Wednesday, June 3, 2026

Ranveer Singh : FWICE चा यू-टर्न! रणवीर सिंगवरील कारवाई मागे घेतल्याची घोषणा

Ranveer Singh : FWICE चा यू-टर्न! रणवीर सिंगवरील कारवाई मागे घेतल्याची घोषणा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि 'डॉन 3' (Don-3) चित्रपटाच्या वादावरून सुरू झालेल्या संघर्षात मोठी घडामोड घडली आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ने रणवीर सिंगविरोधात जारी केलेला नॉन-कोऑपरेशन (Non-Cooperation) निर्देश तात्काळ प्रभावाने मागे घेतला आहे. रणवीर सिंगने FWICE ला कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर आणि निर्माते संघटनांच्या मध्यस्थीनंतर हा निर्णय घेण्यात आला. इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन (IMPPA), प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया आणि सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन (CINTAA) यांच्या विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

रणवीर सिंगने पाठवली होती कायदेशीर नोटीस

FWICE ने गेल्या महिन्यात रणवीर सिंगविरोधात नॉन-कोऑपरेशन निर्देश जारी केला होता. त्यानंतर रणवीर सिंगने संघटनेला कायदेशीर नोटीस (Leagal Notice) बजावली. मंगळवारी ही नोटीस पाठवण्यात आल्याचे समोर आले असले तरी त्यामधील नेमकी माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. दुसरीकडे FWICE कडूनही या नोटीशीवर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

'डॉन 3' मधून बाहेर पडल्याने वादाला सुरुवात

रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दिग्दर्शक फरहान अख्तर (Farhan Akhtar) यांच्यातील 'डॉन 3' (Don-3) वाद हा अलीकडच्या काळातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या बॉलिवूड (Bollywood) वादांपैकी एक ठरला आहे. विविध माध्यमांतील अहवालांनुसार, चित्रपटाच्या निर्मात्यांशी झालेल्या सर्जनशील मतभेदांमुळे रणवीरने चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच चित्रपटाच्या निर्मितीत होणारा वारंवार विलंब आणि अंतिम पटकथा तयार नसल्याबद्दलही तो नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

सुरुवातीला हा केवळ कलाकार बदलाचा मुद्दा वाटत असला तरी पुढे त्याचे मोठ्या कायदेशीर वादात रूपांतर झाले. फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटने रणवीर सिंगकडून तब्बल ४५ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केल्याची चर्चा रंगली. त्यानंतर FWICE नेही अभिनेत्याविरोधात नॉन-कोऑपरेशन निर्देश जारी केला होता.

वादावर रणवीर सिंगची संयमी भूमिका

FWICE ची कारवाई जाहीर झाल्यानंतर रणवीर सिंगच्या प्रवक्त्याने निवेदन जारी करत अभिनेत्याची भूमिका स्पष्ट केली होती. सुरू असलेल्या वादावर अधिक भाष्य करण्याची त्याची इच्छा नसून व्यावसायिक विषय आणि वैयक्तिक संबंध हे परस्पर सन्मान, परिपक्वता आणि सभ्यतेने हाताळले जावेत, असा त्याचा विश्वास असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले होते. दरम्यान, FWICE ने कारवाई मागे घेतल्यामुळे रणवीर सिंग, 'डॉन 3' वाद आणि बॉलिवूडमधील या चर्चित प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून पुढील काळात सर्व संबंधित पक्षांमध्ये चर्चेद्वारे तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >