Friday, June 5, 2026

IND vs AFG Test : अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात साई सुदर्शन कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला येणार ? गंभीरने दिली माहिती

IND vs AFG Test : अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात साई सुदर्शन कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला येणार ? गंभीरने दिली माहिती

मुंबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 6 जूनपासून न्यू चंदीगड येथे होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी युवा फलंदाज साई सुदर्शनबाबत मोठ्या निर्ण्याची घोषणा केली आहे. अफगानिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात साई सुदर्शनला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी देण्यात येऊ शकते असं गौतम गंभीरने सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

साई सुदर्शनला कसोटी क्रिकेटमध्ये अद्याप स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुरेशी संधी मिळालेली नाही. इंग्लंडसारख्या आव्हानात्मक परिस्थितीत त्याने कसोटी करिअरची सुरुवात केली आहे. काही सामन्यांच्या आधारे त्याचे मूल्यांकन करणे योग्य ठरणार नाही. सुदर्शनने आतापर्यंत 6 कसोटी सामन्यांतील 11 डावांत 302 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 27.45 आहे. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 87 आहे. मात्र आयपीएल 2026 मध्ये त्याने दमदार कामगिरी करत 17 डावांत 722 धावा केल्या. यात एका शतकासह आठ अर्धशतकांचा समावेश होता.

साईबाबत गौतम गंभीरचे मोठे विधान

साई सुदर्शनला सातत्यपूर्ण संधी मिळाली नाही. इंग्लंडमध्ये सुरुवात करणे कोणत्याही युवा फलंदाजासाठी सोपे नाही. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याच्यावर विश्वास दाखवणे आणि त्याला सलग संधी देणे आवश्यक आहे, असे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाले. तिसऱ्या क्रमांकावर देवदत्त पडिक्कलचे नावही चर्चेत आले होते. मात्र संघात केवळ 11 खेळाडूंनाच संधी देता येते आणि प्रत्येकाला आपली वेळ येण्याची वाट पाहावी लागते, असे गंभीर यांनी सांगितले.पडिक्कलने भारतासाठी दोन कसोटी सामने खेळताना तीन डावांत 90 धावा केल्या आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने 15 डावांत 464 धावा करत आपल्या संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याची कामगिरी प्रभावी राहिली आहे. रणजी ट्रॉफीमध्ये त्याने सहा सामन्यांत 543 धावा केल्या, तर विजय हजारे ट्रॉफीत 725 धावा करत तो दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता.अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीत साई सुदर्शनला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय हा भारतीय संघ व्यवस्थापनाचा युवा खेळाडूंवरील दीर्घकालीन विश्वास दाखवणारा मानला जात आहे. आता या संधीचे सोने करत साई सुदर्शन संघाचा विश्वास सार्थ ठरवतो का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >