Wednesday, June 3, 2026

Mumbai Local News : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! आता बोरिवलीहून थेट पनवेलपर्यंत लोकलने प्रवास

Mumbai Local News : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! आता बोरिवलीहून थेट पनवेलपर्यंत लोकलने प्रवास

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासातील सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक असलेली गाड्या बदलण्याची कसरत आणि दादर-कुर्ल्यासारख्या स्थानकांवरील प्रचंड गर्दी लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वे (Western Railway) आणि हार्बर रेल्वे (Harbour Railway) मार्गावरील लाखो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून हार्बर रेल्वेचा विस्तार थेट बोरिवलीपर्यंत (Borivali) करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे बोरिवली (Borivali), कांदिवली (Kandivali), मालाड (Malad) परिसरातील प्रवाशांना आता नवी मुंबई (Navi Mumbai), सीएसएमटी (CSMT) आणि पनवेलसाठी (Panvel) थेट लोकल सेवा उपलब्ध होणार आहे.

बोरिवली ते पनवेल थेट प्रवास; गाड्या बदलण्याचा त्रास संपणार

सध्या हार्बर रेल्वेची सेवा गोरेगाव स्थानकापर्यंत मर्यादित आहे. त्यामुळे बोरिवली, कांदिवली आणि मालाडमधील प्रवाशांना नवी मुंबई किंवा पनवेलला जाण्यासाठी दादर (Dadar), कुर्ला (Kurla), अंधेरी (Andheri) किंवा वांद्रे (Bandra) येथे गाड्या बदलाव्या लागतात. विशेषतः कार्यालयीन वेळेत या स्थानकांवर होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र, हार्बर रेल्वेचा विस्तार बोरिवलीपर्यंत झाल्यानंतर प्रवाशांना थेट बोरिवलीवरून पनवेल, वांद्रे, वडाळा रोड (Wadala Road) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे जाता येणार आहे. त्यामुळे एका टोकावरील उपनगरातून दुसऱ्या टोकापर्यंतचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि जलद होणार आहे.

MUTP-3B अंतर्गत राबवला जाणार महत्त्वाकांक्षी प्रकल्प

हार्बर रेल्वे विस्ताराचा हा प्रकल्प मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP-3B) अंतर्गत राबवला जाणार आहे. पनवेल-बोरिवली-वसई उपनगरी रेल्वे मार्गाच्या विकासासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली असून या प्रकल्पावर एकूण ८९८.२९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

यामध्ये विविध तांत्रिक आणि पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. अभियांत्रिकी कामांसाठी ७२७.६४ कोटी रुपये, विद्युत कामांसाठी ८८.३३ कोटी रुपये आणि सिग्नलिंग व दूरसंचार यंत्रणेसाठी ८२.३१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या निधीतून नवीन रेल्वे रुळ, अत्याधुनिक सिग्नलिंग प्रणाली आणि आवश्यक तांत्रिक बदल करण्यात येणार आहेत.

मुंबईकरांचा वेळ वाचणार, प्रवास होणार अधिक आरामदायी

सध्या बोरिवलीहून पनवेल किंवा नवी मुंबई गाठण्यासाठी प्रवाशांना अनेक टप्प्यांत प्रवास करावा लागतो. दादर किंवा कुर्ला येथे उतरून दुसरी लोकल पकडावी लागते. त्यामुळे वेळ तर खर्ची पडतोच, शिवाय गर्दीमुळे प्रवासही त्रासदायक ठरतो. हार्बर रेल्वेची सेवा बोरिवलीपर्यंत वाढवण्यात आल्यास प्रवाशांना एकाच लोकलमध्ये बसून थेट पनवेल किंवा नवी मुंबईपर्यंत जाता येईल. यामुळे दररोज किमान २० ते ३० मिनिटांचा वेळ वाचण्याची शक्यता असून लाखो प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

पश्चिम रेल्वेवरील वाढता ताण कमी होण्यास मदत

मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये लोकसंख्येची घनता सातत्याने वाढत आहे. परिणामी पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्यांवर मोठा ताण निर्माण होत आहे. हार्बर रेल्वेचा विस्तार बोरिवलीपर्यंत झाल्यानंतर प्रवाशांना प्रवासासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होईल. यामुळे विरार (Virar), नालासोपारा (Nalasopara), वसई (Vsai), बोरिवली आणि कांदिवली परिसरातील अनेक प्रवासी हार्बर मार्गाचा वापर करू शकतील. परिणामी पश्चिम रेल्वेवरील धीम्या (Slow) गतीच्या लोकल गाड्यांमधील गर्दी कमी होण्यास मदत होईल.

मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेसाठी ठरणार गेमचेंजर

हार्बर रेल्वेचा बोरिवलीपर्यंत होणारा विस्तार हा मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. यामुळे पश्चिम उपनगर आणि नवी मुंबई यांच्यातील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार असून लाखो प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान, आरामदायी आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे. दादर आणि कुर्ल्यासारख्या गर्दीच्या स्थानकांवरील अवलंबित्व कमी करत मुंबईकरांना थेट बोरिवली ते पनवेल लोकल प्रवासाची सुविधा मिळणार असल्याने हा प्रकल्प भविष्यातील मुंबईसाठी गेमचेंजर ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा