Wednesday, September 16, 2026

Devendra Fadnavis : नीट' परीक्षेच्या नियोजनाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Devendra Fadnavis : नीट' परीक्षेच्या नियोजनाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई : गेल्या महिन्यात झालेल्या पेपरफुटीच्या गंभीर प्रकरणामुळे 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी'ने (एनटीए) रद्द केलेली 'राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा' (नीट) येत्या २१ जून रोजी पुन्हा घेतली जाणार आहे. या केंद्रीय पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रांचे नियोजन चोख ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी 'वर्षा' निवासस्थानी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सविस्तर आढावा घेतला.

'राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा' (नीट) देणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पारदर्शक आणि तणावरहित वातावरण असावे. सर्व यंत्रणांनी सतर्क राहून परीक्षा केंद्रांवर आवश्यक उपाययोजना करून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, यासाठी अधिक दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. या बैठकीला 'एनटीए'चे महासंचालक अभिषेक सिंह हे देखील उपस्थित होते. त्यांनी सादरीकरणाद्वारे महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रांची संख्या, तिथे उपलब्ध करून दिलेल्या सुविधा आणि राष्ट्रीय स्तरावरून करण्यात आलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी, राज्यातील पुणे आणि लातूर येथील परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना राज्य पोलिसांना दिल्या. सर्व केंद्रांवरील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवून सायबर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.

पेपरफुटीमुळे निर्माण झालेल्या संवेदनशील वातावरणात विद्यार्थी आणि पालकांमध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी सोशल मीडियावरील अफवांना तातडीने आळा घालण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सायबर विभागाला दिले. तसेच, परीक्षेच्या दिवशी जून महिन्यातील पावसाची शक्यता लक्षात घेऊन वॉटरप्रूफिंग, अखंडित वीजपुरवठा, पिण्याचे पाणी आणि वाहतूक नियोजन चोख ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >