ स्त्रीचं शरीर घेऊन जन्माला आलो म्हणून स्त्रीत्व नव्हे हे एकदम जाणवलं. ती एक भावना आहे, विचार आहे. स्त्रीवाद म्हणजे फेमिनिझमचा थोडा थोडा अर्थ कळू लागला. जगताना तो किती आवश्यक आहे हेही जाणवले ते परवाच्या पुणे येथील स्त्री मुक्ती परिषदेत.
स्त्रीच्या शरीरात एका पुरुषाचं मन असू शकतं किंवा पुरुषाच्या शरीरात एका स्त्रीचं मन असू शकतं हे मी "LGBTQ+" या लोकांसंबंधीत बोलत आहे. अत्यल्प प्रमाणात का असेनात पण अशी माणसं असतात. महाभारतात ‘शिखंडी’ होताच की. ही निसर्गाची प्रक्रिया आहे. त्यात अनैसर्गिक असे काहीच नाही. भावभावना असलेली ती जिवंत माणसेच असतात. पण आजही त्यांच्या वाट्याला खूपच अवहेलना येते. शिखंडी त्या काळात राजा होता म्हणजेच समाजात या समूहाला मान्यता होती. पण आज काय परिस्थिती आहे? आजही शुभकार्याच्या वेळी समाज त्यांची 'दुवा' घेतात पण आज प्रत्यक्षात मात्र ते खूप गुदमरलेल्या अवस्थेत जगतात. त्यांना माणूस म्हणून स्वीकारले जात नाही. असा हा आपला ढोंगी समाज आहे.
म्हणूनच आपण स्त्री आहोत की पुरुष आहोत याचा कोणताही दुराभिमान असता कामा नये असेच वाटते. आपल्या समाजात मर्दानगीला नको तेवढे महत्त्व आहे याची स्त्रियांना जाणीव असावी म्हणूनच स्त्रीवाद म्हणजे केवळ स्त्रियांचे अस्तित्व असे नव्हे तर स्त्री व पुरुष या दोघांची मुक्ती. स्त्री-मुक्ती या शब्दाचा हा एक व्यापक अर्थ आहे. समाजातील अनेक सहिष्णू पुरुष हे स्त्रीवादीच असतात कारण ते स्त्री व पुरुष या दोघांना समान मानतात व तसे वागतात. मानवतावादी असणं म्हणजेच स्त्री-मुक्ती.
खरे तर आपल्या संस्कृतीमध्ये "अर्धनारी-नटेश्वर" यासारखी सुंदर व वास्तव संकल्पना आहे. त्या संकल्पनेचा आपण अधिक खोलात जाऊन विचार केला तर आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होत जाईल.